माझे साईपदयात्रेचे अनुभव - १
मी ६ वर्षांपासुन पदयात्रा करीत आहे. मार्च एप्रिल मध्ये जात असते. आमचा पदयात्रेचा मार्ग चारोटी - जव्हार - मो़खाडा - त्र्यंबकेश्वर - नाशिक - सिन्नर - वावी ते शिर्डी असा आहे. दिवसा कमालीचे उन आणि रात्री जंगल असल्याने भरपुर थंडी असते. एप्रिल २०१४ या महिन्यात मी माझी ६ वी वारी पुर्ण केली. रात्री अतिशय थंडी असल्याने मला ह्यावेळी रात्री झोपच लागायची नाही. २ शॉल्स नेउन सुद्धा सारखी कुडकुडायचे. म्हणुन विचार केला कि वुलनच्या उबदार शॉल्स घेतल्या तर बरं पडेल. मी आमच्याकडे शोध घेतल्या शॉल्स तर मिळाल्या पण साईज छोट्या होत्या. त्यामुळे मी दुसर्या एका संकेतस्थळावर मदत मागितली. मला लगेचच मदत मिळाली. सगळ्यांनी पदयात्रेचा कौतुक केलं आणि पदयात्रेचा अनुभव लिहिण्याविषयी सुचवले. मला लिहिण्याचा अनुभव नाहीये पण मैत्रीणींच्या प्रेमाखातर मी जसं जमेल तसं लिहिण्याचा प्रयत्न केला. लिहिताना ६ वार्यांचा अनुभव जसा आठवेल तसा टाकण्याचा प्रयत्न केलाय. यामुळे त्या संकेतस्थळावर मला काही चांगल्या मैत्रीणीही मिळाल्या. ईथेही तसेच झाले तर आवडेल. काही चुकत असल्यास माफी असावी.
दरवर्षी बर्याच ठिकाणांहुन भाविक साईपदयात्रेत सामील होतात. आमच्या बोईसर आणी आजुबाजुची गावे मिळुन १०० मंडळे जातात ; माझ्या घरातुन माझा सख्खा भाऊ गेली १४ वर्षे पदयात्रा करतोय तर एक चुलत भाउ २१ वर्षे व दुसरे ५ - १० वर्षांपासुन पदयात्रेत सामील होतात.पण बहुतकरून ग्रुप हा फक्त पुरुषांचाच दिसायचा. मला जायची तीव्र ईच्छा होती. मी शिर्डीला गाडीतुन बर्याचजणांना चालत जाताना पाहायचे, एका ग्रुपमध्ये बायका दिसायच्या. मला त्यांचे खुप कौतुक वाटायचे. २००८ च्या नोव्हेंबर मध्ये माझ्या बहीणीच्या बिल्डींगमध्ये भाउजींचे मित्र राहायला आले. बोलता बोलता कळले की त्यांच्या गावातुन २ ग्रुप पदयात्रेसाठी निघतात व दोन्ही ग्रुपमधुन बायका ही जातात. त्यांचे गाव घिवली आहे. पालघर - डहाणुच्या (महाराष्ट्र - गुजराथ बॉर्डर ) मध्ये बोईसर हे स्टेशन आहे जिथे मी राह्ते. मोठा एम.आय.डी.सी. एरीया आहे. तिथुन १० कीमी वर तारापुर हे गाव आहे. व तिथुन आतमध्ये २ कीमी वर घिवली आहे. बी.ए.आ. सी. व टी.ए.पी.एस. चे १,२,३,४ हे प्लांट गावाला लागुन आहेत. एक ग्रुप जो भंडारी जमातीचा (गावड, मोरे, पाटील, राउत ) आहे तो राउतच्याच माणसांचा आहे म्हणजे ग्रुप मेंम्बर्स हे त्यांचे सर्व नातेवाईक आहे, भाउ, मामा , चुलते वगैरे आहेत. हे ग्रुप गुढीपाडव्याच्या दिवशी निघतात आणी रामनवमीच्या आदल्या दिवशी पोहोचतात. मी त्यांना लगेचच सांगितले की माझे नाव तुमच्या ग्रुपमध्ये नोंदवा. फेब्रुवारी २००९ साली त्यांनी सांगितले की २६ मार्च २००९ ला पदयात्रा निघणार आहे तर २ फोटो , फी हे द्यावं लागेल आणी ते पत्रक देतील त्याप्रमाणे सामान बरोबर घ्यावं लागेल.
