मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कार्लिनबुवा आणि कर्वेबाई

धनंजय · · काथ्याकूट
जून २२, २००८ रोजी जॉर्ज कार्लिन हे अमेरिकेतील ज्येष्ठ विनोदी कलाकार वारले. ते जिवंत असताना त्यांच्याविषयी मला काही माहीत नव्हते. पण त्यांच्या मृत्यूच्या संदर्भाने अनेक वर्तमानपत्रांत स्मरणलेख आलेत, त्यावरून एका काळच्या त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना आली. त्यांचा एका विशिष्ट विनोदी भाषणाचा उल्लेख बर्‍याच ठिकाणी आला "Seven Words You Can Never Say on Television" (दूरदर्शनवर कधीही न म्हणता येणारे सात शब्द). त्याची थोडक्यात यूट्यूबवर झलक - अर्थात हे सातही शब्द संभोग किंवा मलमूत्रविसर्जनासंबंधी आहेत. हे भाषण कार्लिन यांनी १९७२ मध्ये दिले. प्रथम त्यांना मिलवॉकी येथील एका कोर्टात खेचले गेले पण त्या कोर्टाने त्यांना सोडून दिले. पण पुढे ते भाषण दूरदर्शनवर दिल्यामुळे त्यांना पुन्हा कोर्टापुढे जावे लागले, तो खटला थेट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. सर्वोच्च न्यायालयाने "हे शब्द दूरदर्शनवर बोलू नयेत" या बाजूने निर्णय दिला (१९७८). मला हा कुठला इतिहास माहिती नव्हता. शिवाय हे सात शब्द मी कॉलेजमधील दोस्तमंडळींमध्ये सोडले तर जवळजवळ कधीच वापरत नाही. पण योगायोग असा, की गेल्याच आठवड्यात मी इरावती कर्वेबाईंचा ललितलेखसंच "गंगाजल" वाचत होतो. पैकी एक लेख रँग्लर परांजपे (अप्पा) यांच्याविषयी आहे. त्यातील एक घटना माझ्या लक्षात राहिली.
अप्पांचे शब्दज्ञान अचूक. शकू आणि मी शब्द आडला की...आदमासे ठोकून देत असू. ... कॉलेजमधले संस्कृत पुस्तक चालू असता शकू मला 'नितम्ब' शब्दाचा अर्थ विचारत होती. ... मी अगदी नि:शंकपणे सांगितले, "त्या शब्दाचा अर्थ गाल." अप्पा तेथेच होते. ते म्हणाले, "काहीतरी सांगू नकोस; त्या शब्दाचा अर्थ आहे ढुंगण अथवा कुल्ले." ... मी अगदी सोवळ्या घरात वाढले होते. जे वाङ्मय अप्पा वाचून घेत, तेही सोवळेच होते. प्रियेच्या नितंबांचा उल्लेख वाङ्मयात येईल, ही कल्पनाही मला नव्हती...
खरे म्हणावे, तर मलाही लहानपणी ही कल्पना नव्हती. पण का नसावी? शरिराचा हा भाग (-आता मीच ही विचित्र भीड सोडतो-) ढुंगण, त्याचा साधारण आकार बहुतेक कपड्यांतून स्पष्ट दिसतो. सभ्य स्त्री-पुरुष एकामेकांच्या साड्या-विजारींकडे बघताना डोळे फेरत नाही. आजही पूर्वीसारखेच मनातल्या शरीरसौष्ठवाच्या ('फिगर'च्या) कल्पनेत ढुंगणाचा आकार समाविष्ट असतो. ढुंगण म्हणजे लंगोटीने झाकलेल्या अवयवांसारखे गुप्त, सभ्य लोकांनी मुद्दाम लपवलेले नाही. ढुंगणाचा विचार म्हणजे प्रत्यक्ष संभोगाचा विचार नव्हे. मलमूत्रविसर्जनासारखा हा दुर्गंधीयुक्त प्रकार नाही - उलट सौंदर्याचा भाग आहे. मग हा शब्द सभ्य बोलण्या-लिहिण्यातून हद्दपार का असावा? "ढ"काराने सुरू होणारे शब्द आपल्याला आवडत नाही, हे कारण असावे का? म्हणजे ढेकर, ढासळणे, ढेकूण, वगैरे... पण ढुंगण शब्दासारखाच "ढंग" शब्द सुंदर गोष्टींविषयी बोलताना आपण सहज वापरतो. म्हणजे शब्दाच्या ध्वनीचा दोष नाही. दोष कसला आहे, त्यावर इरावतीबाईंनी नेमके बोट ठेवले आहे - "सोवळेपणा". पण एका सुंदर अवयवासाठीच्या उपयोगी अर्थाच्या शब्दाला, या भंपक सोवळेपणामुळे आपल्याला मुकावे लागत आहे. बहुधा कार्लिनबुवांचे सात शब्द मी रोजच्या वापरासाठी घेणार नाही. पण रँग्लर परांजपे यांनी बाईंना सभ्यपणे शिकवलेला "ढुंगण" शब्द मात्र योग्य अर्थपूर्ण संदर्भात, सभ्य बोलण्यालिहिण्यात मी वापरायला लागेन, असे वाटते. अशा प्रकारच्या शब्दांबद्दल, सोवळेपणाबद्दल, तुमचे काय मत आहे?

वाचन 36477 प्रतिक्रिया 43