दारासमोरचा रस्ता
लेखनविषय:
काव्यरस
दारासमोरचा रस्त्यावर
असलेले अनेक खड्डे
काही लहानपणी गोट्या खेळतांना पडलेले
क्रिकेटचे स्टंप लावतांना काही
तर काही असेच
काळाच्या खुणा बाळगण्यासाठी तयार झालेले.
चुकार दगडं मधुनच
वर येत पायाला टोचत
आणि
धुळमाती अंगावर उडवत
खेळतांना वेळेचे भान नसे.
पावसाळ्यात डबके झालेल्या
रस्त्यावर थपथप भरलेल्या
पाण्यात मारलेल्या उड्या अन्
पायाला लागलेला
चिखल घरभर पसरत असे.
आता डांबरीकरण झाल्यावर
मऊसुत रस्त्यावरुन चालतांना
उगाचच पाय कुठेतरी ठेचकाळतो
काहीतरी टोचतं
आणि
चिखल लागल्याचा भास
जाता जात नाही.
वाचन
4683
प्रतिक्रिया
25