माझ्या घरच्यांनी मला खुप समजावण्याचा प्रयत्न केला की ईतक्या लांब जाणं झेपायचं नाही. ८ दिवस चालायचं आहे, तु १ कीमी सुद्धा चालत नाहीस कसं होणार? जंगलाचा रस्ता, कुठे उघड्यावर झोपणार जंगलचा रस्ता आहे, उन खुप असणार, तुला सतत ए.सी.ची सवय , परत मुलीचा सेफ्टीचा प्रश्न असतो. परत ज्या ग्रुपबरोबर जातेस ती लोकं अतिशय अशिक्षीत , लगेचंच मारामारीवर येणारी , बायकाही तशाच पुरुषांप्रमाणे अरेरावी करणार्या, जाउ नकोस नेहमी गाडीनं जातेस तशीच जा, साईबाबांनी काही सांगीतलं नाहीये कि चालंतच ये म्हणुन ह्या ना त्या प्रकारे मला घरच्यांनी न जाण्याचा सल्ला दिला. पण मला साईबाबांवर विश्वास होता ते मला नेतील ह्याची खात्री होती आणी माझी चालत जाण्याची ईच्छा खुपच प्रबळ होती. माझे वजन ही भावा प्रमाणे जास्त होते त्यावेळी मी चालु शकेल ही माझ्या घरच्यापैकी कुणालाही खात्री नव्हती. आणी मी रोज साईबाबांना विनवायचे की देवा मला सुखरुप न्या.
राउत ने दिलेल्या लिस्ट प्रमाणे मी सामानाची जमवाजमव केली. ऑफीसमधुन १५ दिवसांची सुट्टी घेतली. पॅकींग केली , अगदी निघेपर्यंत सर्व न जाण्याचा सल्ला देत होते. माझ्या नकळत राउतने नातेवाईकांना सांगितले होते. की हिला आरामाची सवय आहे हि काही २ की.मी पेक्शा जास्त चालु शकणार नाही हिला जितकं चालता येईल तितकं चालवा आणी नाहि जमलं तर गाडीत बसवा. पण एकटीला कुठेही सोडु नका मागे पडली तरी तिच्या बरोबर राहा. राउतने मला सांगितले कॅश जास्ती बरोबर घेउ नकोस, आणी माणसं कशीही असोत कुणाच्याही नादी लागु नकोस, आपल्याला शिर्डीला पोहोचायचं आहे हेच ध्यानात ठेव. २५ मार्चला राउत बरोबर मोठी सामानाची बॅग पाठवुन दीली आणी २६ मार्च २००९ ला सकाळी घिवलीला पोहोचले. आणी पदयात्रेला सुरुवात केली.
