मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनमोहक बाली : ०७ : तळ्यातले मंदिर (उलुन दानू ब्रतान), राजमंदिर (तमान आयुन) आणि समुद्रातले मंदिर (ताना लोत)

डॉ सुहास म्हात्रे · · भटकंती
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)... =================================================================== ...अश्या सोहळ्याची हवा पर्यटकांना लागणार नाही तर मग अजून काय होणार? वाटेत एका ठिकाणी थांबून आम्हीही स्थानिक टोप्या खरेदी केल्या आणि त्या घालून अस्सल बालीकर बनून गालुंगनच्या सोहळ्यात सामील झालो...

पुरा उलुन दानू ब्रतान

हे बालीतील प्रमुख शैव मंदिर समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीवर असलेल्या ब्रतान सरोवराच्या काठावर वसलेले आहे. तेथील अकरा मजली पॅगोडासारखी इमारत (पेलिंग्गी) शिवपार्वतीच्या नावे बांधलेली आहे. या मंदिरात एक बौद्धमूर्तीही आहे. बालीच्या संस्कृतीतील जलदेवता दानूचेही मंदिर तेथे आहे आणि यावरून या मंदिराचे नाव पडले आहे. हे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान तर आहेच, पण तसेच ते बालीच्या प्राचीन सुबक जलव्यवस्थेचे एक महत्त्वाचे केंद्रही आहे. १२०० मीटर उंचीवर असल्याने येथे वर्षभर थंड वातावरण असते आणि उष्ण कटिबंधात असल्याने अचानक धुवांधार पाऊस पडून ते केव्हाही अधिकच थंडगार होऊ शकते. नेहमीच्या परंपरेप्रमाणे येथे असलेले दुभंगलेले मेरुव्दार आपले स्वागत करते...

चला तर मंदिराच्या आवारात फेरफटका मारू या...

 बाहेरच्या आवारातली देवळे

.

 भाविकांच्या आरामासाठी मंडप

.

 मंदिराच्या अंतर्भागातील देवळे

आवारात थोडा वेळ फिरून झाले नाही तोच पाऊस सुरू झाला...

.

 पुरा उलुन दानू ब्रतानचे कोरी अगुंग

आजूबाजूच्या पर्वतांवर आणि ब्रतान तलावावर तरंगणार्‍या ढगांच्यामुळे इथले वातावरण नेहमीच गुढगंभीर भासते. हा परिसर इतका सुंदर आहे की इथे येणारा पर्यटक, मग तो आस्तिक असो वा नास्तिक, नक्कीच भारून जातो. पूर्वीच्या काळी या मंदिराची पॅगोडासारखी दिसणारी (पेलिंग्गी) इमारत मूळ भूभागाला जोडून असलेल्या जमिनीवर होती. पण जमिनीची झीज होऊन तो भूभाग किनारपट्टीपासून वेगळा झाल्याने आता ती इमारत सरोवरातील एका छोट्या बेटावर आहे...

 सरोवरातल्या बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्गी

सरोवराकाठच्या देवळाच्या परिसरात बालीच्या परंपरेला अनुसरून सुंदर बाग केलेली आहे...

.

जरी पाय निघायला तयार नव्हते तरी पावसामुळे तेथून निघणे भाग पडले. वाटेत डोंगराळ प्रदेशातल्या एका रेस्तराँमध्ये जेवण घेतले. बाली जितकी तिच्या चवदार जेवणासाठी लक्षात राहिली आहे त्यापेक्षा जास्त तेथील रेस्तराँच्या जेवणाच्या कक्षांच्या एकाहून एक वरचढ मनमोहक नैसर्गिक पार्श्वभूमींमुळे लक्षात राहिली आहे. वानगीदाखल दरीच्या टोकावर असलेल्या इथल्या रेस्तराँच्या भोजनकक्षातून दिसणारा हा निसर्गाचा (अजून एक) नजारा पहा...

