मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असा आहे आमचा शेतकरी

गंगाधर मुटे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

असा आहे आमचा शेतकरी


              मुंबईतील 'चतुरंग प्रतिष्ठान' संस्थेचा या वर्षीचा सामाजिक क्षेत्रासाठी असलेला 'जीवनगौरव' पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांना प्रदान करण्यात आला. मुलुंड, मुंबई येथील कालिदास नाट्यगृहात १८ डिसेंबर २०१२ रोजी संपन्न झालेल्या भव्य संमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. उपस्थितांनी सुमारे पाच मिनिट उभे राहून प्रचंड टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट करून मा. शरद जोशींना मानवंदना दिली. त्या क्षणापासून सतत एक विचार मनात घोळतोय, अनेक प्रश्न मनात निर्माण होतात ज्याची उत्तरे मिळत नाहीत. उत्तर मिळाल्यासारखे वाटत असतानाच पुन्हा एक नवा प्रश्न निर्माण होतो. 

               त्या सभागृहात उपस्थित असलेल्या सुमारे अडीच हजार उपस्थितांपैकी बहुतांश शहरी आणि मुंबईकरच होते. ज्यांचा शेतीशी दूरान्वयानेही संबंध नव्हता. शेतीमालाला रास्त भाव मिळाले तर त्याचा त्यांना लाभ मिळण्याऐवजी फटकाच बसणार होता. दूध आंदोलनाने दुधाचे भाव वाढले तेव्हा त्यांच्याच खिशातून जास्तीची रक्कम खर्च झाली होती. ऊसाचे दर वाढून साखर महाग झाली तेव्हा त्यांच्याच घरगुती बजेटवर आघात झाला होता. अन्नधान्याचे दर वाढले तर त्याचा फटकाही त्यांनाच बसणार होता आणि तरीही ही शहरी माणसे शरद जोशींसमोर नतमस्तक होऊन मानवंदना देण्यासाठी पाच मिनिटे उभे राहून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत होती. याचे कारणही स्पष्ट होते; की त्यांना शरद जोशी आणि त्यांचे कर्तृत्व कळले होते. 

               याउलट स्थिती मात्र ग्रामीण महाराष्ट्रात पाहायला मिळते. शेतीमालाला रास्त भाव हा एककलमी कार्यक्रम घेऊन ज्यांच्या साठी शरद जोशींनी उभे आयुष्य खर्ची घातले, संसाराची राखरांगोळी होत असतानाही अविचल राहून ऋषितुल्य जीवन जगून नेटाने शेतकरी चळवळ पुढे नेली, अडगळीत पडलेला शेतीविषय केंद्रसरकारच्या अजेंड्यावर आणून ठेवला, त्या शरद जोशींविषयी ग्रामीण महाराष्ट्र उदासीनता का दाखवतो? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. ज्या शेतकरी संघटनेने शेतमालाला भाव मिळवून दिले, दोनदा हजारो कोटी रकमेची कर्जमुक्ती मिळवून दिली त्या संघटनेला राजकीय यश मिळवून देताना शेतकरी समाज कंजूषी का दाखवतो, असाही प्रश्न उपस्थित होऊन मनात खिन्नता येणे स्वाभाविक आहे. मात्र ग्रामीण महाराष्ट्राला शरद जोशी आणि त्यांचे कर्तृत्व कळले नाही, असे म्हणता येत नाही. इतिहासातला एकमेव शेतकरी नेता म्हणून शरद जोशी यांचे नाव जनमान्यता पावून प्रत्येक शेतकर्‍याच्या हृदयात कोरले गेले आहे. शेतकर्‍यांना संघटित करून "भीक नको हवे घामाचे दाम" असा मंत्र देऊन शेतकर्‍यांना सन्मानाने जगायला शिकविण्याचे त्यांचे योगदान वादातीत आहे. शेतकर्‍याचे मरण हे सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामध्ये दडले आहे, याविषयी सुद्धा आता कुणाचेच दुमत राहिले नाही, पण; जातिभेदांचे अडथळे दूर सारून शरद जोशींच्या पाठीशी एकसंघ उभे राहण्याची ऊर्मी शेतकरी समाजामध्ये का निर्माण होत नाही, हाच खरा कळीचा मुद्दा आहे. शेतकरी आंदोलनामुळे शेतमालाला बरे भाव मिळालेत, असे खाजगीत मान्य करणारा शेतकरी जाहीरपणे मान्य करेलच याची खात्री देता येत नाही. शरद जोशींमुळेच कर्जमुक्ती मिळाली असे चार भिंतीच्या आड बोलणारा शेतकरी चावडीवर बसल्यानंतर गावच्या राजकीय धेंडासमोर बोलताना कृषीमंत्र्यांनी कर्जमुक्ती केली असे कसे म्हणू शकतो, हाही अभ्यासाचाच विषय ठरतो. 

