पेरी-पेरी (बटरफ्लाय) चिकन
राम राम मिपाकरहो.
उद्या रविवार त्यात परत एकादशी, संकष्टी वैग्रे ही काही नाही. तेव्हा कोंबडी हाणायला कुणाची हरकत नसावी. काय म्हणता ? ;)
ईथे बाहेर मस्त धो धो पाऊस कोसळतोय. काही तरी झणझणीत चापायची इच्छा होतेय.
आज फार दिवसांनी मुड ही लागलाय. (त्यात आम्ही वार पाळत नसल्याने आम्हाला एक संकष्टी सोडली तर सगळे दिवस सारखेच.)
काय मग करायची का सुरवात?
पेरी पेरी सॉस
साहित्यः
लाल मिरच्या (मिरच्यांची संख्या त्यांच्या तिखटपणाच्या तीव्रतेवर अवलंबून.)
मी habanero peppers वापरल्यात.
एक लहान कांदा.
एक गड्डा लसुण.
एका लिंबाचा रस.
२ लहान चमचे काळीमीरी पुड
३ मोठे चमचे पेपरीका (नसल्यास काश्मीरी लालतिखट) याने रंग चांगला येतो.
१/२ कप व्हिनेगर.
१/२ लहान चमचा साखर (ऑप्शनल. व्हिनेगरचा उग्रपणा कमी करण्यासाठी.)
१/२ कप तेल. (ऑलिव्हच असल्यास उत्तम)
चवी नुसार मीठ.
कृती :
मी वापरलेल्या मिरच्या अतीजहाल असल्यामुळे त्यांचा तिखटपणा थोडा कमी करण्यासाठी व एक स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी या मिरच्या शेगडीवर भाजुन आणि नंतर सोलून घेतल्या.
(कांद्याचा कच्चटपणा घालण्यासाठी कांदा थोडा परतुन घेतला होता.)
सॉससाठी म्हणुन लागणारे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये वाटुन घेतले.
तयार सॉस बाटलीत बंद करुन फ्रीजमध्ये ठेवल्यास ४-५ आठवडे सहज टिकतो.
शक्य असल्यास हा सॉस आदल्या दिवशी करुन ठेवावा. मुरल्यावर याची चव अधीक खुलते.
कोंबडी स्वच्छ धुवून घेतली. तिच्या पाठीच्या कण्याकडचा भाग खालील चित्रफितीमध्ये दाखवल्या प्रमाणे कापून टाकला. (सुपसाठी स्टॉक बनवायचा असल्यास याचा काढुन टाकलेल्या भागाचा वापर करता येईल.)
चिकन ब्रेस्टमध्ये असणारं हाड/कुर्चा काढुन टाकल्यास चिकन एकदम फ्लॅट होतं.
कोंबडीला चरे देऊन चवी नुसार मीठ भुरभुरलं. तयार असलेला पेरी-पेरी सॉस लावून किमान ३-४ तास मुरत ठेवलं.
ओव्हन १० मिनिटं २००°C वर प्रीहिट करुन घेतला. आणि नंतर मुरवलेली कोंबडी आत अंदाजे ६०-८० मिनीटं शिजत ठेवली. (कोंबडीच्या आकारावर शिजण्यासाठी लागणारा वेळ कमी जास्त करावा.)
चियर्स.
वाचन
26365
प्रतिक्रिया
0