पिंगळावेळ आणि आमचा आम्रविका खंडाचा सूक्ष्म - प्रवास
अलिकडे पौराणिक विमाने, लिंगदेहाने केलेला मंगळग्रहाचा प्रवास इ. विषयी वाचून आमच्या मनाने घेतले, की आपणही असा प्रवास करावा, आणि प्राचीन काळचे जग कसे होते, ते बघावे... अमेरिकेच्या स्थूलदेहाने केलेल्या प्रवासात आम्हाला सर्वत्र एकसारखी शहरे, बाजारादि दिसले होते, परंतु आमची प्राचीनत्वाची हौस त्यातून भागली नव्हती...सूक्ष्म देहाने जावे ???
परन्तु कसे? आपण काही त्या थोर नर्तकांसारखे ब्रम्हर्षी वा प्रज्ञाब्रम्ह वगैरे नव्हे, मग हे जमायचे कसे?
तेवढ्यात आठवले की मागे एकदा एका कठीण प्रसंगी आपण आपल्या दिवंगत माता-पित्यांना आवाहन केले होते, मग त्यांनी आवाहनास साद देउन मार्गदर्शन केले होते ... असे आत्मे भल्या पहाटे पिंगळावेळेस पिंगळ्याच्या रूपात आपल्या घरासमोर बसून आपल्याला साद देतात, हे अनुभवाने ठाऊक झालेले होतेच, मग रात्री झोपताना अगदी उत्कट इच्छा केली, की उदईक पहाटे त्यांनी पुन्हा एकदा दर्शन द्यावे.
...हाच तो आत्म्यांचा संदेश आणणारा पिंगळा:
दुसरे दिवशी पहाटे पिंगळा बोलला, आणि अर्धवट जाग आली. आत्मे पिंगळ्यामार्फत आपल्याला संदेश देतात, आपण डोळे न उघडता, हालचाल न करता मन एकाग्र करायचे, म्हणजे आत्म्यांशी संपर्क होतो...
...समोर अनेक वर्षांपूर्वी दिवंगत झालेले माता-पिता सुहास्य वदनाने उभे होते.... त्यांना साष्टांग दंडवत घालून मी कश्यासाठी पाचारण केले, ते सांगितले, तेंव्हा ते म्हणाले की अरे, यासाठी तुला पुरुषोत्तम चांगली मदत करील, थांब त्याला बोलावितो ... असे म्हणण्याचा अवकाश, की लगेचच समोर 'ताजमहाल म्हणजे तेजोमहाआलय' इत्यादि ग्रंथांचे कर्ते, सुप्रसिद्ध पु.ना. ओक प्रकट झाले, . मी त्यांना वंदन करून म्हटले, की मला अमेरिका देश फार पूर्वी कसा होता, हे बघायचे आहे, त्यावर ते म्हणाले, की चल, आताच जाउया आपण.
त्यांनी मला " ओम र्हीम र्हूम काल भैरवाय नमः ओम र्हीम र्हूम कालप्रवासार्थ सज्यामि" असा मंत्र म्हणायला सांगितले..... मी मंत्रजाप सुरु करताच एकदम भोवतालचे वातावरण बदलत गेले, सोसाट्याचा वारा सुटल्यागत आवाज येऊ लागला आणि मी पुनांसह एका नवीनच जागी होतो, असे आढळले.
हीच ती जागा:
"हे बघ, आपण अनेक शतकांपूर्वीच्या अमेरिकेत आलेलो आहोत... पुना म्हणाले... त्याकाळी यास 'आम्रविका' असे नाव होते,
आणि आपल्या भारतास "इंदुस्थान" म्हणत....
हे ऐकून मला वाटलेले आश्चर्य ताडून ते म्हणाले, ..."ज्यास सांप्रत काळी अमेरिका म्हणण्याचा प्रघात आहे, त्याचे मूळ नाव 'आम्रविका' होय. याची उपपत्ती अशी, की प्राचीन काळी अपरांतक अथवा कोकण प्रदेशातून उत्तम प्रतीचे हापूस आम्र या आम्रविका देशात जहाजे भरभरून पाठविले जात. चितळे, आपटे, केळकर आदी चित्पावनांची मोठमोठी जहाजे असत. 'अमेरिका खंड' हा शब्द प्रयोग देखील 'आम्रखंड' वरून प्रचलित झालेला आहे.