पुरा तमान आयुन

पोटपूजा आटोपून आम्ही बालीच्या मध्यभागातले पुरा तमान आयुन हे बालीच्या राजघराण्याचे मंदिर पाहायला निघालो. हे मंदिर इ स १६३४ मध्ये मेंगवी राजघराण्यातील राजाने बांधले. राजमंदिर असल्याने अर्थातच हे मंदिर आखीवरेखीव पण तरीही निसर्गाला कोठेही उगाचच कृत्रिमतेचा स्पर्श न होवू देत बांधलेले आहे. हे मंदिर नदीत असलेल्या एका बेटावर आहे. या सर्व मंदिरसंकुलाची बांधणी भवसागरात तरंगणार्‍या पवित्र मेरू पर्वताचे प्रतीक म्हणून केलेली आहे. बेटावर मंदिराच्या चारी बाजूला पाण्याने भरलेला खंदक आहे. पिरॅमिडसारखे एका वर एक बागांचे चौथरे आहेत आणि त्यातल्या सर्वात वरच्या चौथर्‍यावर मंदिराचा मुख्य भाग आहे. त्यामुळे याचे "पुरा तमान आयुन" म्हणजेच "पाण्यात असलेल्या बागेतले मंदिर" हे नाव सार्थ होते. आम्ही गेलो तेव्हा सतत पडणार्‍या पावसामुळे मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याचा एक भाग खचला होता. नशिबाने अर्धा रस्ता चांगल्या अवस्थेत असल्याने बाली पोलिसांच्या देखरेखीखाली मंदिराकडे जाणारी पायी वाहतूक चालू होती. पाऊस बर्‍यापैकी हजेरी लावत असला तरी बालीकारांची गालुंगन निमित्ताने मंदिराकडे जाणारी गर्दी काही कमी नव्हती. आम्हीही त्या गर्दीत मिसळून गेलो. नदीवरचा पूल पार करून आम्ही मंदिर असलेल्या बेटावर पोहोचलो...

मंदिराच्या भोवतालच्या खंदकावरचा छोट्या पुलाच्या टोकालाच देवळाचे सर्वात बाहेरचे मेरू पर्वताचे रूपक असलेले चंडी बेंतार प्रकारचे व्दार लागते...

चंडी बेंतार द्वारातून आत गेल्याबरोबर आपण मंदिराच्या भव्य प्रांगणात प्रवेश करतो...

चला मारूया फेरी या देवळाच्या आवारात...

 मंदिराचे बाहेरचे आवार

.

 कोरी अगुंग (मंदिराच्या अंतर्भागाचे प्रवेशव्दार)

.

 मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०१

.

 मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०२

.

 मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०३

.

 मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०४

.

 मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०५

.

 मंदिराच्या बाजूच्या गावातले एक कारंजे

. सगळीकडे उत्सवाचे वातावरण होते. देवळाबाहेर गालुंगन निमित्त अगदी भारतात असावी अशी यात्रा भरली होती...

 पुरा उलुन दानू ब्रतान जवळची गालुंगन यात्रा

.

