मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सांधण दरी-एक निसर्गनवल

प्रचेतस · · कलादालन
कार्यालयीन कामकाजातून वेळ काढून नाशिकला मामाच्या गावाला जायचा उद्देश यावेळी निराळा होता. तो म्हणजे सांधण दरी ला भेट द्यायचा. अर्थात पूर्वीच नियोजन केल्याप्रमाणे २४ एप्रील ला मी आणी माझा मामेभाउ व त्याचा मित्र असे तिघे पहाटे ५.३० वाजता नासिक वरून निघालो ते त्याच्या चारचाकीने. नासिक-मुंबई महामार्गाने घोटीच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. थोड्याच वेळात डावीकडे औंढ्या, पट्टा, डुबेरे व उजवीकडे अंजनेरी,डांग्या, घारगड, कावनई असे किल्ले दिसू लागले. समोरच कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगडाची सह्याद्रीतील सर्वोच्च रांग दिसू लागली. आम्ही घोटीच्या अलीकडून डावीकडे वळण घेतले व मोरधन किल्ल्याच्या कातळभिंतीच्या शेजारून असलेल्या सडकेने बारी गाठले. बारी हे कळसूबाईच्या पायथ्याचे गाव. आसपासच्या सर्व शिखरांत कळसुबाई आपले सर्वोच्च शिखर त्यावरील मंदिरासह मिरवत होती. आम्ही खालूनच त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो ते भंडारदरा धरणापाशी असलेल्या शेंडी गावात पोहोचलो. इथून सांदण दरीला दोन रस्ते जातात. एक शेंडीच्या अलीकडून घाटघरच्या मार्गाने साम्रद गावाला जातो (२३ किमी) व दुसरा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला वळसा घालून घनचक्कराच्या पदरातून रतनवाडीच्या मार्गाने साम्रदला पोहोचतो (२६ किमी). आम्ह्लाला अर्थातच रतनगडाच्या पायथ्याल्या असलेल्या रतनवाडीच्या शिल्पसमृद्ध श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घ्यावयाचे असल्याने आम्ही रतनवाडीच्या मार्गाने निघालो. हा रस्ता निर्विवादपणे देखणा आहे. घनचक्कराच्या कडेने, तलावाच्या बाजूने कधी दाट झाडीतून तर कधी उघड्या आभाळाच्या साक्षीने ह रस्ता चढ उतार घेत वळणे वळणे घेत जातो. वाटेने कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगडाची रांग, बाजूलाच घनचक्कर रांग, त्याचे मुडा हे सह्याद्रीतील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर हे रौद्र दर्शन देतात. रतनगड व खुट्टा सुळका कायमच साथीला असतात. ३० मिनिटातच रतनवाडीला पोहोचलो. अमृतेश्वर मंदीर व त्याच्या जवळच असलेली कोरीव काम असलेली पुष्करणी (कुंड) आमच्या पुढ्यातच होती. मंदीराच्या पाठीमागेच रतनगड व त्याचा खुट्टा सुळका उठावला होता. पुष्करणी ही अतीशय देखणी व शिल्पसमृद्ध आहे. शंख, चक्र, गदाधारी विष्णू च्या अनेक प्रतिमा आहेत. शेषशायी भगवान विष्णू व लक्ष्मी तसेच गजाननाचीही प्रतिमा आहे. पुष्करणी पाहून आम्ही श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घेतले. १२०० वर्षांपूर्वीचे हे अतीशय देखणे हेमाड्पंथी कोरीव मंदीर आहे. मंदीराला पुर्वाभिमुख मुख्य द्वार व पश्चिमाभिमुख दुसरे द्वार अशी २ द्वारे आहेत. विविध शिल्पाकृतींचा खजिनाच इथे भरला आहे. हे सर्व डोळ्यांत व कॅमेर्‍यात साठवून चहा, पोहे खावून आम्ही आमच्या मुख्य उद्दिष्टाकडे म्हणजे सांदण दरीकडे जाण्यासाठी साम्रदकडे निघालो( रतनवाडीपासून साम्रद ५ किमी) थोड्याच वेळात तिथे पोहोचलो. इथेतर सह्याद्री आपले राकट सौंदर्य दाखवत उभा होता. रतनगड, खुट्टा यांचे एका वेगळ्याच बाजूने अतीशय प्रेक्षणीय दर्शन होत होते. बाजूलाच आजोबाचा महाकाय पर्वत आपल्याला आजोबा का म्हणतात ते दाखवून देत होता. कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगड पाठीमागच्या बाजूने रौद्र दर्शन देत होते. साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आहे. तिथे गाडी लावून आम्ही खंडूमामा यांस सांदण दरीची वाट दाखवण्यास बरोबर घेतले. १०/१५ मिनिटातच कातळाच्यासड्यावरून आमची वाट दाट झाडीत शिरली. व थोड्याच वेळात आम्ही एका घळीच्या मुखाशी आलो. सांदण दरीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे. सांदण दरीचे मुख.-- घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. दगडांनी तो बंदिस्त केल्यामुळे अतिशय निर्मळ असे ते थंडगार असे ते पाणी पिवून आम्ही उल्ह्सित झालो. घळ उतरायला लागलो. सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आम्ही आत दरीच्या नाळेत प्रवेश केला. आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय निरुंद नाळ होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती. पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला. साधारण १.५ फूट खोल १२/१३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून आम्ही कौशल्याने मार्ग काडून पलीकडे गेलो. आता तीव्र उतार सुरु झाला होता. नाळ अधिकाधिक अरूंद होत होती. कुठेही सपाट मार्ग नव्हता. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षर्शः तिथे खच पडला होता. आता आमचा मार्ग दुसर्‍या मोठ्या पाणसाठयाने अडवला होता. एका बाजूला ४.५ फूट खोल पाणी दुसर्‍याबाजूला ३ फूट खोल पाणी होते. हेही कधीही आटत नाही कारण सुर्य इकडे कधीही पोहोचू शकत नाही. अतिशय थंडगार अश्या त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार हा शब्दातीत आहे. प्रत्यक्ष अनूभवातूनच तो घ्यावा. अजूनही आमचा नाळेतूनच प्रवास चालला होता. जवळ जवळ १.५ किमी अश्या ह्या अरूंद नाळेच्या टोकाशी पोहोचायला ३० /४० मिनिटे लागतात. दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाश्याच्या छोट्या तुकड्यापलीकडे काहीही दिसत नाही. आता आम्ही नाळेच्या टोकाशी आलो होतो. आत इथून सह्य पर्वताचे उग्र दर्शन होते होते. ३५०० फूट सरळ तुटलेले कडे व रतनगडाचा कडा प्रेक्षणीय दिसत होता. ही नाळ पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जावुन मिळते. अर्थात आम्ही त्याच्या वाटेला गेलो नाही हे सांगणे न लगे. १५/२० मिनिटे तिथे थांबून आम्ही मागे फिरलो. परत त्या पाण्याचा थरार अनुभवला. दगडगोट्यांवरून दडस दडस चढून आम्ही घळीच्या बाहेर पडलो. अप्रतीम अश्या ह्या निसर्गनवलाने आम्ही अवाक झालो होतो. ही अरूंद घळ पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रीत परीणामामुळे बनली असावी. पूर्ण सांदण दरीत कधीही उन पोहोचत नाही त्यमुळे कायमच सुखद गारवा असतो. आता परत आजोबा, रतनगड, खुट्टा , कळसुबाई रांगेचे डोळे भरून दर्शन घेतले. साम्रद गावात अचानक छोटे चक्रीवादळ आले. साम्रद वरून घाटघरच्या वाटेने निघालो. घाटघरचा रौद्र कोकणकडा व पायथ्याचा तलाव व त्यावरील विद्युत प्रकल्पाचे इथून सुंदर दर्शन होते. तिथे थोडावेळ थांबून आम्ही आता धरणाच्या दुसर्‍या बाजूने निघालो. कळसूबाईच्या मागच्या पदरातून वळसा मारून परत शेंडी गाव व तिथून बारी, घोटी वरून आम्ही ३ च्या सुमारास नाशिकला पोहोचलो ते परत पुन्हा इथे यायच्या विचारानेच. --------------------- (भारावून गेलेला) वल्ली
लेखनविषय:

वाचन 34630 प्रतिक्रिया 38