मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महंमद इक्बाल यांची उर्दू शायरी

मनिष · · जनातलं, मनातलं
दुर्दैवाने काही लोकांच्या मते उर्दू शायरी ही मद्य आणि प्रेयसी ह्यांच्याभोवतीच घोटाळत राह्ते. अर्थातच अर्वाचीन उर्दू साहित्यात विविध विषयांवर लेखन झाले आहे, पण सामन्य मराठी मणसांपर्यंत ते पोहोचले नाही असे वाटते. बर्‍याच वेळा त्यांचा पुर्वदुषित दृष्टिकोनही ह्याला कारणीभूत असतो. असो. वास्तविक पाहता उर्दू भाषेतील अतिशय सुंदर कल्पनाविलास, अप्रतिम प्रतिमा, हळव्या, नाजुक कविकल्पना इतर भाषांमधे अभावानेच सापडतील. उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. वरवर पाह्ता सहज वाटणार्‍या ओळींमधेही गहन अर्थ दडलेला असतो - उर्दू काव्य हे समजावून घेऊन आस्वाद घेण्याचे आहे. It's more of interpretation and understanding context and concepts behind, it may not appeal instantly - but it grows on you! ते येरागबाळ्याचे काम नाही. पुरोगामी उर्दू लेखकांमधे कैफ़ी आज़मी, महंमद इक्बाल हे काही महत्वाचे लेखक आहेत. ह्या लेखात महंमद इक्बाल ह्याच्या रचनेबद्द्ल काही लिहायचा प्रयत्न केला आहे. डॉ. महंमद इक्बाल साधारणपणे ओळ्खले जातात त्यांच्या "सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ताँ हमारा" मुळे. पण त्यांच्या असाधारण प्रतिभेची, विद्व्तेची उदाहरणे त्यांच्या रचनेत कित्येक सापडतात. हे त्यांचे काही ’अशआर’ (शेर चे अनेकवचन) अर्थासहित (काही संदर्भ डॉ. सुरेशचंद्र नाड्कर्णी यांच्या "ग़ज़ल" ह्या पुस्तकातुन) -
मोती समझकर शाने-करीमीने चुन लिये क़तरे जो थे मेरे अर्क़े-इन्फ़आ़लके।
अर्थ : "माझ्या पश्चाताप्दग्धतेचे जे अश्रुंचे थेंब जमिनीवर पडले, ते परमेश्वरानेही मोती म्हणून वेचून घेतले." हा सुरेख कल्पनाविलास पहा -
सूरजने जाते, जाते शामे-’सियह क़बाको तश्ते-उफकसे लेकर लालेके फूल मारे। पहना दिया शफक़ने सोनेका सारा ज़ेवर कुदरतने अपने गहने चांदीके सब उतारे।
अर्थ : "मावळतीच्या सूर्याने जाता जाता कृष्ण्वसना संध्येच्या अंगावर क्षितिजाच्या तबकातील लाल फुले उधळली. आकाशगंगानी आपले सोन्याचे अलंकार तिच्यावर चढवले आणि निसर्गाने आपले चांदीचे दागिने (पांढरशुभ्र सुर्यप्रकाश) उतरवूने ठेवले. अल्लामा इक्बाल यांची "हक़ीक़ते-हुस्न" नावाची एक अप्रतिम रचना आहे (सौंदर्य परमेश्वरला विचारते, ’तू सौदर्याला अमरत्व का दिले नाही?’ आणि परमेश्वर त्याला नश्वरतेबद्द्ल सांगतो) , त्यातील काही अशआर -
है रंगे-तगय्युरसे जब नमूद इसकी वही हसीन है हक़ीकत ज़वाल है इसकी।
अर्थ : "असलेलं मोडून त्या जागी नवीन निर्माण होणे, अशा अविरत बदलातूनच हे जग घडलेले आहे, आणि म्हणूनच ज्याचा ‍र्‍हास होत जातो (जे नाशवंत असते), ते सुंदर असते."
