मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जगणे सुरात आले

गंगाधर मुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

दुखवू नये कधीही मनभावना कुणाच्या
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले

मतला, रदीफ, यमके, बहरास योजताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले

का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले

कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!

                                          - गंगाधर मुटे
---------------------------------

वाचन 6535 प्रतिक्रिया 0