या खेरीज ओक घराण्यातील व्युत्पन्न ब्राम्हण आम्रविकेतील बहुत लोकांच्या ताडपट्टीवरील नाड्या इकडे पाठवून त्यांना त्यांच्या पूर्व-जन्मांतील पापांचे स्मरण करवून देत, व त्यावरील उपाययोजना सांगत. ओक घराण्याचा दबदबा एवढा, की आज देखील 'शर्मन ओक' 'ओकल्यांड', 'सिल्व्हर ओक' इत्यादी जागा प्रसिद्ध आहेत. ओकांनी लाविलेले हजारो 'ओक वृक्ष' अमेरिकेत आहेत.... बघ तिकडे पलीकडे आहेत ओक वृक्ष...
चित्र: अमेरिकेतील ओक वृक्ष
पुना पुढे म्हणाले :"आंब्याखेरीज हिंदुस्थानातून इतर अनेक जिन्नस पाठवले जात. उदाहरणार्थ हिंग. हा त्याकाळी हिंदुस्थानाचाच एक भाग असलेल्या अफगाणी लोकांचे प्रदेशातून येई. ( 'अफगाणी' या शब्दाची उपपत्ती अशी, की तेथे अफूचे उत्पादन फार, सबब तेथील लोक अफूची निशा करून गाणी म्हणत हिंडत, त्यांस 'अफुगाणी' म्हणत). हिंगाचा व्यापार एवढा चाले, की हा व्यापार करणार्या लोकांचे अंगास अहोरात्र हिंगाचा वास येई. त्यावरून त्या लोकांचे आडनाव 'वास-हिंग-तन' असे पडिले, ते आजमितीस 'वॉशिंगटन' म्हणून प्रचलित आहे. या नावाचे एक गाव पूर्वी असे, ते पुढे आम्रविकेची राजधानी झाले.
त्याकाळचे पुरुषांस बटकी, कुळंबिणी, अंगवस्त्रे इत्यादिंचा सोस फार. याकारणे जारज प्रजाही अमाप. सबब तेथील पुरूषांचे 'जारज' हे नाव बहुत प्रचलित असे, उदाहरणार्थ 'जारज वास- हिंग- तन' ह्यास हल्ली 'जॉर्ज वाशिंगटन' असे म्हणतात....
हे सर्व ऐकून मी थक्कच झालो, मी त्यांना सांगितले, की मी पूर्वी अमेरिकेतील पिट्सबर्ग, न्यूयॉर्क वगैरे शहरे बघितलेली आहेत, त्यावर ते म्हणाले, अरे, पिट्सबर्ग म्हणजे पीतस-दुर्ग, इथे भारतातून वारेमाप हळद येई, त्यामुळे इथला किल्ला अगदी पिवळाजर्द झाला होता, आणि ज्याला आता न्यूयॉर्क म्हणतात, त्याचे मूळ नाव 'नऊअर्क' इथे इंदुस्थानातून नऊ प्रकारचे आयुर्वेदिक अर्क मोठ्या प्रमाणावर येत.... ते बघ नव-अर्क बंदर.
मला हे सर्व काही खरे वाटे ना, तेंव्हा ते म्हणाले, चल तुला प्रत्यक्षच दाखवतो... ते बघ आंबे घेउन येणारे जहाज, आणि माल उतरून घेण्यास नावेतून चाललेले आम्राविकन लोक.
हे बघून मात्र माझी खात्री पटली....
...परंतु भारत देशास 'इंदूस्थान' म्हणत, हे काय गौडबंगाल ? या माझ्या प्रश्नावर पुना म्हणाले " अरे, प्राचीनकाळी भारतातून नियमित पणे चंद्रावर आपली अंतराळयाने जात. त्यांना "इंदुयान" म्हणत. त्यामुळे ज्या देशात अशी 'इंदुयाने' असत, तो देश 'इंदूस्थान' म्हणून विख्यात झाला. ते बघ आकाशात उडणारे इंदुयान ...
आणि ते बघ खुद्द आम्रविकेत आलेले एक लहान इंदुयान...
तेवढ्यात, " अरे, आता मला जायला हवे, कारण इंद्र देवाने माझ्यावर त्या अल्ला आणि गॉड च्या प्रदेशातील बित्तंबातमी काढून आणण्याची गुप्त कामगिरी सोपवलेली आहे, तिथे जाणे मला आता भाग आहे, तू पुन्हा ये, मग तुला आणखी गोष्टी दाखवेन...." असे म्हणोन पुना अंतर्धान पावले, आणि मला पण पूर्ण जाग आली... मग मी ठरवले, की आता पुढल्या वेळी आपण रोम, फ्रान्स वगैरेची काल-यात्रा करायची.... (क्रमशः)
वाचन
16129
प्रतिक्रिया
44