               मात्र शेतकरी समाजाविषयी माझी तक्रार नाही; आणि तक्रार असण्याचे कारणही नाही. हजारोवर्षे आर्थिक गुलामगिरीचे, लाचारीचे व अपमानास्पद जीवन जगता-जगता स्वाभिमान व सन्मानाचे जीवन जगण्याची प्रेरणा देणारी जनुकेच या शेतकरी समाजाच्या रक्त-मांस-पेशीतून हद्दपार झालेली असणार हे उघड आहे. आंदोलनाने शेतमालाचे भाव वाढून शेतकर्‍याच्या घरात स्वतःच्या हक्काचे वीस-पंचेविस हजार रुपये जास्त आले तरी त्याला ते महत्त्वाचे वाटत नाही व संघटनेचा झेंडा हातात घ्यावा, असेही वाटत नाही, मात्र; एखाद्या पुढार्‍याने कोंबडी - बकरी घेण्यासाठी हजार दोन हजार रुपयाची अनुदान स्वरूपातील भीक मिळवून दिली तर त्या शेतकर्‍याला त्या पुढार्‍याचा झेंडा हातात घेऊन नाचावेसे वाटते व आयुष्यभर धोतर धूत बसावेसे वाटते, हा याचा पुरावा आहे. पन्नास रुपयाची तुरीची पिशवी अनुदानावर फुकटात मिळविण्यासाठी साठ-सत्तर रुपये बसचे तिकीट खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी सोसायटीसमोर चार तास रांग लावणारी माणसे शेतकरी समाजात मुबलक आहेत. हिशेबाशी शेतकर्‍याचे हाडवैर आहे. ताळेबंद आणि अंदाजपत्रक या दोन शब्दांची त्याला ऍलर्जी आहे. वर्षभराचा शेतीचा खर्च एका वहीत लिहून नफा-तोटा याचा आढावा घेणारा शेतकरी लाखात एखादा मिळाला तर आश्चर्य वाटावे, अशी स्थिती आहे. 

               शेतकर्‍यांची संघटना असावी असे त्याला वाटते, पण त्यात आपलेही योगदान असावे, हे त्याला मान्य नाही. शिवाजी जन्माला यावा; पण तो शेजार्‍याच्या घरात, आपल्या घरात नको, हीच त्याची मनोधारणा कायम आहे. अन्यायाविरुद्ध शेतकरी पेटून उठत नाही, पूर्ण ताकतीनिशी संघटित शक्तीचे प्रदर्शन करीत नाही त्यामुळे कधीकधी संघटनेच्या कार्यकर्त्यामध्ये नैराश्य येते आणि संघटनेचे कार्य थांबवून द्यावे, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होते. अशावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, शेतकरी संघटना स्थापन झाली ती शरद जोशींना गरज होती म्हणून; शेतकर्‍यांना गरज होती म्हणून नव्हेच. शेतकर्‍यांना ना संघटनेची गरज होती ना शेतमालाच्या भावाची. शरद जोशी परदेशात असताना भारतातल्या शेतकर्‍यांनी त्यांना पत्र लिहून भारतात येऊन संघटना स्थापन करण्याची विनंती केलेली नव्हती की आदरणीय साहेब, भारतातील आम्हा शेतकर्‍यांची स्थिती अत्यंत दयनिय आहे, तेव्हा तुम्ही तातडीने भारतात या आणि आमच्यासाठी शेतकरी संघटना स्थापन करून या हलाखीच्या स्थितीतून आमची मुक्तता करा. शेतकर्‍याच्या घरात जन्माला येणे म्हणजे कर्जात जन्मणे, कर्जात जगणे आणि कर्जात मरणे, हे विधिलिखित असते, यावर शेतकर्‍याचा ठाम विश्वास आहे. त्याला ’सुखाने व सन्मानाने’ जगण्याचे स्वप्नही अजून पडलेले नसावे. तसे नसते तर शेतकर्‍याने नक्कीच काही ना काही हालचाल करून उपाय शोधलेच असते. नाकातोंडाच्या वर पाणी आले तर तो आत्महत्या करून मरायला तयार आहे पण रणांगणात उतरून लढायला तयार नाही, यातच सारे काही आले. 

               महात्मा गांधींना स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणे सोपे गेले कारण देशाला स्वातंत्र्य मिळाले तर सत्तेची खुर्ची आपल्याच ताब्यात येईल याची खात्री बाळगणार्‍या व त्यासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून तयार असणार्‍या पुढार्‍यांच्या फळीचा त्यांना भक्कम पाठिंबा लाभला होता. याउलट शरद जोशींचे तत्वज्ञान स्विकारले तर शेतकर्‍याला आर्थिक स्वातंत्र्य मिळून राजकीय सत्ताकेंद्रेच प्रभावहीन होण्याची भिती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दलित समाजात जागृती घडवून आणणे तुलनेने सोपे गेले कारण दलित समाजाचा सवर्णांकडून झालेला छळवाद याला दलीतसमाज आधीच कंटाळला होता आणि त्यातूनच त्या समाजात सन्मानाने जगण्याची प्रेरणा जागृत झालेली होती. शिवाय आंबेडकरांनी ज्या समाजासाठी कार्य केले तो समाज त्यांच्याच जातीचा होता. मात्र शेतकरी संघटनेबाबत असे म्हणता येत नाही. अनेक जाती-धर्मामध्ये शेतकरी समाज विभागला असल्यामुळे या अनुषंगाने विचार केला तर या जातिव्यवस्थेमुळे संघटनेला काही फायदा होण्याऐवजी नुकसानच झाले आहे. कधी काळी शेतकरी संघटनेचे खंदे कार्यकर्ते असणारे शरद जोशींना सोडून गेले ते तुरळक अपवाद वगळता बहुतेक सर्व थेट आपापल्या जातीच्या नेत्यांच्या कळपातच गेलेले आहेत. 

               या सर्व पार्श्वभूमीचा विचार केला तर शेतकरी समाजासाठी कार्य करणे हे तुलनेने अधिक कठीण काम असले तरी ऐतिहासिक आणि महानकार्य आहे, याची खूणगाठ मनाशी पक्की बांधून घेणे गरजेचे आहे. 

                                                                                                                 - गंगाधर मुटे 
---------------------------------------------------------------------------------------

वाचन 2076 प्रतिक्रिया 6