पनीर कढाई
नमस्कार मिपाकर्स...
बर्याच दिवसांपासुन फ्रिजमधला पनीर खुणावत होता. पनीर चिली च्या पुढे कधीही पनीर नामक पदार्थाचं काहीच बनवलं नसल्याने नेमकं काय करावं सुचत नव्हत... मिपाच्या पाकृ विभागात एक चक्कर टाकली, पण पनीर माखनवाला वगैरे पदार्थ जरा गोडसर लागत असल्याने काहीतरी तिखट बनवावंस वाटत होतं. मग काय गुगलदादा कडे याचना केली आणी पाच पन्नास रेसिपीज शोधुन काढल्या. पण यात नेमका घोळ असा झाला की इतक्या रेसिपीज पाहुन हम तो एकदम कन्फुजा गए... शेवटी दोन-तीन रेसिपीज मिक्स केल्या आणी जे काही झालं ते अस... तर मंडळी पेश है पनीर कढाई!!
साहित्यः
पनीर - ४०० ग्राम
सिमला मिरची - १
लाल मिरच्या - ६
धने - अर्धी वाटी (साधारण ३ चमचे)
लसूण - ६-७ पाकळ्या
आलं - पाव ईंच
टोमॅटो - ३-४
हळद, मिरची पावडर, मिठ - चवीनुसार
कोथिंबीर
कॄती:
लाल मिरच्या आणी धणे मिक्सर मधे बारीक करुन घ्या. लसूण, आले आणी हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करुन घ्या. टोमॅटो बारीक चिरुन घ्या. पनीर आणी सिमला मिरची चे १ सेमी आकाराचे तुकडे करुन घ्या.
एका भांड्यात २ चमचे तेल घ्या. लाल मिरची आणी धण्याची अर्धी पूड तेलात टाका आणी एखादा मिनिट परता. त्यात लसूण, आलं आणी हिरव्या मिरची चे तुकडे टाकून चांगले परतुन घ्या. त्यात कापलेले टोमॅटो टाका. त्यात हळद आणी मिरची पावडर टाकून १०-१५ मिनिटे शिजवा. टोमॅटोची पेस्ट होत आली की गॅस बंद करा.
एका पसरट भांड्यात तेल घेउन त्यात उरलेली लाल मिरची आणी धने पूड टाका. एखाद्या मिनिटानंतर सिमला मिरचीचे तुकडे टाकुन परतुन घ्या. त्यात पनीर चे तुकडे टाका आणी दोन ते तीन मिनिटे शिजु द्या. आता वरच्या भांड्यात तयार केलेला मसाला टाकुन झाकण ठेउन ५-१० मिनिटे शिजु द्या. बारीक केलेली कोथिंबीर टाका आणी गरमागरम सर्व करा.

वाचन
8620
प्रतिक्रिया
15