पन्हाळगड-विशाळगड---एका दिवसात???
मंडळी
लेखाच्या शीर्षकात प्रश्नचिन्ह टाकायचे कारण या ट्रेकबद्दल मी ज्या ज्या लोकांशी बोललो होतो त्या सर्वांनी हा ट्रेक करायला किमान दोन दिवस पाहीजेतच असे ठासुन सांगितले होते.त्यामुळे भावाने मला जेव्हा सांगितले की मुंबईचे जिजाउ प्रतिष्ठान हा ट्रेक एका दिवसात करते आणि आजपर्यंत सहा वेळा त्यांनी दर वर्षी हा ट्रेक असाच केलाय तेव्हा मी त्याला वेड्यात काढले.
हा ट्रेक "द लाँगेस्ट वन डे इन सह्याद्री" म्हणुन ओळखला जातो. पन्हाळागड ते विशाळगड अंतर अंदाजे ५७ कि.मी.
जे या ट्रेकला जाऊन आले असतील किंवा ज्यांनी वाचले ऐकले असेल त्यांना या ट्रेकच्या कठीणपणाबद्दल कल्पना असेलच.मलाही होती आणि त्यातच माझ्या ड्रीम ट्रेकमधे टॉपवर असलेला हा ट्रेक गेली अनेक वर्षे मला हुलकावणी देत होता.
शेवटी धीर केला आणि मुंबईच्या साटम सरांना फोन लावला.(साटम सर मुंबई महापालिकेत नोकरीला आहेत आणि ट्रेकिंग हा त्यांचा व्यवसाय नाही .केवळ ईतिहासाच्या वेडापायी असे ट्रेक घेउन जातात,शिवाय स्वतः सुद्धा कायम फिरतीवर असतात.) साटम सरांनी स्पष्ट शब्दात मला सांगितले "हे पहा,हा अतिशय कठीण ट्रेक आहे.बाजीप्रभु आणि मावळ्यांनी ते अंतर एका दिवसात तोडले होते.त्यांना श्रद्धांजली म्हणुन आम्ही तो एका दिवसातच करतो.मग २०/२२/२४ कितीही तास लागोत.तुम्ही आपापल्या तब्येतीचा विचार करा आणि मगच या.तिकडे येउन काही त्रास झाला
तर मध्ये काही मदत मिळण्याची शक्यता कमीच." पण सर जसजसे माझे ब्रेनवॉशिंग करत होते तसतसा माझा निश्चय पक्का होत होता.आणि मी शेवटी माझा सहभाग पक्का करुन टाकला.
====================================================
थोडा ईतिहास सांगतो....
अफझलखान वधानंतर महाराजांनी मोठी मोहीम सुरु केली आणि आदीलशाहीचा बराच मुलूख जिंकला.त्यांचे पारीपत्य करण्यास आदीलशहाने सिद्दि जौहरची नेमणुक केली आणि मोठ्या फौजेसह त्याला रवाना केले.सिद्दीने महाराज पन्हाळ्याला असताना गडाला वेढा दिला. त्यावेळच्या युद्धशास्त्रानुसार हा वेढा फारतर पावसाळ्यापर्यंत टिकेल आणि मग सिद्दी माघार घेईल असे महाराजांना वाटत होते. पण सिद्दीने पावसाळ्यातही वेढा कायम ठेवला. बाहेरुन वेढा फोडायचे नेताजी पालकरांचे अनेक प्रयत्न सिद्दीच्या सावधगिरीने फसले.गडावरही फार मोठी कुमक नव्हती.
अखेर राजांनी निवडक मावळ्यांसह विशाळगडावर पळुन जायचे ठरवले.आषाढ पौर्णिमेचा दिवस ठरला.रात्री किर्र अंधारात आणि पावसात ६०० मावळे घेउन राजे पुसाटी बुरुजाकडुन मसाईच्या पठारावर उतरले आणि वेढ्यातुन निसटुन विशाळगडाच्या मार्गाला लागले.पण खानाला याची कुणकुण लागली आणि त्याने मोठी फौज देउन सिद्दी मसुदला राजांच्या मागावर पाठवले. सिद्दीने राजांना गजापूरजवळ घोडखिंडीत गाठले आणि लढाईला तोंड फुटले.
