मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ९)

चतुरंग · · जनातलं, मनातलं
ह्या आधीच्या मधुशालेच्या अनुवादात आणि ह्या भागात जास्त अंतर पडले आणि रसिकांना तिष्ठत रहावे लागले त्याबद्दल मी शरमिंदा आहे. ह्यापुढील भाग नियमितपणे देऊन मी हा भावानुवादाचा यज्ञ पूर्ण करू शकेन अशी आशा आहे! असो. चला घेऊयात आस्वाद पुढल्या भागाचा. -------------------------------------------------------- मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ८) - ह्याच भागात आधीच्या भागांचे दुवे दिलेले आहेत. --------------------------------------------------------- निसर्गातली वेगवेगळी रुपके घेतघेत पुढे जात असतानाच अचानक वेगवेगेळ्या कलांमधूनही रुपकांची स्फूर्ती बच्चनजींना मिळावी ह्यात नवल ते काय? वादक, राग-रागिण्या, वाद्ये त्याचबरोबर चित्रकार, चित्र, त्याचे रंग अशा रुपकांची खैरात पहिल्या दोन कडव्यातून करीत असतानाच तिसर्‍या कडव्यात ते पुन्हा निसर्गाकडे वळतात. बालकवी जसे आतूनच निसर्गप्रेमी होते तसेच काहीसे हे मला वाटते. हरिवंशराय सुद्धा त्यांच्या कल्पनेमधे निसर्गाशिवाय फार काळ दूर राहू शकत नाहीत. हिमाच्छादित पर्वतांना द्राक्षवेली संबोधताना ते पावन भारतभूमीला वंदन कधी करतात ते आपल्या लक्षातही येत नाही इतके सहज होऊन जाते! आणि शेवटच्या पाचव्या कडव्यात तर ते ज्वलज्जहाल अशा क्रांतिपुत्रांची वर्णी लावून आपल्याला थक्क करुन टाकतात. मधुशालेच्या ह्या रुपकांचा विस्तार बघितला तर त्यांच्या प्रतिभेने अचंबित व्हायला होते! (लागोपाठच्या कडव्यात एवढी टोकाची रुपके वापरणारी बच्चनांची प्रतिभा मला मिखाइल तालच्या बुध्दिबळातल्या प्रतिभेची आठवण करुन देते - सुरळित चाललेल्या लयबद्ध खेळात अचानक वजिराचे बलिदान देऊन पुढच्या काही खेळ्यात त्या डावाला अजरामर करुन टाकायचे! असेच काहीसे.) वादक बन मधु का विक्रेता लाया सुर-सुमधुर-हाला, रागिनियाँ बन साकी आई भरकर तारों का प्याला, विक्रेता के संकेतों पर दौड़ लयों, आलापों में, पान कराती श्रोतागण को, झंकृत वीणा मधुशाला।।४१।| चित्रकार बन साकी आता लेकर तूली का प्याला, जिसमें भरकर पान कराता वह बहु रस-रंगी हाला, मन के चित्र जिसे पी-पीकर रंग-बिरंगे हो जाते, चित्रपटी पर नाच रही है एक मनोहर मधुशाला।।४२।| घन श्यामल अंगूर लता से खिंच खिंच यह आती हाला, अरूण-कमल-कोमल कलियों की प्याली, फूलों का प्याला, लोल हिलोरें साकी बन बन माणिक मधु से भर जातीं, हंस मत्त होते पी पीकर मानसरोवर मधुशाला।।४३।| हिम श्रेणी अंगूर लता-सी फैली, हिम जल है हाला, चंचल नदियाँ साकी बनकर, भरकर लहरों का प्याला, कोमल कूर-करों में अपने छलकाती निशिदिन चलतीं, पीकर खेत खड़े लहराते, भारत पावन मधुशाला।।४४।| वीर सुतों के हृदय रक्त की आज बना रक्तिम हाला, वीर सुतों के वर शीशों का हाथों में लेकर प्याला, अति उदार दानी साकी है आज बनी भारतमाता, स्वतंत्रता है तृषित कालिका बलिवेदी है मधुशाला।।४५।| ----------------------------------------------- भावानुवाद वादक मधुविक्रेता देई मधुर सुरांच्या मदिरेला बनुनी साकी रागिणि येती भरुनि तार्‍यांचा प्याला विक्रेत्याच्या संकेतांवर धावत लय, आलापही ये श्रोत्यांना स्वरपान करी मग झंकृत वीणा मधुशाला ||४१|| साकी बनुनी चित्रकार धरी करी कुंचला जणु प्याला भरुनी देई त्यातुन मग तो बहु रस-रंगी मदिरेला मदिरा पुन्हा पुन्हा ती घेता रंगुनि जाई चित्र मनी चित्रामधुनी नाचे मग त्या एक मनोहर मधुशाला ||४२|| मेघसावळ्या द्राक्षवेलीतुन खेचुन बनते बघ हाला कोमल-अरुण-किरण करांनी, भरती सुमनांचा प्याला, बनुनी साकी झुळुका येती पुन्हा पुन्हा मधु घेऊन तो, हंस मत्त मग पिऊनी होती मानसरोवर मधुशाला ॥४३॥ हिम शिखरे जणू द्राक्षवेलही, हिमजल आहे जणु हाला, अचपल सरिता बनुनी साकी, भरती लहरींचा प्याला, करात कोमल घेऊन जाती हिंदोळत मग रातदिनी, डोलत पिऊनी शेते वसती, भारत पावन मधुशाला ॥४४॥ शूरवीरांच्या रुधिराची त्या लालबुंद बनते हाला मृत्युंजय त्या शूरशिरांचा घेऊन हाती जणू प्याला दानशूर अन उदार साकी बनुनी मग भारतमाता तृषित कालिका स्वतंत्रदेवी, अन बलिवेदी मधुशाला ||४५|| चतुरंग

वाचन 9202 प्रतिक्रिया 20