मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थँक गॉड इट्स् फ्रायडे..बट नो थँक्स..

गवि · · जनातलं, मनातलं
"बेतार योजना और समन्वय स्कंध" असा बोर्ड असलेल्या हपीसात बरोब्बर चौदा वर्षांपूर्वी मी एरॉनॉटिकल रेडिओ लायसेन्सच्या परीक्षेला गेलो होतो. त्यावेळी पाचदहा टक्के पासिंग रेट असलेली ही परीक्षा.. पण तरीही त्यावेळी माझ्यासोबत असलेले सर्व शिकाऊ पायलट मित्र दिल्लीत पोचण्यापूर्वीपासूनच परीक्षेपेक्षा जास्त तीव्रतेने वाट पहात होते ती परीक्षेनंतर त्याच संध्याकाळी ठरलेल्या टीजीआय फ्रायडेमधल्या पार्टीची. मी त्यावेळी "घेत" नसल्याने, शिव शिव करुन त्या सर्वांना वसंतविहारमधे "ड्रॉप" केलं आणि तीच गाडी दिल्लीभर फिरवून तीन तासांनी परत त्यांना पिकअप करायला आलो. तेव्हा मोबाईल वगैरे काही सर्वांकडे नसायचे. तेव्हा आता टीजीआयएफमधे आत जाऊन त्यांना बाहेर काढणं आलं. मी त्या ठिकाणी दरवाज्यातून आत शिरताशिरताच लालचुटुक रंगाचा टीजीआय फ्रायडेचा युनिफॉर्म घातलेल्या दोन अत्यंत सुंदर अल्लड तरुणी बागडत सुहास्यवदनाने माझ्याकडे आल्या. त्यांचा जोश आणि उत्फुल्लता बघून, मी तत्कालयोग्य ती काळजी न घेतल्यास आता त्या दोघी मला झळंबतील आणि माझे हात दोन्हीकडून पकडून "सारे के सारे गामा को लेके" नाचत मला टेबलकडे घेऊन जातील अशी भीती वाटायला लागली. "माझे मित्र आत आधीपासून बसले आहेत", मी थरथरत त्यांना सांगितलं. "ओह ओके.. धिस वे प्लीज..", करत त्यांनी मला आत जायचा रस्ता दाखवला. आत खूप मजेशीर अँबियन्स असलेलं रेस्टॉरंट होतं. त्यात भिंतीवर, छतावर कुठेही बास्केटबॉल्स म्हणा, रॅकेट्स म्हणा, स्पोर्ट सायकल म्हणा असे आयकॉन्स चिकटवले होते.. म्हणजे खरीखुरी सायकल बरं का.. ज्यांचे शर्ट वेगवेगळ्या मजेशीर बिल्ल्यांनी पूर्ण भरले आहेत असे वेटर आणि पोरी (वेट्रेसेस असाव्यात..) सुळसुळ धावत होते. एकूण माहोल अलिशान, थंड आणि अत्यंत दिलखेचक होता. धुंडाधुंड केल्यावर एका टेबलापाशी माझे चारी मित्र लाल नाक करुन आणि जडावलेल्या डोळ्यांनी बसलेले दिसले. मग चला चला करुन त्यांना हाकलत बाहेर काढलं. एकाला कारपर्यंत सोडावा तर उरलेल्या तिघांतले दोघे गायब, त्यांना शोधून गाडीत बसवावं तर गाडीतला मूळ आयटेम गायब. मग त्याला शोधायला जावं तर तो रस्त्यात आडवा झोपलेला आणि भोवती लोक. असं सगळं निस्तरत सर्वांना फिजिकली उचलून गाडीत टाकलं आणि परत आणलं. यातल्या मित्रांच्या अतिमद्यपानाविषयीचा चिडीखेरीज त्या ठिकाणाविषयी मात्र एक मजेशीर नॉस्टॅल्जिया तयार झाला होता. यथावकाश मुंबईतही टीजीआय फ्रायडे निघालं. आणखीही बर्‍याच शहरात.. पण पहिल्या आणि मूळ ठिकाणाची मजा काही वेगळीच.. अशी माझी समजूत होती. मग आत्ताच तीनेक आठवड्यांपूर्वी वसंतविहारला हे शोधत गेलो. खूप वेळ घालवल्यावर समजलं की ते आता वसंतविहारमधे नाहीच मुळी.. घ्या.. ते जवळच्या वसंतकुंजमधे शिफ्ट झालेलं आहे. वसंतकुंजमधे शेवटी ते सापडलं.. अहाहा.. तिथे तशाच लालचुटुक कपड्यातल्या सुंदर अल्लड तरुणी होत्या.. पण त्यांनी मला दारातच अडवून सांगितलं की आत दोन पार्ट्या चालू आहेत आणि आत्ता आम्ही तुम्हाला आत सोडू शकत नाही. झाला की पोपट.. अरे हाताला धरुन बागडत आत नेऊ नका. पण हे असं हाकलून देणं? तरीही थोड्या वेळाने हिंडूनफिरुन मी परत आलो. तोसवर यांचं