पुरा ताना लोत

बालीच्या खवळलेल्या समुद्रकिनार्‍याजवळ 'ताना लोत' नावाचा एक खडक आहे. त्यावर 'पुरा ताना लोत' हे बालीतील अतीपवित्र मानले गेलेल्यांपैकी एक मंदिर आहे. या मंदिरच्या स्थापनेमागे एक मनोरंजक कथा आहे. सोळाव्या शतकात बारथा (Baratha, Bharatha, भरत) नावाचा एक रक्षकाचे काम करणारा माणूस या किनापट्टीवर फिरायला आला असताना या बेटाच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला आणि तेथेच राहू लागला. तो जवळपासच्या कोळी लोकांच्या नजरेस पडला आणि ते त्याला अन्न, फळे, इ देऊ लागले. ही कथा ऐकून तेथे आलेल्या निरर्थ नावाच्या ऋषींनाही ती जागा खूप आवडली आणि त्यांनी त्या बेटावर एक रात्र वस्ती केली. नंतर त्यांनी कोळ्यांना तेथे समुद्रदेवतेचे मंदिर बांधायला सांगितले. दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या महत्त्वाबरोबरच या मंदिरासंबद्धीत दंतकथांमध्येही अर्थातच भर पडत गेली आहे. त्यातल्या काही म्हणजे या देवळाभोवती विषारी समुद्रसर्पांचा सतत पहारा असतो आणि निरर्थ ऋषींच्या वस्त्रापासून तयार झालेला एक महाकाय सर्पराज या मंदिराचे रक्षण करतो. बालीभोवतीच्या समुद्रात बेटावर अथवा समुद्रकिनार्‍यावर एकूण सात मंदिरे आहेत. या मंदिरांच्या जागा अश्या आहेत की कोणत्याही एका मंदिरातून त्याच्या दोन्ही बाजूंची मंदिरे डोळ्याने दिसू शकतात. अश्या रितीने बालीच्या संपूर्ण किनार्‍यावर लक्ष ठेवण्यास या सात मंदिरांच्या माळेचा प्राचीन काळापासून उपयोग होत आहे. म्हणजे या मंदिरांनी प्राचीन काळापासून बालीच्या केवळ धार्मिक जीवनातच नव्हे तर संरक्षण व्यवस्थेमध्येही मोलाची कामगिरी बजावली आहे. खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्या सतत होणार्‍या भडिमारामुळे ताना लोत बेटाच्या खडकाची सतत झीज होत असते. १९८० मध्ये जपानी सरकारने दिलेल्या १३ कोटी अमेरिकन डॉलरच्या मदतीतून या बेटाची आणि बालीतील इतर महत्त्वाच्या स्थळांची डागडुजी करण्यात आली. ताना लोत बेटाच्या आता दिसणार्‍या खडकाचा जवळ जवळ एक त्रितियांश भाग या प्रकल्पात जीर्णोद्धार केलेल्या कृत्रिम खडकाने बनलेला आहे ! त्याच्या धार्मिक पार्श्वभूमीमुळे, वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे आणि सौंदर्यपूर्ण परिसरामुळे हे मंदिर बालीतील प्रमुख पर्यटक स्थळांपैकी एक झाले आहे. चला तर या फेरफटका मारायला या मनोहारी मंदिराचा... मंदिराच्या वाटेवर हा आधुनिक बाली शिल्पकलेचा नमुना आपले स्वागत करतो...

.

 मंदिराच्या वाटेवरचे एक आधुनिक कलाकुसरीचा नमुना असलेले प्रवेशव्दार

.

 मंदिराच्या वाटेवरचे एक आधुनिक कलाकुसरीचा नमुना असलेले प्रवेशद्वार : जवळून

.

 मंदिराचे मेरूद्वार

.

 मंदिराचे समुद्रकिनार्‍यावरील पूजास्थान आणि पुजारी (ब्राच्मन)

.

 समुद्रातले मुख्य मंदिर : ०१

.

 समुद्रातले मुख्य मंदिर : ०२

.

 समुद्रातले मुख्य मंदिर : ०३

. सुरक्षेच्या कारणासाठी बेटावरच्या मूळ मंदिराला भेट देता येत नाही याबद्दल खूप वाईट वाटले. पण त्याचे दुरून झालेले दर्शनही काही कमी मोहक नव्हते. या ठिकाणाला संध्याकाळी भेट दिल्यास तिथला नयनरम्य सूर्यास्तही पाहता येतो. तिन्ही बाजूंनी खवळलेला हिंदी महासागर, त्याच्या लाटांच्या सतत मार्‍याला तोंड देत निर्धाराने उभे असलेले बेट, अंधुक संधीप्रकाशात दिसणारे गूढगंभिर मंदिर आणि दूरवर समुद्रात डुबकी मारणारा सूर्य... केवळ अवर्णनीय देखावा...

 पुरा तान लोत जवळचा सूर्यास्त

. मंदिराच्या शेजारीच एक पंचतारांकित रिसॉर्ट आहे. तेथेही काँक्रिटच्या मनोर्‍यांचा अट्टहास न करता बालीच्या पार्श्वभूमीला साजेश्या इमारती बांधल्या आहेत...

मंदिराच्या बाजूच्या एका रेस्तराँच्या बाहेर हे वैशिष्ट्यपूर्ण कारंजे दिसले...

किनारपट्टीने पायवाटेवरून फिरून मंदिराला अनेक कोनांतून आणि मावळत्या सूर्याच्या अनेक छटांत पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. शेवटी तो सोन्याचा गोळा समुद्रात पूर्णपणे बुडून गेल्यावर झालेला काळोखच आपल्याला धक्के मारून तेथून बाहेर काढतो. (क्रमश: ) =================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)... ===================================================================

वाचन 11523 प्रतिक्रिया 0