चुलत भावाने सुचवल्याप्रमाणे घरातुनच पायात अंगठा वेगळा असलेले सॉक्स त्यावर अँकल सपोर्ट व स्लीपर घालुन निघाले होते. त्याने सांगुन ठेवले होते कि जर कुठलेही कपडे जे स्कीन टाईट असतील ते नेहमी ऊलट करुन घालायचे कारण ह्या प्रवासात घामाने खुप रॅशेस येतात. घिवलीपासुन पदयात्रेला सुरुवात झाली. सगळ्यात आधी साईबाबांची पालखी निघाली आणी नंतर लोकं हळुहळु सामील व्हायला लागले. गावातुन २ पालख्या एकत्र निघाल्या . एक भंडार्यांची आणी एक कोळी लोकांची . ह्या भागात सहसा कोळी लोकांना मांगेला/ मांगेली म्हणतात. पुर्वी एकच पालखी निघायची पण आपापसातील भांडणामुळे १० वर्षांपासुन २ वेगवेगळ्या पालख्या निघु लागल्या. पालखी सगळीकडे थांबुन येत असते म्हणुन पदयात्री पुढे निघाले. २ कि.मी. पुढे आल्यावर एके ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. नाश्ता करुन पुढे चिंचणी येथे साईबाबांच्या मंदीरात आलो. हे मंदीर साईबाबांचे भक्त अण्णा चिंचणीकर ह्यांचे आहे. येथे दासगणुंनी भजन केले आहे असे मी ऐकले आहे. तिथे मला राउत यांची आई, बायको आणी इतर नातेवाईक भेटले. मी त्यांच्याबरोबरच चालायला सुरुवात केली. घिवली गावातल्या प्रत्येक घरातील सगळे जण सामील झाले होते. दुपारच्या जेवणाच्या थांब्यापर्यंत सर्व घरातल्या पदयात्रींना साथ द्यायला येतात आणी जेवुन माघारी फिरतात. गप्पा मारत मारत १५ कि.मी. वर केतखाडी येथे जेवणाच्या थांब्यावर पोहोचलो. पाय दुखू लागले होते. इथे एक भाविक सर्वांसाठी स्वखर्चाने जेवण देतात. जवळपास ७०० ते ८०० माणसे जमली होती. पाल़खी आल्याशिवाय निघायचे नसल्याने आम्ही जेवण करुन आराम करत रोडवर बसलो.
थोडया वेळाने पालखी आल्यावर जे न येणारे होते त्यांनी आपापल्या लोकांना निरोप द्यायला सुरुवात केली. माझ्याबरोबर राउतची आई आणी बायको होत्या. राउतच्या आईने एका मुलीबरोबर ओळख करुन दिली आणी त्या दोघी माघारी वळल्या. मी पुन्हा पायात सॉक्स त्यावर अँकल सपोर्ट घालुन नंतर स्लीपर्स घालुन त्या मुलीबरोबर चालायला सुरुवात केली. थोडया वेळातच कळले की बरोबरच्या मुलीला तिच्या मित्राबरोबर चालायचे होते. मी माझी वाट धरली. थोडया वेळात आम्ही वाणगावला रेल्वे लाईन क्रॉस केली. वाणगाव हे स्टेशन बोईसर आणी डहाणु या दोन स्टेशनामधले आहे. ही रेल्वे लाईन वेस्टर्न लाईन आहे. उन भरपुर होते मागे पुढे माणसे होती पण ओळखीचे कुणीच नसल्याने एकटीच चालले होते. थोड्यावेळात राउत चा भाउ, त्याचे भाउजी मागुन आले त्यांनीच ओळ्ख दिली आणी आम्हि आहोत एकटी मागे राहीलीस तरी घाबरु नकोस असे सांगितले आणी तुला जसे चालता येईल तसे चाल असेही सांगितले. . एके ठि़काणी रोडवर तेथील एका घराकडुन पदयात्रेसाठी सरबताची व्यवस्था केली होती. ईथे पुर्ण आदिवासी एरीया आहे. गरीबी आहे पण बिचारे पदयात्रींसाठी टाकीभर सरबत करुन ठेवतात. पुढे साखरा नदी लागली २ डोंगराना वळसा घालुन खुप पुढे चहाचा थांबा होता. पाय आता खुप दुखायला लागले होते. साधारण ५ वाजता चहाचा थांबा आला. आधी पाय मोकळे केले. पायाला आयोडेक्स लावले. चहा घेतला आणी सर्व निघालो. आत्ता खुप पाय दुखायला लागले. पण बाकिच्यांनी सांगितले की आता ३-४ की.मी. वर ऐना या गावी रात्रीचा थांबा आहे. चाल मंदावली, ह्ळुह्ळु सर्व पुढे निघुन गेले. आणी राउतचा भाउ, भाउजी, आत्यावा मुलगा आणी एक आणखी एक जण माझ्या बरोबर चालु लागले. हे सर्वजण पदयात्रा मंडळाचे सभासद होते. ही मंडळी सर्वात शेवटी चालतात व जो कोणी मागे पडेल त्याला बरोबर घेउन जातात. मी थकले आणी पाय खुपच दुखायला लागले. कधी तो थांबा येतो असे झाले. बरोबरची मंडळी म्हणाली आता १० मिनिटांबर थांबा आलाय फास्ट चाललीस तर लवकर येईल. मी थोडया फास्ट चालु लागले. अर्धा तास झाला तरीही थांबा आलाच नाही . अंधार पडू लागला. मी पुन्हा विचारले तर तेच उत्तर आता मोजुन १० मिनिटे राहीलीत पण पाय दुखत असल्याने मला काहि फास्ट चालता येत नव्हते. पायाचे तुकडे पडतील असे वाटत होते. शेवटी कसेबसे ७ वाजता पोहोचलो.
