
हुनान हा चीन देशातला एक प्रदेश आहे. इथल्या स्वयंपाकाच्या पद्धतीला 'हुनान' पद्धत म्हणतात. त्यात पण बरेच प्रकार असतात. हुनान पद्धतीचे वैशिष्ठ्य म्हणजे आलं, लसूण आणि काळी मिरी व कांद्याचा जास्त प्रमाणात वापर. चायनीज पदार्थात आणि एक प्रख्यात स्टाईल म्हणजे सिशुआन (sichuan). ह्यात सिशुआन मिरी आणि लाल मिरच्यांचा खूप जास्त प्रयोग असतो कि ज्यानी नाक, तोंड, डोळे, कान जिथे शक्य तिथून (:)) धूर निघतो. (इथे हसा. :D)
सामग्री:
२०० ग्रॅम बोनलेस चिकन
१ मोठी रेड पेप्पर
१ मोठी यलो पेप्पर (ह्या लाल पिवळ्या भोपळी मिरच्या मिळत नसल्यास २ शिमला मिरची लांबट चिरून वापर. माझं म्हणजे उगीच फ्याड!)
१०० ग्रॅम किंवा १ कप, चिरलेले मशरूम (आवडत नसल्यास वगळत तरी 'मेरा क्या जाता है'? काय? )
३ चमचे कॉर्न फ्लॉर
१ बोटा एवढा लांब आल्याचा तुकडा. ह्याला किसून घ्या. तयार पेस्ट वापरलीत तर तुमचा अस्सल हुनान चिकन होणार नाही, इमिटेशन!
१ मूठभर लसणीच्या पाकळ्या, किसलेल्या
१ मोठा कांदा, लांबट चिरलेला
ताजी मिरीपूड, २ चमचा (झेपत नसेल तर कमी घाला बरं का?)
१ मोठा चमचा सॉय सॉस
२ मोठे चमचे तेल
२ कप पाणी किंवा चिकन stock
चवीनुसार मीठ
कृती:
चिकन नीट धुवून, त्याला चाळणीत निथळत ठेवा. चांगलं कोरडं झालं कि मग त्यावर एक चमचा कॉर्न फ्लॉर, १ चमचा काळी मिरीपूड, १ चमचा लसूण, १ चमचा आलं घालून सगळा छान कालवून एका बाजूला ठेवा, १० मि.
एका मोठ्या भांड्यात तेल गरम करून घ्या. मग त्यात ते चिकन घालून थोडं शिजवून घ्या. चिकन वरून खरपूस दिसायला हवे. आता हे चिकन एका डिश मधे काढून ठेवा.
उरलेल्या तेलात बाकी लसूण, आलं, कांदा घालून मोठ्या आचेवर भरभर परता (ते ठेल्यावारचे चायनीज वाले करतात न, तसे!).
मग शिमला मिरची आणि मशरूम घाला. चायनीज पदार्थात भाज्या खूप शिजवत बसायच्या नसतात. १ मिनिट परतलं कि मग ते चिकन घाला. मिरीपूड घाला. सॉय सॉस घाला. शेजार पाजार सगळ्यांना कळलं पाहिजे, आज स्पेशल बेत आहे ते- इतपत घमघमाट होईल.
आता उरलेला कॉर्न फ्लॉर पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्या आणि त्याला त्या चिकन वर ओतून न थांबता हलवत रहा (नाहीतर गुठळ्या होतील). फोटोत दिसतंय तसं जरा दाट झालं (बुडबुडे पण येतील) कि मग सर्व्ह करा. आहो नुसताच नाही,
ह्या हाक्का नूडल्स बरोबर.