६०० मावळ्यांचा एव्हढ्या मोठ्या सैन्यासमोर निभाव लागणे शक्यच नव्हते. शेवटी लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहीजे या नियमानुसार बाजीप्रभू देशपांड्यांनी राजांसमोर एक प्रस्ताव ठेवला.राजांनी ३०० मावळे घेउन पुढे कूच करायचे आणि ३०० मावळ्यासह बाजींनी खिंड थोपवुन धरायची.बाजींना खुण म्हणुन राजांनी विशाळगडावर पोचल्यावर तोफ उडवायची असे ठरले.
आणि मग पावनखिंडीत घोर रणसंग्राम माजला."तोफेआधी मरे न बाजी सांगा म्रुत्यूला" अश्या आवेशाने बाजीप्रभू खिंडीत लढले आणि तोफ ऐकल्यावर ३०० मावळ्यांसह त्यानी प्राण सोडले.
या अतुलनीय शौर्याला सलाम म्हणुन अनेक ट्रेकर मंडळी हा ट्रेक १० ते १२ जुलै दरम्यान करत असतात.तसेच वर्षभरसुद्धा वेगवेगळ्या ऋतूमध्ये करतात.
==================================================
शनिवार १२ जुलै २०१४ वेळ पहाटेचे ४.३०
मुंबई -पुण्याची १७ आणि कोल्हापूरची १० अशी एकुण २७ जण वार्यापावसाची तमा न बाळगता पन्हाळगडावरच्या बाजीप्रभूंच्या पुतळ्याशी गोलाकार उभे होते.साटम सर सर्वांना उद्देशुन भाषण करत होते. प्रथम त्यांनी वर दिलेला ईतिहास सांगितला.मग हा ट्रेक एका दिवसात करण्याचा आपला हेतू स्पष्ट केला.बरोबर काय घ्या काय नको याच्या सूचना दिल्या. ट्रेक कठीण आहे हे परत एकदा सांगितले. आम्हाला ईथवर घेउन येणारी गाडी पुन्हा आम्हाला पांढरपाणी गावात भेटणार होती.त्यामुळे एकदा ईथुन सुटलो की किमान ४० कि.मी. चालणे आहे याची कल्पना दिली आणि "हरहर महादेव" "प्रौढप्रताप पुरंदर......" घोषणांनी आसमंत दणाणुन टाकत मंडळी निघाली.
सुरुवातीचा डांबरी रस्ता कधीच संपला आणि शेताच्य बांधावरुन वाटचाल सुरु झाली.मी मी म्हणणारी मंडळी धापकन घसरुन पडु लागली आणि त्यांना सावरता सावरता ईतरसुद्धा..कोण कोणाला सावरणार अशी परिस्थिती झाली.पण थोड्याच वेळात उजाडले आणि रस्ता नीट दिसु लागला.
६.३० वाजत आले होते आणि आम्ही मसाईच्या पठारावर आलो.
दाट धुके आणि भणाण वार्याने आमचे स्वागत केले.कधीकधी १०० फुटांवरचा माणुस दिसेना अशी परीस्थिती होती.पण अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता.
मसाईचे पठार प्रचंड मोठे आहे आणि चकवा लागला तर माणुस दोन दोन दिवस फिरत राहील अशी वेळ येउ शकते.
साधारण ९ वाजता एक मुख्य खूण दिसली आणि सर्वांनी हुश्श केले.मसाईचे देउळ हीच ती खूण
लगेच मंडळींनी सॅकमधुन खाण्यापिण्याच्या वस्तू काढल्या आणि एक मोठा नाश्ता ब्रेक झाला.
नाश्ता करुन पुन्हा निघालो. कधी चढ तर कधी उतार,कधी पावसाची सर तर कधी दाट धुके अशी वाटचाल सुरु होती.
मधेच गावातले रस्ते तर कधी शेते साथ करीत होती.
निसर्गाचे विविध चमत्कार बघायला मिळत होते आणि आश्चर्य वाटत होते.
मधे मधे छोटीमोठी गावे लागत होती.
