मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

द्रष्टेपणा की न्यूनगंड की म्हातारचळ की आणखी काही?

नगरीनिरंजन · · काथ्याकूट
गेल्या काही दिवसांमध्ये काही मनोरंजक बातम्या वाचनात आल्या. वातावरण बदलावरुन किंवा इतर काही कारणावरून मानवप्राण्याच्या भवितव्याबद्दल (नुसतीच) बोंब मारण्याच्या सध्याच्या फॅशनला अनुसरूनच या बातम्या आहेत. पण यात ज्यांचा उल्लेख आहे ते कोणी सोमेगोमे नाहीत. एक आहे प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आणि दुसरा जैववैज्ञानिक. त्यांची मते बहुतेकाना टोकाची वाटतील यात शंका नाही आणि त्यातल्या एकाने सांगितलेला उपाय तर एखाद्या हॉलिवुडी विज्ञानपटात शोभून दिसेल असाच आहे. पहिली बातमी वाचली बीबीसीवर. खाली त्या बातमीचा दुवा दिलेला आहे. सेलिब्रिटी (मराठी शब्द?) भौतिकशास्त्रज्ञ स्टीवन हॉकिंग यांनी मानवजात वाचवण्यासाठी पृथ्वी सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. कारण म्हणे पृथ्वीवर उल्का आदळण्याचा धोका आहे किंवा अण्विक संहार व्हायचा धोका आहे किंवा पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक स्त्रोत लवकरच संपुष्टात येतील किंवा सूर्याचं वय झालंय आणि लवकरच (फक्त ७.६ अब्ज वर्षांत) तो पृथ्वीला गिळंकृत करेल. आपल्या ग्रहमालिकेत पृथ्वीसदृश दुसरा ग्रह नसल्याने आपल्याला ४.२ प्रकाशवर्षे दूर (की जवळ?) असलेल्या प्रॉक्सिमा सेंटॉरी नामक तार्‍याच्या ग्रहमालिकेत जाऊन शोध घ्यावा लागेल हे ही त्यांनी सांगितलंय. म्हणजेच कुठे जायचं, कसं जायचं हा सगळा विचार त्यांनी करुन ठेवला आहे. आता फक्त कोणी जायचं हेच ठरवायचं बाकी आहे. बीबीसी वरची बातमी पृथ्वी सोडा किंवा नष्ट व्हा दुसरे महाशय आहेत ऑस्ट्रेलियन जीवशास्त्रज्ञ फ्रँक फेनर. देवीच्या विषाणूंचा नायनाट करण्यात यांनी फार मोठा वाटा उचलला होता. सध्या ते साधारण ९५ वर्षांचे असावेत. यांच्या मतानुसार येत्या १०० वर्षांमध्ये मानवप्राणी नष्ट होणार. त्यांच्या म्हणण्यानुसार वातावरण बदल आणि लोकसंख्येचा स्फोट या दोन प्रमुख कारणांमुळे इतर अनेक प्राण्यांप्रमाणे माणूसही नष्ट होणार. औद्योगिकीकरण आणि एकंदरच नागरीकरण हे याचे मूळ कारण आहे कारण आदिम अवस्थेत माणूस जवळजवळ ४०-५० हजार वर्षे तगला आणि जगला. फ्रँक फेनर हा सगळा 'साठी बुद्धी नाठी' असा प्रकार आहे का? की काही दुर्दम्य आशावादी आणि अध्यात्मवादी म्हणतात तसे हे आत्यंतिक मानवी न्यूनगंडाचे उदाहरण आहे? की तर्काधिष्ठित विचारांचे योग्य अनुमान आहे?

वाचन 8488 प्रतिक्रिया 27