दार उघडलं होतं. मग रीतसर स्वागत झालं.. एंट्री केल्यावरच पुन्हा भिंतींवर चिकटलेल्या सायकली आणि खेळणी बघून नॉस्टाल्जिया परत आला. Image removed. बरंसं टेबल पकडून बूड टेकलं. सोबत असलेल्या सुपुत्राला तिथल्या एका वेटरने किंवा पोरीने कलरिंग बुक आणि क्रेयॉन्सचं पॅकेट दिलं, तो खूष होऊन त्यात गुंगला.. हे बरंच झालं. आणखीही बरीच पोरं धावर्‍या मुंग्यांसारखी पळापळ करत होती. मग मी मेन्यूकडे मोर्चा वळवला. मेन्यूकार्ड व्हायब्रंट होतं एकदम.. Image removed. Image removed. साधारण मेक्सिकन, कॅरेबियन, इटालियन आणि विविध देशांतले पदार्थ दिसत होते. काहीकाही उच्चारापलीकडले होते. अगदी निवडक काहींची जंत्री इथे देतो: -कॅरेबियन सीफूड आणि चिकन राईस कॉम्बिनेशन. (सॉटीड श्रिंप, कलमारी, चिकन सॉसेज, राईस, बटर, करी आणि सीझनिंग या सर्वांचं कॉम्बिनेशन..) -फ्रायडेज् स्पेशल श्रिंप. (कॉकटेल टार्टर सॉससहित बटरमधे सोनेरी तांबूस तळलेले बारा बॅटर्ड प्रॉन्स..) -टॉर्टिला क्रस्टेड फिश.. -चिकन आल्फ्रेडो पास्ता शाकाहारींसाठीही बरेच ऑप्शन्स होते. -Cottage Cheese Tchoupatoulis अशा नावाचा पदार्थ होता. याचा उच्चार सांगून कोणीतरी सहकार्य करावं. -टस्कन व्हेजिटेबल मेल्ट. मशरूम आणि मोझेरिला चीज + ब्रेड असा काहीसा पदार्थ, सूपसहित. -व्हेजिटेबल चिमिचांगा.. (काय असावं बरं..) -गार्डन बर्गर -बर्‍याच प्रकारचे पिझ्झे आणि आपला पूर्ण सेल्फ डिझाईंड पिझ्झा बनवून घेण्याचीही सोय होती. -स्टर फ्राईड थाई टोफू नूडल्स. असे अजून शंभरेक पदार्थ असावेत, पण हे सर्व पदार्थ चारशे ते सहाशे या किंमतीच्या रेंजमधे होते. हे पाहून मला फार आनंद झाला नाही हे सांगणे नलगे. मग प्रत्यक्ष टेस्टिंग चालू केलं.. वेगवेगळे "शॉट्स्", लिक्युअर्स, कॉकटेल्स, पिचर्स आणि ज्या ज्या पद्धतीने मद्याची रेलचेल करता येईल तशी केली होती. त्यातही नेहमीचं कॉकटेल आणि एक प्रीमियम कॉकटेल असाही प्रकार होता. सावधान.. नेहमीचं कॉकटेल ४०० ते ६०० च्या रेंजमधे तर प्रीमियम म्हटलं की तेच ते कॉकटेल अधिक चांगल्या स्वरुपात (अधिक प्रमाणात) पेश करुन त्याची किंमत आठशेवर जाते. अँबियन्स मस्त होता. बार लखलखत होता. हॅपी अवर्स चालू होते.. Image removed. कॉकटेल मागवलं.. म्हणजे आपला नेहमीचा लोंग आयलंड आईस टी.. आणि त्यासोबत डायनाबाईट्स नावाचा चीजचा प्रकार मागवला. इथे एक उचकी लागली. म्हणजे डायनाबाईट्स बरे होते पण लाँग आयलंड म्हणजे एकदम पिचकावणी.. त्यात हॅपी अवर्समुळे एकावर एक फ्री..एवढा वाईट लाँग आयलंड यापूर्वी टेस्ट केला नव्हता.. Image removed. डायनाबाईट्स् Image removed. डायनाबाईट्स् बरे होते म्हणजे चावायला बरे होते इतकंच..टेस्ट काही विशेष नाहीच.. मॉकटेलचा एक नमुना म्हणून नोव्हेंबर सनब्रीझ नावाचं ड्रिंक मागवलं. हे प्रकरण लाईम, अ‍ॅपल आणि क्रॅनबेरी यांचं स्पार्कलिंग मिश्रण असल्याचं कळलं.. नोव्हेंबर सनब्रीझः Image removed. Image removed. हेही लाँग आयलंडशी स्पर्धा करत होतं. पुळकावणीपणात.. ते तुम्हाला या ग्लासाच्या फोटोवरुनही कळेलच.. ऐला, लोअरपरळ स्टेशनबाहेर दोनदोन रुपयांना लिंबू सरबत विकतात ते यापेक्षा वीसपट चांगलं.. वरुन हॅपी अवर्स.. म्हणजे हे नोव्हेंबर सनब्रीझही एकावर एक फ्री एकावेळी आणूनच ठेवलं.. वेस्टेज.. मग अजून काही वेगळं मागवून पाहू असं म्हणून काही ऑर्डर दिल्या आणि त्या येईपर्यंत जरा इकडेतिकडे फेरी मारून रेस्टॉरंटच्या कानाकोपर्‍यात नजर टाकली. Image removed. Image removed. यथावकाश अर्थात सावकाश, ऑर्डरची टेबलवर डिलिव्हरी झाली.. पायनॅपल मोहितो फिश असा अनवट वाटणारा पदार्थ मी मागवला होता.. त्यात तसा अननसाचा काही संबंध दिसत नव्हता..