वाटेत भरारी संस्थेने केलेल्या बाणांच्या खुणा आम्हाला वाट भरकटण्यापासुन वाचवत होत्या.
अशातच दुपारचा एक वाजला .ज्या गावात पोचलो तिकडेच आपापले डबे उघडुन खाउन घेतले.
मुंबईची भरारी वगैरे काही संस्था हा ट्रेक २ किंवा ३ दिवसात करतात. पण ते सुद्धा सर्वांना पॅकलंच देतात. कारण कोण किती भरभर चालु शकेल आणि जेवणाच्या वेळी कुठल्या गावात असेल हे सांगु शकत नाही.
वाटेत २-३ वेळा मोठे ओढे लागतात. पण यावर्षी पावसाने ओढ दिल्याने ओढ्यांना फारसे पाणी नव्हते.वातावरणात एक छान गारवा मात्र होता.वाटेत जळवांचाही तत्रास होउ शकतो. मला मात्र जळवा कुठे दिसल्या नाहीत.
संध्याकाळ होत आली.सकाळी उत्साहाने फसफसलेली मंडळी आता एकमेकांच्या आधाराने कशीबशी चालत होती.
आता सर्वांचे कॅमेरे सॅकमध्ये गेले होते.पाय इतके दुखायला लागले होते की लोक केवळ यांत्रिकपणे चालत होते. हास्यविनोद वगैरे कधीच बंद झाले होते आणि त्या जागी आ,आई गं,आउच असे आवाज येत होते. :)कधी एकदा पांढरपाणीला पोचतो असे झाले होते. वाटेत लागणार्या गावकरी मंडळींना विचारावे की "पांढरपाणी किती लांब आहे ?"तर एकच उत्तर मिळे "लई लांब आहे"
"शेवटी किती अंत माझा पाहशी अनंता" म्हणता म्हणता ६.३० ला पांढरपाणी गाव आले.गावात एकच चांगले हॉटेल दिसल्याबरोबर मंडळींनी तिकडे डेरा टाकला.पोहे,चहा,ऑम्लेट,बुर्जी नुसती वर्दळ उडाली.आमची टेम्पो ट्रॅवलरसुद्धा तिथे येउन पोचली होतीच.एक एक करता सर्व जण आले अणि पुढचा विचारविनिमय सुरु झाला.पावनखिंड अजुन ६ कि.मी लांब होती आणि विशाळगड तिथुन पुढे १२ कि.मी.
अर्ध्या लोकांनी आम्ही आता गाडीतुनच येणार असा मनसुबा जाहीर केला. मी आणि काहीजणांनी मात्र ईथवर आलोच आहोत तर पावनखिंडीपर्यंत चालण्याचे पुण्य पदरात पाडुन घ्यायचे ठरवले आणि निघालो.रात्रीचे ८.३० वाजले होते. पाउस रिपरिप करत होता आणि अंधार मी म्हणत होता.साधारण १० च्या सुमाराला पावनखिंडीत पोचलो. साटम सरांनी तिथेच भर पावसात उभे राहुन तिकडचा ईतिहास सांगितला.अतिशय रोमांचकारी क्षण होता तो.
शिवाजीराजे आणि बाजीप्रभूंची जिथे उभे राहुन शेवटची गळाभेट झाली असेल तिथे आम्ही प्रत्यक्ष उभे होतो.तेही त्यांच्यासारखेच सलग १६-१७ तास चालुन...अर्थात त्यांच्या असामान्य शौर्याची सर आमच्या ट्रेकला येणार नव्हती.पण आमचा आदर तरी त्यातुन आम्ही व्यक्त करु शकलो हे ही नसे थोडके.
तळटिप-: डावा गुढघा फार दुखत असल्याने मी यानंतर गाडीतच बसुन जाणे पसंत केले.साटम सर व अजुन ४ जण विशाळगडापर्यंत चालत गेले.त्यांना आम्ही रात्री २ वाजता गाठले आणि गाडी मुंबईच्या दिशेने धावु लागली.
जय महाराष्ट्र!!जय हिंद!!
वाचन
30925
प्रतिक्रिया
61