मानवी जीवनात धर्माचे स्थान काय?
मिपाकर मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देतील अशी अपेक्षा आहे.
शंकराचार्यावरचा धागा आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचल्या. त्या धाग्यात म्हटले आहे की आपल्या सर्वोच्च धर्मगुरूंविषयी किंवा धर्माविषयी हिंदूंइतके औदासिन्य दाखविणारा दुसरा समाज नसेल!! खरे तर मला "मानवी जीवनात धर्माचे स्थान काय" हा मुद्दा त्याच चर्चेत मांडायचा होता.पण चर्चा अजून भरकटायला नको म्हणून नवा धागा काढत आहे.
मुळात धर्माची स्थापना का झाली असावी?माणूस गुहेतून बाहेर आला, समुदाय करून राहायला लागला, शेती करायला लागला त्यावेळी समाजात अर्थातच राजसत्ता नव्हती.जर कोणी दुसऱ्यावर अन्याय केला तर त्याबद्दल जाब विचारायला काही यंत्रणा नव्हती.बळी तो कान पिळी असाच न्याय त्यावेळी असायची शक्यता जास्त.अशा वेळी समाजातील जाणत्या लोकांना अशा प्रकारचा लगाम घालणारी एखादी यंत्रणा असावी असे वाटायला लागले तर ते नवल नाही. यातूनच नक्की कोणती वर्तणूक योग्य आणि कोणती अयोग्य याबद्दल नियमावली पुढे आली. समाजातील ज्या घटकांना अशी नियमावली मान्य नसेल त्या घटकांसाठी "तू नियम मोडलेस तर तुला पाप लागेल" या धर्तीवर पाप-पुण्याची आणि सगळ्यांच्या पाप-पुण्याचा हिशेब ठेवणारी शक्ती म्हणून देवाची संकल्पना पुढे आली. नंतरच्या काळात या नियमांमध्ये कालपरत्वे बदल करून, त्यात भर टाकून एक प्रकारची आचारसंहिता तयार झाली असावी आणि यालाच धर्म असे म्हटले गेले. तेव्हा धर्म म्हणजे समाजात वावरताना पाळायचे नियम. आणि हे नियम अनेक शतकांच्या अनुभवातून तयार झालेले असून अपरिवर्तनीय अजिबात नाहीत.
सध्याच्या काळात माणसाची मोबिलिटी आहे तेवढ्या प्रमाणात पूर्वीच्या काळी नव्हती.तसेच सर्व कामे हातानेच करायला लागत. केस कापण्यापासून कपडे शिवण्यापर्यंत अनेक गरजा पूर्ण करायला यंत्रे नाहीत की बाहेर कुठे जाऊन काम होणाऱ्यातले नाही की बाहेरचे कोणी येऊन ते करायची शक्यता नाही. तेव्हा ही कामे गावातल्या गावातच करून द्यायला जीवनाची एक गरज म्हणून सुतार, लोहार, सोनार आणि इतर कामे करणारे बलुतेदार आले.लिहायला-वाचायला शिकविणे हा एक पेशा झाला. तसेच परकीय आक्रमणांपासून संरक्षण करायला सैनिकी पेशा आला आणि इतर कामे करायला विविध पेशे आले. आणि या सगळ्या पेशातील लोकांनी काय करावे यासाठी नियमावलीत बदल केले असायची शक्यता आहेच.
या सगळ्या व्यवस्थेत तक्रार करण्यासारखे फारसे काहीच नाही.पण नंतरच्या काळात हे सगळे व्यवसाय पिढीजात झाले. म्हणजे झाडूवाल्याच्या घरी जन्माला आलेल्याला आयुष्यभर झाडू मारायचेच काम करायचे!! मला वाटते की अवनतीला सुरवात त्यापासून झाली. म्हणजे एखाद्याला वेगळे काही करायचे असेल तरी ते कसे करणार? आपल्या नियमावलीत (धर्मात) ते म्हटलेले नाही ना? यातूनच अत्यंत रिजिड अशा जाती निर्माण झाल्या.मग त्या जातींचे अभिमान आले. नियम मोडले तर शिक्षा करायला देव बसला आहे त्या देवाची आराधना करून त्याला खूष ठेवायला हवे हा विचार पुढील काळात बळावला.मग त्यासाठी विविध पूजा-अर्चा, कर्मकांडे, व्रतवैकल्ये आणि इतर अनेक प्रकार आले आणि सगळेच कडबोळे झाले. बरं हे सगळे काही हजार वर्षांच्या काळात evolve झालेले.मुळातले काय आणि घुसडलेले काय हे तपासायला गेले तर त्याचे उत्तर सापडणे केवळ अशक्य.तेव्हा समाजात नितीमत्ता राहावी या उद्देशाने तयार केलेल्या नियमांबरोबरच देवाला खूष करायला केलेली कर्मकांडे, जातीपाती या सगळ्यांची भेसळ "धर्म" या प्रकारात झाली.
