मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विक्रांत वरील आयुष्य २

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
विक्रांत ( किंवा कोणतीही विमानवाहू नौका) हे एक चालते बोलते शहरच असते. विक्रांत वर बेकरी होती आइस क्रीम तयार करता येत असे. तेथे तीन बेडरूम घरा एवढे कोल्ड स्टोअरेज होते. डॉक्टर म्हणून तुम्हाला तेथे प्रत्येक गोष्टीचे आरोग्यदायी वातावरण ठेवण्याच्या दृष्टीने पर्यवेक्षण फेरी(sanitary round)महिन्यात एकदा करावी लागत असे.यात स्वयंपाक घर जेवणाचा हॉल पासून अन्न आणि शिधा ठेवण्याच्या जागा सुद्धा तपासल्या जात असत. दर महिन्याला स्वयंपाकी आणि वाढपी यांची वैद्यकीय तपासणी असे त्यात त्याचे केस नखे पासून लघवी शौचाची तपासणी होत असे( कारण त्यांना कोणताही संसर्गजन्य रोग नाही याची खात्री केली जात असे) जो या चाचणीत नापास होत असे त्याला अन्न हाताळण्याची बंदी असे. मग अशा माणसाला फक्त झाडू मारणे खरकटी उचलणे असे खालच्या पातळीचे काम करावे लागे त्यामुळे जर डॉक्टर शिस्तीबाबत कडक असेल तर या (स्वयंपाकी आणि वाढपी) सर्व लोकाना एकदम काटेकोर राहावे लागे. याबाबतीत मी कोणतीच हयगय करीत नसे त्यामुळे वेळच्या वेळी त्यांची तपासणी होत होती. इतकी कि त्यांनी मासाहारी अन्न कापण्यासाठी वापरलेला लाकडाचा ओंडका रोजच्या रोज साफ करून त्यावर मीठ पसरून ठेवलेले असे.( त्यावर लागलेल्या रक्तावर जीवाणूंची वाढ होऊन अन्न विष बाधा होण्याची शक्यता असते) एकदा त्या लोकांना हि सवय लागली कि त्यानंतर त्यांना स्वतःला सुद्धा अस्वच्छता खपत नसे. विक्रांत मध्ये जेवण फारच सुरेख मिळत असे तेथे कायम अति महत्त्वाच्या व्यक्ती येत असत. त्यामुळे तेथे अशा पाहुण्यांसाठी मेजवानीचे जवळ जवळ ३०० मेनू वेगवेगळ्या कार्डावर छापलेले होते. त्यांचे वेगवेगळे मिश्रण करून अतिशय सुंदर मेनू तयार करून देत असत. श्री अनुप जलोटा यांनी एक कार्यक्रम करून अश्विनी रुग्णालयाच्या व्यसनमुक्ती केंद्राला १ लाख रुपये देणगी दिली होती तेंव्हा त्यांना विक्रांत वर कृतज्ञता पूर्वक मेजवानी दिली गेली होती. ते माझे वैयक्तिक पाहुणे म्हणून आले होते. पण जाताना जेवणावर अतिशय खुश होऊन गेले. विक्रांत मध्ये रोज ८५० सैनिकांसाठी जेवण बनवले जात असे आणि त्याचे खरकटे रोज चार ठिकाणाहून एकत्र होत असे या प्रकरणात तेथे झुरळे फार झाली होती. जहाजात बरयाच प्रमाणात लाकडी आणि लोखंडी पत्रे वापरात असत त्यांच्या फटीत हि झुरळे लपून राहत त्यामुळे त्यांचा नायनाट करणे हि एक डोकेदुखी होती. मी तेथे गेल्यावर पहिली दोन तपासणी फेर्यात हे मला जाणवले होते यावर काय करावे या विचारात मी असताना मला DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना)यांचे एक पत्र आले होते कि त्यांनी काही वेगळी किटक नाशके बनविली आहेत आणि त्यांची चाचणी घेण्यासाठी त्यांना काही जहाजे हवी आहेत.