एका राईस मिलच्या पटांगणात थांबलो होतो. पाठीमागेच ओढा होता. गारठा जाणवत होता. पदयात्रींसाठी मोठ्या सतरंजी अंथरल्या होत्या. बायकां आणी पुरुषांसाठी वेगवेगळ्या सतरंज्यांची सोय होती. प्रत्येकाने स्वत:च्या जागा पकडुन ठेवल्या होत्या. कुणी फ्रेश होत होतं, कुणी दुसर्या दिवशीच्या आंघोळीचं सामान काढुन ठेवत होतं. मी उशिरा पोहोचल्याने माझं सामान गाडीतुन काढुन एके ठीकाणी ठेवण्यात आलं होतं ते घेतलं आणी जागा शोधली. बसल्यावर पायातलं सामान काढल्यावर जरा बरं वाटलं . अंग खुपच दुखत होतं आणी तापासारखं वाटत होतं. मी थोडावेळ स्वस्थ पडुन राहीले. पालखीच्या आरतीला सुरुवात झाली. सर्वांनी आरती घेतली. ह्या लोकांना साईबाबांच्या सर्व आरत्या येत नाहीत. "आरती साईबाबा ..." ह्या आरती नंतर सर्व गणपतीच्या आरत्या झाल्या. मंडळाची माणसे पदयात्री मोजत होती, बरेचण आयत्यावेळी सामील झाल्याने त्यांची फी जमा करायला घेतली होती, साधारण ३५० जण पदयात्री होते, २५-३० जण पदयात्री कम मंडळाचे सभासद होते. १० जण आचारी होते जे फक्त जेवण बनवणे आणी चहा नाश्ता बनवुन देण्याचे काम करणार होते. बाजुलाच जेवणाची तयारी चालु होती. जेवणाची रांग लागली प्रत्येकाने स्वतः रांगेत उभे राहायचे आणि स्वतःचे ताट स्वतः धुवायचे. रात्री एक नर्स बाई होत्या सर्व जण त्यांच्या कडुन पेनकीलर्स (गोळ्या आणी ईंजेक्शन्स ) घेत होते. कुणी फोडात झालेले पाणी सीरींज ने काढायला येत होते. मला ही राउतच्या भावाने ईंजेक्शन घ्यायचे सुचविले, मी आधी नर्सला ईंजेक्शन बद्द्ल विचारले ती म्हणाली साधं पेन कीलर आहे, बाकि काही नाही मग मी सुदधा एक घेतलं. दुसर्या दिवशीचे आंघोळीचे सामान आधीच काढुन ठेवायचे होते कारण दुपारी फक्त छोट्या बॅग्ज / बॅकपॅक्स मिळणार होत्या व मोठ्या बॅग्ज फक्त संध्याकाळी झोपताना मिळणार होत्या. पहील्या दिवशी २८-३० की.मी. चाललो होतो. दुस-या दिवशी ३०-३२ की.मी. असल्याने ४ वाजता निघण्याचे ठरले. त्याकरीता ३.३० ला उठावे लागणार होते. २ चादरी अंथरुन पहुडले. खुप झोप आली होती आणी थंडीही वाजत होती
वाचन
18728
प्रतिक्रिया
28