सध्याच्या काळाचा विचार केला तर आपल्याला दिसून येईल की समाजात नितीमत्ता ठेवायला योग्य प्रकारे बनविलेले कायदे आणि ते कायदे योग्यपणे राबविणारी पोलीस आणि न्यायसंस्था ही घराबाहेरील जीवनासाठी आणि घरातील जीवनासाठी भारतातच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चांगल्या गोष्टी: कुटुंबियांची एकमेकांविषयीची कर्तव्ये वगैरे गोष्टी पुरेशा आहेत. मुळातला धर्म तरी काय वेगळा होता? संपूर्ण महाभारताचे सार व्यासांनी एका ओळीत सांगितले आणि ते म्हणजे "दुसऱ्याच्या उपयोगी पडणे म्हणजे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे पाप". मुळातला धर्म यापेक्षा वेगळा असेल असे वाटत नाही.
तेव्हा मिसळपावसारख्या वेबसाईटवर लेखन करणाऱ्या (म्हणजे सुशिक्षित आणि चांगले-वाईट काय याचा विचार करायची क्षमता असलेल्या) वर्गाच्या दृष्टीनेतरी ज्याला सध्या धर्म म्हटले जाते त्या कडबोळ्याचा उपयोग काय?देव म्हणावा तर तो पण "पाप-पुण्याचा अकाऊंटंट" म्हणून माणसानेच जन्माला घातलेला.तेव्हा त्याला खूष ठेवायला केलेल्या पूजा-अर्चा पूर्णपणे निरर्थक.समाजात वावरायचे नियम म्हणाल तर सध्याच्या काळाला अनुसरून असलेले जास्त योग्य नियम सध्याच्या कायद्यात बघायला मिळतील. (कायदा चुकीचा आहे असे कोणाला वाटत असेल तर अधिक योग्य कायदे आपल्यालाच बनवता येऊ शकतात/शकतील). आणि एखाद्या घरी जन्माला आल्यामुळे ते कडबोळे खायला मिळत असेल तर त्याबद्दल वाटणारा अभिमान ही आणखी अनाकलनीय गोष्ट.कारण त्या कडबोळ्याचा गाभा (सद्वर्तनाचे नियम) इतर घरात जन्माला आलेल्यांकडे नसतो हे म्हणणे अतिशय चुकीचे आहे.
तेव्हा सध्याच्या काळात धर्म आणि देव हा प्रकारच रद्दबादल केला तर नक्की काय बिघडेल?व्यक्तिश: माझे तरी त्यामुळे अजिबात काहीही बिघडणार नाही.कारण कोणतेही प्रलोभन किंवा कोणतीही भिती नसेल तरी इतर कोणालाही त्रास देऊ नये आणि शक्य तेवढे इतरांच्या उपयोगीच पडावे असे मला मनापासून वाटते (ते अंमलात किती आणणे शक्य होते ही गोष्ट वेगळी). आणि ही गोष्ट फार स्पेशल अशी नक्कीच नाही तर माणसामध्ये असलेला हा किमान चांगुलपणा आहे. तो धर्म या संकल्पनेचे नावही न ऐकलेल्या लहान मुलांमध्येही बघायला मिळतो. तसेच देवाला खूष ठेवायचे म्हणाल तर गणेशोत्सवात आमच्या पुण्यात होणाऱ्या कर्णकर्कश धांगडधिंग्याचा किंवा कधी मुंबईला गेलो तर लोकल ट्रेनमध्ये म्हटल्या जाणाऱ्या भजनांचा मला स्वत:ला तर त्रासच होतो आणि हे प्रकार नसते तर किती बहार आली असती असेच मला वाटते.मी कधीही कोणतीही पूजा करायला जात नाही की कोणतेही स्तोत्र म्हणत नाही.
तेव्हा धर्म आणि देव या दोन्ही गोष्टी कॅन्सल करून टाकल्या तरी मला स्वत:ला त्याचा काहीही फरक पडणार नाही (किंबहुना वैयक्तिक पातळीवर मी या दोन गोष्टी कधीच कॅन्सल केल्या आहेत). इतर मिसळपावकरांना याविषयी काय वाटते? धर्माचे आपल्या जीवनातील नक्की स्थान काय?
वाचन
27700
प्रतिक्रिया
88