मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ड्रंकन उर्फ बीयर बम चिकन

गणपा · · पाककृती
कस काय मंडळी? सर्व काही क्षेम कुशल आहे ना ? बाप्पा त्यांच्या गावी परतले. आणि आता काही दिवसातच दुर्गा माता आपल्या भक्तांच्या भेटीस येतेय. मग ९-१० दिवस काही उसंत मिळायची नाही तुम्हाला. तेव्हा म्हटल एक विकांत मिळतोय मध्ये तर तो सत्कारणी लावावा. फार काही कटकटीची पाककृती नाही आज. चला तर मग लागा कामाला. आधी झटपट कच्चा माल गोळा करु. साहित्य : १ बीयरचा कॅन. (लहान / मोठा / ब्रँड, चॉइस इज युवर्स.) १ कोंबडी स्वछ धुवुन आणि पेपर नॅपकीनने एकदम कोरडी करुन. १/२ चमचा साखर. १ चमचा लसणाची पावडर. १ चमचा लाल तिखट. १ चमचा भाजलेली जीरे पुड. १ चमचा मीठ. १ चमचा भरड वाटलेली काळीमीरी पुड. १ चमचा कांद्याची पुड. २-४ मोठे चमचे ऑलिव्हच तेल. (ऑलिव्हच नसल्यास दुसर कसलही चालेल. ऑलिव्हच जरा हृदयासाठी बर असत.) १ लिंबू. कृती : सगळे मसाले एकत्र करुन घ्यावे. कोंबडीला ऑलिव्हच्या तेलने मसाज द्यावा. जस दिवाळीला आपण उटण खसा खसा चोळुन लावतो, तस तो एकत्र केलला मसाला कोंबडीला चोळावा. बीयरचा कॅन उघडुन त्यातुन चांगले २-४ मोठ्ठे घोट रिचवावे. पण आवडते म्हणुन सगळी गट्टं करु नये. अर्धी शिल्लक ठेवावी. (थोडीशी सावधानी म्हणुन म्हणुन एक एक्स्ट्रा कॅन बाजुला ठेवलेला आहे हे चणाक्ष वाचकांनी ओळखलेच असेल ;) ) हा तर काय म्हणत होतो, दोन घोट मारल्या नंतर कॅनला वरुन २-३ भोके पाडुन घ्यावीत. जो थोडा फार मसाला उरला असेल तर तो त्या कॅनमध्ये रिकामा करावा. एकदम भक्सन टाकुनये. अन्यथ्या ती बीयर, कोण्या अडाण्याने मीठ मसाला टाकला ते पहायला लगेच बाहेर येईल. आणि तुम्हाला नसता त्रास सहन करावा लागेल. एका ओव्हनप्रुफ भांड्यात कॅन ठेवुन कोंबडीला त्यावर बसवावे. हा आधी ती थोडी कां-कू करेल पण तिकडे दुर्लक्ष करुन तिची त्या कॅनवर प्रतिष्ठापना करा. एका लिंबाला २-३ टोचे मारुन ते (टोचे मारलेली बाजू खाली) कोंबडीच्या डॉक्याच्या जागी फिट्ट बसवावे. (कधी कधी कोंबडी झिंगण्या आधीच आडवी होते. त्यामुळे तिस कॅन वर बसवताना काळजी घ्यावी. तुमच्या इथे जर कोंबडीसाठी पेश्श्ल बार स्टुल* मिळत असेल तर त्याचा वापर करावा. ) * ही सगळी आरास उचलुन ओव्हन मध्ये ठेवावी. कोंबडीचे पंख लगेच करपतात म्हणुन त्यांना थोडी अ‍ॅल्युमिनियमची फॉईल लावली तर उत्तम. ओव्हन* १८० ते २०० °C वर सेट करुन आणि कोंबडीला आत रखवालीस बसवुन तास-दिड तास भगीनी मंडळींनी आपल्या आवडत्या सास बहुंच्या कट-कारस्थ्यानात रममाण होण्यास हरकत नाही. ते नसेल आवडत तर आंजावर फेर फटका मारुन या. कॅलरी काँशस मंडळींनी नंतर वाढणार्‍या कॅलरीच्या प्रमाणात आधीच त्या जाळायला हरकत नाही. *तुमच्या सोई नुसार, ओव्हन ऐवजी ग्रीलचा वापरही करू शकता. तासा दिड तासा नंतर झिंगुन टम्म झालेली ही कोंबडी बघा कशी खुणावतेय. 400 600 ओव्हन मधील उष्णतेने कोंबडीतील आर्द्रता कमी होऊन ती वातड होते. बीअर वापरल्याने ही आर्द्रता टिकुन रहाते. शिवाय तिच्यातील मॉल्ट आणि यीस्टच्या रासायनीक प्रक्रियेमुळे कोंबडीची चामडी पातळ आणि क्रिस्पी होते. तरी ज्यांचे बीयरशी वाकडे आहे त्यांनी फळांचा रस आणि पीण्याचा सोडा वापरला तरी चालेल. खालील ईडो मध्ये कोंबडी आतुन किती मॉईस्ट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. वीसु : * धाग्याच शिर्षक आणि काही फोटू पाहुन अश्लील अश्लील म्हणुन ओरडणार्‍यांना आधीच योग्य त्या जागी मारण्यात आले आहे. ** ही पाककृती अंडे घालुन करता येईल पण ज्याच्या त्याचा जवाबदारी वर हे पाऊल उचलावे. *** कोंबडीला पर्याय म्हणुन शाकाहार्‍यांनी कुठलीही भाजी (उदा. भोपळा / कोहळं / दुधी) घ्यायची असल्यास होणार्‍या कलाकृतीला तो स्वत:च जवाबदार असेल. मागाहुन धागाकर्त्यास बोल लावू नयेत.

वाचन 39610 प्रतिक्रिया 68