स्पॅनिश राईस आणि त्यावर ग्रिल केलेला मासा ठेवलेला.. या ग्रिलमधे पायनॅपल मोहितो पिको दि गार्लो असा काहीतरी मसाला वापरला आहे असं वर्णनात लिहिलं होतं. Image removed. याच्यावरचा मासा टेस्टला ठीक होता.. पण तो खालचा भात??? अगागागा.. फिकट बेचव शेझवान राईसच्या वाटेवरचा पण धड चायनीज नाही असा हा मेक्सिकन राईस.. कसाबसा थोडासा खाऊ शकलो.. बरं, वरच्या माश्याची टेस्ट चांगली वाटत होती ते अशासाठी की मसाला लावून ग्रिल केलेला बोनलेस मासा असा कितीसा वाईट लागणार. म्हणून भाताच्या तुलनेत बरा इतकंच.. Image removed. आता वास्तविक मी इथून उठून जायला हवं होतं.. पण एखाददोन पदार्थ आणि कॉकटेल्सवरुन मत कशाला बनवा, अजून एक संधी देऊच, असं म्हणत एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी मागवू असा विचार केला. जमैकन चिमिचुरी लॅम्ब स्क्यूअर्स.. जमैकन सीझनिंगमधे घोळवलेली मेंढी आणि ऑलिव्ह ऑईलमधे ग्रिल्ड, असा प्रकार ऑर्डर केला. लॅम्ब म्हणजे मस्त रसरशीत असेल अशा आशेने. पुन्हा आरामशीर तब्ब्येतीत वेळ लावून हा पदार्थ माझ्यासमोर आला: Image removed. हे राम..ती लॅम्ब ऊर्फ वातड गच्च गोळा त्या स्टिकवरुन निघेनाच. काडीसकट खायची वेळ आली. बर्‍याच झटापटीनंतर मी एक तुकडा स्टिकपासून अलग केला. तो तोंडात घातला मात्र.. जबड्याची पूर्ण शक्ती वापरुनही तो चावला जाईना. चबार चबार रबरासारखा तीनचार मिनिटं चावून तो तसाच गिळून टाकला. पुढचा तुकडा खाण्याचा धीर होईना. कसेबसे अजून दोन तुकडे खाल्ले आणि बाकीचं ठेवून दिलं... पुन्हा या लॅम्बच्या खालीही तो अत्याचारी भात होता. फ्लेवर वेगळा पण दर्जा तोच.. यावेळी म्हणे पाएला राईस म्हणून प्रकार होता..त्यात स्पायसी रेड पेपर अँड पायनॅपल साल्सा.. मला तर कशात काही लागत नव्हतं.. नुसता बेचव खारा भात. जिभेच्या आणि दातांच्या एवढ्या विटंबनेनंतर डेझर्ट मागवायची इच्छा पार मरुन गेली. नारळाच्या दुधाचं काहीतरी कॅरेबियन डेझर्ट मनात भरलं होतं पण या सर्वांनंतर त्या डेझर्टातही नारळाचा चोथाच वाट्याला येईल अशी खात्री वाटायला लागली. म्हणून ते मागवायचा बेत रहित केला. हे असलंच खाऊन माझे मित्र टीजीआय फ्रायडेवर इतके खूष होते यावर विश्वास बसेना. की चौदा वर्षांत इतकी अधोगती झाली... ?? नॉस्टाल्जिया आपल्या जागी आणि चवढव आपल्या जागी असा धडा घेऊन प्रचंड हलक्या खिशाने मी टीजीआय फ्रायडे सोडलं.. बाहेर पडलो.. पत्नी म्हणाली, आता कुठे जाऊया? "कुठेतरी जाऊन नीट जेवूया आता".. मी पडक्या चेहर्‍याने म्हणालो.. ...................... ...................... ...................... ...................... ...................... Image removed. नोंद....टीजीआय फ्रायडे, फोटोजमधले मेन्यूकार्ड, आयकॉन्स वगैरे सर्व किंवा त्यातले काही टीजीआय फ्रायडेचे ट्रेडमार्क्स किंवा लोगो आहेत / असू शकतात. ते इथे फोटोत आलेत इतकंच..

वाचन 8100 प्रतिक्रिया 17