मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चेन्नई पुणे चेन्नई -- भाग -२

मराठमोळा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
चेन्नई पुणे चेन्नई -- भाग -१ शेवटी मी माझ्या लॅपटॉपवर गाणी लावली आणि उद्या हॉटेल बदलुया असा विचार करत झोपी गेलो.. सकाळी सवयीप्रमाणे अलार्म वाजायच्या आधीच जाग आली. अलार्म वाजु नये अशी सोय करुन पुन्हा झोपी गेलो. पुन्हा दचकून उठलो ते आपण चेन्नईमधे आहोत या विचाराने. आवरासावर करुन फुकटचा नाष्ता (हाटेलात काँप्लीमेंट्री असतो ना..) करायला रेस्टॉरंट मधे आलो. रात्री फक्त सँडविच खाल्लेले असल्याने सडकून भूक लागली होती. अशा वेळी आईच्या हातचे पोहे मिळाले असते तर ... जाउ देत.. मी मेन्यु कार्ड हातात घेतले. त्यावर सर्व प्रकार ओळखीचे होते पण जवळचा एकही नव्हता. ईडली सांबर म्हणजे कमीत कमी रिस्क म्हणून तेच घ्यायचं ठरवलं, मी मेन्यु ठरवेपर्यंत ४ वेळा वेटर "सोलींग सार.. कडड्ड्त्ड्ड्ड" असे काहीसे म्हणून गेला होता. मी त्याला बोलावून मुक्याप्रमाणे हातवारे करुन मेन्युकार्डवर ईडली कडे बोट दाखवले. ऑर्डर येईपर्यंत माझ्या मनात विचार घोळु लागले. एखादे शहर कसे असावे, किंवा तिथली संस्कृती समजुन घ्यावी, खाद्य संस्कृतीची मजा घ्यावी, त्या शहरावर प्रेम करावे असे थोर सामाजिक विचार मला स्पर्शून गेले आणि अचानक मी विचारवंत, व्यापक दृष्टीकोन असलेला मोठा माणूस झालोय असा मला भास झाला. पण मी शेवटी सामान्य माणूसच की. :) आता एखाद्या कट्टर शाकाहारी आणि देव देव करणार्‍या माणसाला मटणाच्या दुकानात काम करायला सांगितले तर तो ते काम आणि मांसाहाराची संस्कृती समजून घेण्यात धन्यता मानणार नाही, अगदीच काही मजबूरी असेल तोपर्यंत तरी. माझही काही असंच होतं मला साऊथ ईंडीयन जेवण आवडत नाही त्याला मी काय करणार. मी बेंगलोरात असताना माझा एक मित्र साऊथ ईंडीया च्या नावाने जाम वैतागायचा.. जाम शिव्या द्यायचा.. पण तो शेवटी एका कन्नड सुंदरीच्या प्रेमात पडला आणि त्याला भाताचे गोळे करुन खाणं अचानक आवडु लागलं होतं असं ऐकीवात आहे. लग्नानंतर ते दोघं प्रेमाने अगदी ५-६ फुटावरुन सुद्धा एकमेकांच्या तोंडात भाताचे गोळे भिरकवतात अशी सुद्धा एक बातमी आहे. असो, ज्याचे त्याचे अनुभव आणि आचार्-विचार. दोन-चार ईडल्या खाऊन स्वारी रिसेप्शन मधे आली. जिथे जायचं तिथला पत्ता मॅनेजरला दाखवला.. दिवसपाळीचा मॅनेजर वेगळा होता, सौजन्यशीलही होता, त्याला ईंग्रजी येत होतं. :) . त्याने माझ्याबरोबर एक रूमबॉय पाठवला.. रिक्क्षा स्टँडपर्यंत, रिक्षावाल्याला पत्ता आणि पैसे किती ठरवायचे यासाठी. मला खरचं पेश्शल ट्रीटमेंट मिळाल्यासारखं वाटलं, खुप कौतुक वाटलं. आपण आधीच शहराबाहेर आहोत आणि ऑफिस हे इथुन आणखी ७-८ किमी लांब आहे अशी आनंददायक बातमी सुद्धा मला त्याने दिली. २५० रुपये निगोशिएट करुन २१० वर शिवा ने आणले. मी रिक्षात बसलो, रिक्षा सुरु होताच रिक्षा ड्रायवर ने मला माझी लॅपटॉप बॅग मांडीवर घेण्यासाठी आज्ञावजा सूचना केली. मला काही कळेनासं झालं. त्याने प्रत्येक बसस्टॉप वर थांबून "ताम्बरम... ताम्बरम" असं काहीस ओरडायला सुरुवात केली तेव्हा मला कळालं की २५० मधले ४० रुपये वसूल करण्यासाठी हा डाव त्याने केलाय. मी बंड करायचं ठरवलं, बॅग पुन्हा बाजुला ठेवली आणि त्याला पॅसेंजर घेऊ नको असे बजावले. ड्रायवर : "कड्ड्ड्तड्ड्फड्ड पेट्रोल क्खख्द्खिरिह्स्क्ज्द"... पेट्रोल महाग झाले आहे असे तो म्हणायचा प्रयत्न करतो आहे असं मला वाटलं. ७-८ किमी साठी किती पेट्रोल लागत असेल, डोक्यावरुन पाणी अर्धा लिटर.. म्हणजे जवळपास १५० रुपये तो असाच खिशात घालणार होता. माझी भाषा त्याला कळत नव्हती आणि त्याची मला.. याचा फायदा एकच की दोघांनी एकमेकाला कितीही शिव्या दिल्या तरी काही फरक पडणार नव्हता. :) ड्रायवरः "$^%^(&&&()*(*)*)(*_&*^%" मी: "हो हो. आमच्याकडचे रिक्षावाले पण असेच &%*&^&#@!^& आहेत." मी हसलो.. तोही हसला. ड्रायवरः "(*(&*^%^%$####@$^^&%&" मी: "काय सांगायचं राव. सकाळच्या ईडल्या लै पाणचट होत्या.." मी पुन्हा हसलो.. तोही पुन्हा हसला.. बराच वेळ हा खेळ चालु होता. माझ्या नशिबाने त्याला एकही पॅसेंजर मिळाला नव्हता, पण त्याचा बदला त्याने सुट्टे नाहीत असे सांगून २५० रुपये घेऊन निघुन गेला अशा प्रकारे घेतला. हापिसात आलो.. बर्‍याच लोकांना ईंग्रजी येते असे दिसले. जरा बरं वाटलं. दुपारच्या जेवणात बरेच पर्याय उपलब्ध होते.. मी नवखा असल्याने कुणीच माझ्याबरोबर जेवण्याचा सवाल नव्हता. इथे पंजाबी पब्लीक बरचं दिसलं, आणि एक काऊंटर तर चक्क पंजाबी तडका नावाने होतं पण जगातले कोणतेही नविन कॅफेटेरिआ हे १-२ महिने चांगलेच वाटते खरी गंमत तिसर्‍या महिन्यात जाणवते. तरीपण हलकं काहीतरी खावं म्हणून बर्गर ऑर्डर केले. त्याने काहीतरी माझ्यासमोर ठेवले. मी: "धिस इज नॉट बर्गर, आय हॅव ऑर्डरड् बर्गर." तो: "धिस बर्गर सार." ते बर्गर आहे की नाही यावरुन माझी आणि त्याची शब्दिक लढाई सुरु झाली.. शेवटी. मी: "नान ओरुदरे सुन्ना नूरदरे सुन्ना मथिरी" असे म्हंटल्यावर तो मात्र घाबरला आणि मग त्याने मला बर्गर सारखे दिसणारे पुन्हा काहीतरी आणुन दिले. रजनीकांतचा फेमस ड्वायलॉक पाठ केला होता इथे यायच्या आधी.. :).. कसा घाबरला.. असा मी मनातल्या मनात हसत ते बर्गर वाकडे तिकडे तोंड करत संपवले. आता मला बर्गर म्हंटले की अंगावर काटा येतो. हापिसातली कामे उरकली. दुसरे चांगले हॉटेल सध्या उपलब्ध नसल्याने त्याच हॉटेलात १ आठवडा रहावं लागणार होतं. हापिसातून परतताना कुणीतरी बसने जा असा सल्ला दिला. हापिसाबाहेरच्या बस स्टॉप वर आलो आणि उभा राहिलो. त्यात मला बस आणि रस्ता विचारणारे ३-४ महाभाग भेटले. मी फक्त खांदे उडवून माहित नाही असे दाखवले. कित्येक बस आल्या आणि गेल्या.. माझ्यासाठी बसेस च्या बोर्डवर सगळी जिलेबीच होती.. (अरे हो .. बर्‍याच दिवसात जिलेबी खाल्लेली नाही.. आज खाऊया असे मनात आले.) नशिब बलवत्तर म्हणून नव्या एसी बस ज्या ईंग्रजी मधे ईलेक्ट्रॉनिक बोर्डमधे स्टॉपचे नावे दाखवतात त्यातली एक मिळाली. माझे हॉटेल ज्या एरिआ मधे आहे त्या स्टॉपचं नाव त्यात होतं. क्रमशः

वाचन 8767 प्रतिक्रिया 0