मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता - १. रिकामे मधुघट

धोंडोपंत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नमस्कार लोकहो, राजकवि श्री. भास्कर रामचंद्र तांबे हे मराठी साहित्यातील अमोल रत्न. आमचे अत्यंत आवडते कवि. दिनांक ७ डिसेंबर १९४१ रोजी हा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. मराठी काव्याचे 'मधुघट रिकामे' झाले. खरे तर भास्कररावांना आदरांजली म्हणून आम्ही "रिकामे मधुघट" ही मालिका ७ डिसेंबर रोजीच सुरू करणार होतो. पण ते जमले नाही. भास्कररावांनी मराठीला दिलेल्या अमूल्य ठेव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा लेखनप्रपंच आहे. या मालिकेच्या माध्यमातून भास्कररावांच्या काही निवडक कविता 'मिसळपाव' वर जतन करण्याचा आमचा संकल्प आहे. आज तांब्याच्या कविता वाचायला मिळणे ही गोष्टच दुर्लभ झाली आहे. आमचा हा संकल्प आमचे कुलदैवत श्री व्याडेश्वराच्या कृपेने सिद्धीस गेल्यास 'मिसळपाव'वर मराठी भाषेतील ही रत्ने कायमस्वरूपी जतन होतील. हा संकल्प सिद्धीस जावो हीच श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना. भा.रा. तांबे यांच्या पुण्यस्मृतीस आमचे विनम्र अभिवादन. आपला, (भा.रा.वलेला) धोंडोपंत रिकामे मधुघट मधु मागशि माझ्या सख्या, परिं मधुघटचि रिकामे पडति घरीं !..... ध्रु. आजवरी कमळाच्या द्रोणी मधू पाजिला तुला भरोनी, सेवा ही पूर्विची स्मरोनी करिं रोष न सखया, दया करी.....१ नैवेद्याची एकच वाटी अता दुधाची माझ्या गांठीं; देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणीं कशी तरी......२ तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज, वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज, संसाराचे मर्म हवें तुज, मधु पिळण्या परि रे बळ न करीं !......३ ढळला रे ढळला दिन सखया संध्याछाया भिवविति हृदया, अता मधूचें नांव कासया? लागले नेत्र रे पैलतिरीं........४ मधु मागशि माझ्या सख्या, परी मधुघटचि रिकामे पडति घरीं ! राजकवि भास्कर रामचंद्र तांबे लेखनकाळ - १९३३ , ग्वाल्हेर.

वाचन 48850 प्रतिक्रिया 25