मनमोहक बाली : ०४ : किंतामणी आणि पुरा तिर्ता एंपुल
...केवळ वेळेचे बंधन पाळायला हवे म्हणून जड पावलांनी गाडीच्या दिशेने निघणे भाग पडले.
गाडी रस्त्याला लागली आणि बालीच्या नयनरम्य निसर्गातून आमचा प्रवास सुरू झाला. आजच्या सहलीत अनेक छोटे मोठे रोचक थांबे होते. शिवाय प्रवासातल्या अनेक निनावी जागाही इतक्या सुंदर होत्या की डोळ्यांना आणि कॅमेर्याला मेजवानीच होती. इथे कार्तिकचा नेहमीचा अनुभव कामाला आला असणार, कारण आम्ही काही म्हणण्याच्या आधी "पाहिजे तेथे फोटो काढायला खुशाल गाडी थांबवायला सांगा" असे त्यानेच सांगून टाकले !
किंतामणी
अगुंग पर्वताच्या उत्तरपूर्वेला असलेल्या बातूर पर्वतावर बालीतील दुसरा महत्त्वाचा जिवंत ज्वालामुखी आहे. हल्लीच्या काळात म्हणजे १८०४ आणि १९६८ सालीही या ज्वालामुखीतून लाव्हाचा उद्रेक झाला होता. त्याच्या २३ ते २८ हजार वर्षांपूर्वी झालेल्या उद्रेकाने बनलेल्या प्रचंड विवरात १० X १३ किलोमीटर आकाराचे बातूर तळे आणि त्या तळ्याकाठी वसलेली प्राचीन पार्श्वभूमी असलेली अनेक गावे आहेत. हा किंतामणी नावाचा भाग त्याचा "स्फोटक" इतिहास, अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि प्राचीन संस्कृती यामुळे बालीतील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण बनले आहे. येथील पर्वतराजीत अनेक सुंदर पर्वतारोहण (ट्रेक) करण्याचे मार्ग आहेत. त्यातले काही तर अगदी बातूर पर्वतशिखरावरील ज्वालामुखीच्या मुखापर्यंत घेऊन जातात. इ स २०१२ मध्ये UNESCO ने या प्रभागाला Global Geopark Network मध्ये स्थान दिले आहे. अनेक आकर्षणे व अपुरा वेळा यामुळे या भागाचा मध्ये मध्ये फोटोथांबे घेत चारचाकीनेच धावता दौरा केला... या रस्त्यावरून पुढच्या थांब्याकडे जाताना अनेक पारंपरिक बालीनीज घरे दिसत होती...
.
.
बातूर पर्वत आणि बातूर तळे
बातूर पर्वताच्या उतारावर आणि बातूर तळ्याच्या काठी वसलेल्या गावांचे विहंगम दृश्य
पुरा तिर्ता एंपुल
तंपाक सिरिंग गावाजवळचे हे मंदिर इ स ९६२ मध्ये वर्मदेव राजघराण्यातील राजा इंद्रजयसिंह याने स्थापन केले एका मोठ्या झर्याच्या ठिकाणी बांधले. एका दंतकथेप्रमाणे मयदानव नावाच्या असुराने देवांच्या सेनेवर विषप्रयोग केला आणि इंद्राने त्या सैनिकांना या झर्याची निर्मिती करून त्याच्या पवित्र पाण्याने परत जिवंत केले. त्यामुळे लोक या पवित्र तीर्थावर डुबकी घेऊन पुण्य कमावायला आणि रोगमुक्तीसाठी येतात. मंदिराच्या आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शिलालेखांप्रमाणे या जागेचे नाव वेगवेगळ्या काळांत "तिर्ता री ऐर हांपुल", "तिर्ता हांपुल" व "तिर्ता एंपुल" असे बदलत गेले आहे. त्यातल्या पहिल्या नावाचा अर्थ "जमिनीतून बाहेर येणारे पाणी" असा आहे. मंदिराच्या आवारात शिरल्या शिरल्या खुद्द देवांचा राजा इंद्र आपले स्वागत करतो......
इथले दुभंगव्दार इंद्राच्या नावाला शोभेल असे भव्य आणि कोरीवकामाने भरलेले आहे. त्याच्या मागे दिसणारा मंदिराचा हिरवागार परिसर मन प्रसन्न करतो...
आत शिरल्या शिरल्या एका बाजूने बालीनीज ढबीत हिंदी गाणी ऐकू आली. त्या बाजूला पाहिले तर एक बाली महिला गात होती. आश्चर्याने थांबून ऐकू लागलो तर तिने धडाधड आठ-दहा गाण्यांचे मुखडे म्हणून दाखवले. हे सगळे केवळ भारतीय लोक (आम्ही) दिसल्याने गमतीने चालले होते. आमचा फोटो काढा असे म्हणून खरंच फोटो काढताना मात्र बाईसाहेबांनी चेहरा झाकून घेतला...
हिंदी चित्रपट आणि गाणी बालीत खूप लोकप्रिय आहेत याचे प्रत्यय पुढेही येत राहिले.
.
देवळाच्या आवारात शिव, विष्णू, ब्रम्हा, बातूर पर्वत आणि इंद्राची देवळे आहेत. भाविकांना आराम करण्यासाठी एक मोठा सुंदर सजावट केलेला मंडप आहे...
मंडप
पुरा तिर्ता एंपुलचे कोरी अगुंग
...
पुरा तिर्ता एंपुलमधिल अजून दोन कलापूर्ण व्दारे
पवित्र कुंड
...
...