कहीं क़रीब था, ये गुफ्तगू क़मरने सुनी फ़लकपे आम हुवी, अख्तरे-सहरने सुनी। सहरने तारेसे सुनकर सुनायी शबनमको फ़लककी बात बता दी ज़मींके महरमको।
अर्थ : "चंद्र जवळच कुठेतरी होत, त्याने ही कानगोष्ट ऐकली आणि मग सा‍र्‍या नभांगणात ही गोष्ट पसरली; ती पहाटेच्या तार्‍याने ऐकली... पहाटेने तार्‍याकडून ऐकून ही गोष्ट दवबिंदूंना सांगितली आणि (मग) हे आकाशातील रहस्य जमीनीवरच्या मर्मज्ञांना कळले." इक्बाल ह्यांच्या सुरवातीच्या रचनात प्रखर राष्ट्र्प्रेम दिसते, त्यांच्या प्रसिद्ध रचनेच्या ह्या ओळी बघा -
तंग आके मैने दैरो-हरमको छोडा वाइज़का वाज़ छोडा, छोडे तेरे फसाने। पथ्थरके मूरतोंमें समझा है तू खुदा है खांक़े वतनका मुझको हर ज़र्रा देवता है!
अर्थ : "कंटाळून मी शेवटी मंदिर-मशीद वगैरे सोडून दिलंय, मौलवीचा उपदेश आणि तुझे पुराण ऐकणे देखील सोडून दिले आहे. त्या पाषाणाच्या मुर्तीत देव आहे असे तुला वाटते, पण देशाच्या मातीचा प्रत्येक कण मला देवासमान आहे." इक्बाल यांच्या "असरारे-खुदी" ह्या त्यांच्या पर्शियनमधील ग्रंथाचा इंग्रजीमधे अनुवाद झाला, आणि त्यासाठी त्यांना "सर" हा किताबही इंग्रजांकडून मिळाला. "अल्लामा" हे त्यांना लोकांनी दिलेले संबोधन - त्याचा अर्थ विद्वान अथवा पंडित असा घेता यईल. "खुदी" (आस्मिता, स्वाभिमान ह्या अर्थाने) बद्दल ते म्हणतात -
खुदीकी है ये मंज़िले-अव्वलिन मुसाफिर तेरा नशेमन नहीं। तेरी आग इस खाकदाँसे नही जहाँ तुझसे है, तू जहांसे नही।
अर्थ : "हा आस्मितेचा पहिलाच टप्पा आहे, हे तुझे ठिकाण/विसावा (अंतिम ध्येय) नाही. तुझी ज्योत/आग (प्रेरणा, चैतन्य ह्या अर्थाने) ह्या मातीतली नाही. तुझ्यामुळे जगाचे अस्तित्व आहे, तू ह्या जगामुळे नाहीस." त्यांची प्रतिभा सर्वस्पर्शी होती आणि त्यांच्या कित्येक रचना त्यांच्या विद्वत्तेची, तत्वज्ञानातील अभ्यासाची ग्वाही देतात. उर्दू शायरीतील कित्येक रचनांप्रमाणे त्यांच्या रचनांतूनही कित्येक अर्थ निघतात, आणि वरवरच्या अर्थापलिकडे खूप काही सांगून जातात. त्यांचा अजून एका प्रसिद्ध रचनेतील (’एक नया शिवाला’) हे काही अशआर -
आ गै़रियतके पर्दे इक़ बार फिर उठा दें बिछडोंको फिर मिला दें, नक़्शे-दुई मिटा दे। सूनी पडी हुवी है, मुद्दतसे दिलकी बस्ती आ इक नया शिवाला इस देसमें बना दें। दुनियाके तीरथोंसे उँचा हो अपना तीरथ दामाने-आसमाँसे इसका कलस मिला दें। हर सुबह उठके गाएं मंतर वो मीठे मीठे सारे पुजारीयोंको मय प्रीतकी पिला दें। शक्ति भी शांती भी भक्तोंके गीतमें है धरतीके बासियोंकी मुक्ति प्रीतमें है!
सोपी रचना आहे, त्यामुळे संपुर्ण अर्थ द्यायची गरज नाही, काही कठीण शब्दाचे अर्थ असे -
  • गै़रियतके = परकेपणाचे
  • नक़्शे-दुई = दुफळी, दुरावा
  • शिवाला = शिवालय, शिवमंदिर
  • दामाने-आसमाँसे इसका कलस मिला दें=ह्याचा कळस आकाशाला जाऊन भिडावा
  • मय=मद्य, मदिरा
असा हा विद्वान, प्रतिभावंत उर्दू शायर आणि लेखक, "डॉ. महंमद इक्बाल" उर्फ अल्लामा इक्बाल!! - मनिष दिवाना

वाचन 22691 प्रतिक्रिया 27