मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गांधी जी

विकास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आज गांधी जयंती. गांधीजींच्या बाबतीत कायमच टोकाचे दोन्हीकडून बोलणे ऐकायला मिळते. त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार्‍यांनी खरा गांधीवाद कधी पाळल्याचे दिसले नाही. (अर्थातच नियमाला अपवाद असतील). असो. म.टा.च्या भारतकुमार राऊत यांचा खालील लेख वाचनात आला, समतोल वाटल्याने आवडला (तोच जर "सुमार साहेबांनी " लिहीला असता तर त्यात हिंदूत्व, संघ, भाजप वगैरेंना शिव्या आणि महात्म्याच्या ऐवजी सोनीयाच्या ओव्या वाचायला लावल्या असत्या!). आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. शिळी कढी म्हणजे नक्की कोणची? - 'सुज्ञास सांगणे न लगे' इतकेच म्हणतो! 'हे राम' ते अकाली गेले , याचे दु:ख साऱ्या जगाला झालेच ; पण ते 1948 मध्येच गेले , म्हणून त्यांची अलौकिक प्रतिमा भारतीयांच्या मनावर कायमची कोरली गेली , हेही खरेच. ... गांधीजींचा पराभव करण्यासाठी ब्रिटिशांनी जंग जंग पछाडले. त्यांच्या कार्यर्कत्यांवर लाठ्या आणि गोळ्या चालवल्या. पण त्यांना जे जमले नाही , ते स्वकीयांनी करून दाखवले. सर्वांनी मिळून त्या महात्म्याचा दारुण पराभव केला. तो पाहायला गांधीजी नाहीत , तेच बरे. नाहीतर त्यांच्यावर ' हे राम ' म्हणण्याची वेळ क्षणोक्षणी आली असती. आजचे दिनविशेष हे की , आज महात्मा गांधींची 57 वी पुण्यतिथी. 1948 साली याच दिवशी दिल्लीत गांधीजी नथुराम गोडसे नावाच्या हिंदुत्वनिष्ठाच्या गोळीला बळी पडले. शेवटचा श्वास घेण्यापूवीर् ते ' हे राम ' असे पुटपुटले. या दोन शब्दांनी त्यांच्यावर आकस ठेवणाऱ्यांच्या वादाचा मुख्य मुद्दाच निकालात निघाला. असो. गांधीजी नावाचा महापुरुष गेल्यानंतर 57 वर्षांनीसुद्धा त्यांच्या मृत्यूबाबतची नाटके चालतात आणि त्यांच्या जीवनाबरोबरच त्यांचा भर दुपारचा मृत्यूसुद्धा तितकाच ' नाट्यमय ' व भावनात्मकदृष्ट्या गूढ बनून राहतो , हे त्यांचेच महात्म्य. गांधीजी गेले , तेव्हा भारत स्वतंत्र होऊन जेमतेम पाच महिने झाले होते. राजकीय स्वातंत्र्य मिळाले , पाकिस्तानची निमिर्ती झाली , तरी भारतीयांमध्येच भावनिक स्वातंत्र्याची बिजे अद्याप नीटशी रुजलेली नव्हती. ब्रिटिशांचे राज्य दीडशे वषेर्च होते , हे खरे असले , तरी त्यापूवीर्ही भारत कोणत्या ना कोणत्या परकीय सत्तेच्या गुलामगिरीतच होता. मोगलांची चारशे वर्षांची सत्ता भारतीयांनीच सहन केली होती. त्यामुळे ' स्वातंत्र्य ' म्हणजे नक्की काय , याची कल्पना फारशी कुणाला नव्हती. चीन आणि रशियात कम्युनिस्टांची राजवट होती , त्याला स्वातंत्र्य म्हणायचे , तर पक्षविरोधी ब्र काढला , तरी राज्यर्कत्यांची नाराजी फार महागडी ठरत होती. अमेरिकेत लोकशाही होती , पण ती भांडवलदारी व्यवस्था भारतीयांना न परवडणारी होती. ब्रिटिश जनता लोकशाही मानत होती पण राजाला नाकारायला मात्र तयार नव्हती. अशा वेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले , म्हणजे नक्की काय झाले , ते कुणाला कळत नव्हते. काहींना वाटले , स्वातंत्र्य आले , म्हणजे आता ' कायदा ' नाहीच. कारण आतापर्यंत कायदा अंमलात आणणारे गोरे होते. त्यांच्या लाठीचा प्रसाद खाणे , इतकेच भारतीयांना ठाऊक होते. त्यातून गांधीजींनी ' सविनय कायदेभंग ' शिकवला. काहींना वाटले , स्वातंत्र्य आले म्हणजे गोऱ्यांची सत्ता जाऊन जवाहरलाल नेहरू ' राजा ' झाले. या चमत्कारिक परिस्थितीतून भारतीय जनता स्वत:ला सावरत असतानाच गांधीजी गेले. ते अकाली गेले , याचे दु:ख साऱ्या जगाला झालेच ; पण ते 1948 मध्येच गेले , म्हणून त्यांची अलौकिक प्रतिमा भारतीयांच्या मनावर कायमची कोरली गेली , हेही खरेच. जर गांधीजी पुढल्या काळात हयात असते , तर सत्तेसाठी काँग्रेसची शकले झालेली त्यांनी पाहिली असती. ते गेले आणि तीनच वर्षांत लोकनायक जयप्रकाश नारायण , आचार्य नरेंद देव , आचार्य कृपलानी प्रभूतींनी नेहरूंची साथ सोडून स्वत:ची सोशालिस्ट पाटीर् स्थापन केली. त्यावेळी गांधीजी असते , तर त्यांनी नक्की कुणाची बाजू घेतली असती ? तत्वासाठी काँग्रेसशी फारकत घेणाऱ्या जेपी बाबूंची की , आपल्या लाडक्या जवाहरची ? यापैकी कोणतीही भूमिका घेताना गांधीजींना तीव्र यातना झाल्या असत्या. ते स्वत: आग्रही मनोवृत्तीचे असले , तरी मध्यममागीर् होते. कारण भारतीय संस्कृतीचे मध्यममार्ग हेच महत्त्वाचे लक्षण आहे , असे ते मानत. त्यांना काँग्रेसमधील दुफळी मानवली असती का ? स्वातंत्र्याबरोबरच समानता आणि अस्पृश्यता निवारण , स्त्री-हक्क , शिक्षणाचे सार्वत्रिकरण , स्वदेशी आदी बाबी गांधीजींना प्रिय होत्या. गांधी हत्येनंतर चार वर्षांत भारतीय प्रजासत्ताकाची पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली आणि त्याच वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान दलित नेत्याचा काँग्रेसने मुंबईतच पराभव केला. हा धक्का गांधीजींना सोसावा लागला असता. गांधीजींनी धर्माचे अवडंबर माजवले नाही , तरी ते मनाने आणि वृत्तीने सच्चे हिंदू होते. ' ईश्वर-अल्ला तेरो नाम , भज प्यारे तू सीताराम... ' अशी त्यांची रामावर श्रद्धा आणि भक्ति होती. ते गेले , तेव्हा रामाच्या नावावर मते मागणाऱ्यांचे राजकीय पंथ उदयास यायचे होते. हिंदू- मुसलमान यांच्यात तेढ जरूर होती , पण हिंदूंमधीलच उच्च-नीच वादांमुळे या धर्माचा सामुहिकपणे त्याग करण्याचा विचारही कुणाच्या मनाला शिवला नव्हता. पण काही वर्षांतच डॉ. आंबेडकरांना धर्मांतराचा मार्ग स्वीकारावा लागला. गांधीजी असते , तर त्यांच्या हृदयाला लक्ष लक्ष टाचण्या टोचल्या असत्या. त्यानंतर तर राम जन्मभूमीचा वाद उद्भवला आणि साऱ्या देशाचे राजकारण बदलले. स्वत:ला गांधीवादी म्हणवून घेणारेही प्रवाहपतीत झाले , तर काहींनी मूग गिळून गप्प बसण्याचा ' समंजसपणा ' चा मार्ग अवलंबला. धर्मासाठी दंगली घडवून आणून रामाचेच नाव बदनाम करणारे आपल्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करतात , हे पाहून गांधीजींचा आत्माही तडफडत असेल. तेच सारे ते जिवंतपणी