मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धडा पहिला.

गणपा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
विषय तसा थोडा नाजुकच. कितीही टाळायचा म्हटला तरी कधी ना कधी त्याला तोंड द्यावे लागणारच याची कल्पना ही होती. पण म्हणुन ती वेळ इतक्यातच येउन ठेपेल असा अंदाज नव्हता. तस पाहिलं तर मागे 'थ्री ईडियट्स' पहातानाच (टायटलमध्ये स्पर्म्सची कार्टुन रेस दाखवली आहे ती पाहुन ) हे काय म्हणुन तिनं विचारलं. परत त्याच चित्रपटात शेवट जवळ येताना जो धुमाकुळ चालु होता तेव्हा ही चेहेर्‍यावर बर्‍याच प्रश्नचिन्हांचं जाळं पसरलेलं होत. त्यावेळी काही तरी थातुर मातुर उत्तर देउन टाळलं होतं. पण नांदी तेव्हाच झाली होती. गेल्या आठवड्यात एका सॅनिटरी नॅपकीन ची जाहिरात पाहुन बराच काळ तुंबलेला प्रश्न बाहेर आलाच. 'ह्या मोठ्या बायकापण 'डायपर' का घालतात?' त्यावर काही बायकांना कधी कधी एखादा प्रॉब्लेम असतो म्हणुन घालतात असं उत्तर देउन वेळ मारुन नेली होती. परवा तिनं विचारलं 'बाबा, कौन्सेलिंग म्हणजे काय?' उत्तर देण्या पुर्वी नक्की कसल्या संदर्भात हा प्रश्न आहे हे कळावं म्हणुन मी विचारलं 'कुठे ऐकसलास गं हा शब्द?' तर म्हणे शाळेत नवीन तास चालु होणार आहे कौन्सेलिंगचा. मग तिला समजेल अश्या शब्दांची जुळवा जुळव करत म्हटलं की एखादी अडचण, समस्या वा न समजलेली गोष्ट समजावुन सांगणे, अडचणींवर उपाय सुचवणे म्हणजे कौन्सेलिंग. माझ्या नशिबानं बाईसाहेबांचं तेवढ्याने समाधान झालं आणि माझी सुटका झाली. काल रात्री झोपताना तिने आईला एक बाउंसर टाकला. 'आई, बाळ आईंच्या पोटात असतं ना?' 'हो' बेसावध सौ उत्तरली. 'मग ते बाहेर येत कुठुन?' रात्री पांघरुणात शिरण्याची वेळ, त्यात परत सकाळी तांबडं फुटायच्या आत उठायच. शिवाय हा विषयही काही २ मिनिटांत संपणारा नव्हता. त्यामुळे उद्या बोलु आता उशीर झालाय अशी बोळवण करत सौनी झोपण्याचे आदेश दिले. पण लेकीचं समाधान झालं नाही. मग नाईलाजाने म्हणाली 'जाऊ दे. उद्या कौन्सेलिंगच्या तासाला सरांनाच विचारते.' तिचा तो आवेश पाहुन त्या सरांचा कावरा बावरा झालेला चेहेरा सौच्या डोळ्या पुढेच उभा राहिला. आता हे कुतुहल दडपण्यात अर्थ नाही हे सौला उमजुन चुकलं. झालं... परत मनातल्या मनात शुब्दांची जुळवा जुळव करत बायको म्हणाली. 'आईंच्या पोटात एक पिशवी असते. बाळ त्या पिशवीत असतं. त्या पिशवीला एक ओपनींग असतं, अन योग्य वेळ झाली की त्यातुन बाळ बाहेर येत. आता हेच बघ आपला घाम बाहेर येण्यासाठी कशी त्वचेला लहान लहान भोकं/ पोअर्स असतात की नाही, तसचं काहीसं.' "पण हे ओपनींग नक्की असते कुठे?" हे लेकीचं पालुपद सारखं चालुच होतं. तिचं कुतुहल काही शमे ना. किती ही टाळायचं म्हटलं तरी ही हे बुमरँग टाळता येण्या सारखं नव्हतं. शेवटी सौंनी शरणागती पत्करली आणि खरं खरं काय ते सांगण्याचं ठरवलं. अश्या प्रकारे आमच्या घरात 'सेक्स एज्युकेशनचा' धडा पहिला गिरवायला घेतला आहे. आता 'ते बाळ आत जातच कसं?' हा पुढचा प्रश्न लवकरच येणार असल्याची पुर्ण खात्री असल्याने त्या दिशेनेही उत्तरांची जुळवा जुळव चालु आहे. जर तुमच्या पैकी कुणी या अश्याच प्रश्नांना सामोरं गेलं असेल तर त्या बद्दल जाणुन घ्यायला नक्की आवडेल.

वाचन 36967 प्रतिक्रिया 63