(दुर्दैवाने काय हि कटकट म्हणणारे लोक नौदलातही होते. त्यामुळे त्यांना बाकी कोणी प्रतिसाद दिला नव्हता. मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांना निमंत्रण दिले त्यापूर्वी जहाजाच्या कॅप्टन चे मला मन वळवावे लागले. त्या लोकांनी येउन तेथे धूर करणारी यंत्रे आणली शिवाय कोणतातरी रंग आणला होता आणि झुरलांसाठी गोळ्या पण आणल्या होत्या. हे तिन्ही गोष्टी त्यांनी तेथे वापरल्या आणि तीन तासांनी ते परत आले तर जेवणाच्या हॉलमध्ये, स्वयंपाकघरांमध्ये आणि स्टोर मध्ये झुरळांचा खच पडला होता.या ठिकाणांमध्ये एक चौरस इंच जागा शिल्लक नव्हती जेथे मेलेले झुरळ नव्हते. झाडून काढल्यावर तीन पोती भरून झुरळे कचर्यात टाकली गेली. आणि त्यानंतर जवळ जवळ वर्षभर हा झुरळांचा उपद्रव झाला नाही. काकतालीय न्यायाने याचे पूर्ण श्रेय मला मिळाले. त्या DRDO च्या शास्त्र ना मी कोणते औषध आहे ते विचारले तर ते ट्रेड सिक्रेट म्हणत होते अर्थात हे औषध नंतर पर्मेथ्रिन म्हणून उपलब्ध झाले. या झुरळ मारण्याच्या कामात यश आल्यावर मी मूषक नाशाकडे वळलो. त्याच DRDO कार्यालयाशी संपर्क साधून मी त्यांना उंदीर मारण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. ते ताबडतोब तयार झाले कारण विक्रांतच्या बारच्या blue रूम मध्ये प्यायलेल्या विदेशी मद्याचे आकर्षण त्यांना टाळणे अशक्य होते. deratting( मूषकनाश) करण्यासाठी तुम्हाला तीन दिवस जहाजातील पाणी बंद करावे लागते. उन्दिराना तहानलेले ठेवतात त्यानंतर काम्पौंड १०८०( सोडियम मोनो फ़्लुओरो असिटेट) हे (http://en.wikipedia.org/wiki/Sodium_fluoroacetate) औषध द्रावण स्वरुपात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जाते आणि ३ तासांनी मेलेले उंदीर उचलले जातात. हे औषध रंगहीन वासहीन आणि चवहीन आहे त्यामुळे उंदराना ते ओळखता येत नाही आणि ते पाण्याबरोबर ते घेतात ते इतके विषारी आहे कि उंदीर एक मीटर च्या परिघात मरून पडतो. असे अकराशे सत्तर उंदीर त्या दिवशी मारले गेले.या विषावर उतारा (जर कोणाला अपघाताने विषबाधा झालीतर) म्हणून व्हिस्की(काळा कुत्रा black dog) आणि व्हिनेगरची एक एक बाटली माझ्या कडे ठेवण्यात आली होती दुर्दैवाने काही उंदीर कुठेतरी फटीत जाऊन मेले त्यामुळे पुढे जवळ जवळ एक आठवडा विक्रांत च्या कोणत्या न कोणत्या कक्षात उंदीर मेल्याचा वास भरून राहिला होता. मि दोन्हि बाटल्या इमाने इतबारे परत केल्या. खरतर मद्य सचिव (वाइन सेक्रेटरी) मला सांगत होता कि हि बाटली (व्हिस्कीची) तुझ्या नावावर इशु झाली आहे आणि आता ती तुझी आहे. पण कोणतीही गोष्ट फुकट घेणे हि माझी सवय नाही ( आणि मी दारू पीत नाही ) त्यामुळे मी ती परत केली हि बातमी नौदलाच्या गोदीत बर्यापैकी पसरली. आणि एक दिवस विराट नौकेचा प्रमुख वैद्यकीय अधिकारी माझ्याकडून याचा तपशील घेऊन गेला. त्याने विराट मध्ये मूषक संहार केला आणि हि एक सनसनाटी बातमी म्हणून इंडिया टुडे या मासिकात आली. " विराट या युद्धनौकेत माणसांपेक्षा उंदरांची खानेसुमारी जास्त". क्रमशः

वाचन 22950 प्रतिक्रिया 46