कसे पाहू शकले असते ? त्यांनी अहिंसेचा मंत्र जपला पण पुढे मात्र सारे जीवनच हिंसक बनले. पाकिस्तानची स्थापना करण्यास त्यांनी दु:खद अंत:करणाने परवानगी दिली खरी , पण फाळणी ही ' एकदाच घडणारी कृती ' ( श्ाठ्ठद्ग ह्लद्बद्वद्ग ड्डष्ह्ल ) आहे , असे त्यांना वाटत होते. म्हणूनच फाळणी नंतर हे दोन देश सुखात नांदतील आणि विभक्त संसार थाटलेल्या भावांप्रमाणे आनंदात राहतील , अशी त्यांची भाबडी समजूत होती. पण फाळणी ही एकदाच घडणारी घटना नसून ती सतत चालणारी प्रक्रिया ठरली आणि अनेक मानसिक व भावनिक फाळण्या होतच राहिल्या. हा आपल्याच तत्त्वज्ञानाचा पराभव त्यांना बघावा लागला असता. मुख्य म्हणजे त्यांनी ज्या संघटनेवर जीवापाड प्रेम केले , ती काँग्रेस आणि काँग्रेसजन यांचा ज्या वेगाने नैतिक ऱ्हास होत गेला , तो गांधीजींनाही रोखणे शक्य झाले नसते. त्यांनी काँग्रेसला जनतेची स्वातंत्र्यप्राप्तीची चळवळ मानले आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही चळवळ संपली म्हणून आता काँग्रेस विसजिर्त व्हावी , असे त्यांना वाटले. हा विचार नैतिकदृष्ट्या अलोकिक असला , तरी व्यवहाराच्या कसोटीवर चालणारा नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीत काँग्रेसचा निर्णायक वाटा होता. राजकारण म्हणून पुढच्या निवडणुकांत त्याचा फायदा घ्यायचा , तर काँग्रेस टिकायला हवी , हा व्यवहारी विचार नेहरू , वल्लभभाई पटेल आदी र्कांग्रेसजनांनी केला. गांधीजी त्याला विरोध करत राहिले असते , तर कदाचित पुढील काळात ते एकाकी पडले असते. कारण सत्तेपुढे असले ' शहाणपण ' कुणाला हवे होते ? एकूण आपण जे अंगिकारले आणि ज्याचे प्रबोधन केले , ती सारी शिकवण आपल्याच नावाने राज्य करणारे विसरल्याचे त्यांना दिसले असते. गांधीजी आणखी जगले असते , तर काँग्रेसवाल्यांना त्यांची ' अडचण ' च झाली असती. ते गेल्यामुळे त्यांचा फोटो प्रत्येक सरकारी कचेरीत लावून त्यांच्या साक्षीनेच सर्व भ्रष्टाचार करण्याची सोय झाली. गांधीजींनी ' ट्रस्टीशिप ' ची कल्पना मानली व ' इदं न मम ' या भावनेने संपत्तीकडे पाहावे , असे उद्योगपतींना सांगितले. त्यांच्या अनुयायांनी त्यांचेच चित्र शंभर रुपयांच्या नोटेवर छापून गांधीजींना ' श्रीमंत ' बनवले. ' सत्य ' हा ज्यांच्या जीवनाचा मूलमंत्र , त्यांचे चित्र असलेली शंभराची नोट सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराचे माध्यम आणि प्रतीक बनली. गांधीजींचा पराभव करण्यासाठी ब्रिटिशांनी जंग जंग पछाडले. त्यांच्या कार्यर्कत्यांवर लाठ्या आणि गोळ्या चालवल्या. पण त्यांना जे जमले नाही , ते स्वकीयांनी करून दाखवले. सर्वांनी मिळून त्या महात्म्याचा दारुण पराभव केला. तो पाहायला गांधीजी नाहीत , तेच बरे. नाहीतर त्यांच्यावर ' हे राम ' म्हणण्याची वेळ क्षणोक्षणी आली असती. भारतकुमार राऊत १९२४ साली गांधीजींनी केलेल्या२१ दिवसांच्या उपवासादरम्यान त्यांना ही सहा वर्षाची चिमुरडी मुलगी भेटायला गेली होती. तिचं नाव इंदिरा गांधी.

वाचन 60806 प्रतिक्रिया 70