मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हस्ताक्षरावरून स्वभाव! :)

विसोबा खेचर · · काथ्याकूट
राम राम मंडळी, हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखण्याचे एक शास्त्र आहे. मी या शास्त्राचा अभ्यास गेली अनेक वर्ष करत आहे. या कालावधीत आत्तापर्यंत अनेकांचे हस्ताक्षर बघायला मिळाले, अभ्यासायला मिळाले. मंडळी, माणसाचा स्वभाव हे एक अजब रसायन आहे. त्याचा संपूर्ण थांग आजपर्यंत कुणालाही लागलेला नाही हे मलाही मान्य. परंतु समजा मी एखाद्या माणसाला प्रत्यक्ष ओळखत असेन, त्याचा स्वभाव मला चांगला माहीत असेल, तरीही त्याचे हस्ताक्षर तपासल्यावर खूप काही नवीन गोष्टी कळू शकतात, कळतात! 'साधारणपणे माणसाचा स्वभाव जसा असतो त्याच पद्धतीने त्याच्या हाताचे वळण असते' या सिद्धांतावर हे शास्त्र उभे आहे. सहसा माणसाचे अक्षर खोटे बोलत नाही असा माझा अनुभव आहे. आजपर्यंत या शास्त्राच्या केलेल्या अभ्यासामुळे काही काही हस्ताक्षरं तर माझ्याशी थेट बोलतात आणि त्या माणसाचा स्वभाव भराभरा माझ्यासमोर उलगडतो असाही अनुभव आहे. अर्थात, मी वर म्हटल्याप्रमाणे मनुष्य स्वभाव (खास करून स्त्रियांचा स्वभाव) हे एक अजब रसायन आहे, त्यामुळे एखाद्याच्या हस्ताक्षराचे एनालिसिस जमत नाही किंवा चुकूही शकते. एक गोष्ट मात्र निश्चित की काही काही वेळेला हस्ताक्षराच्या एनालिसिसमुळे आपल्याच स्वभावातील काही सूप्त गुणदोष आपल्याला कळू शकतात. कदाचित ते कळल्यावर त्याचा आपल्याला त्याचा फायदाही होऊ शकतो! तर मंडळी, हे सगळं इथे लिहिण्याचं कारण असं की आता आपण इथे एक गंमतीशीर प्रयोग करणार आहोत. ज्यांना आपल्या हस्ताक्षराचे एनालिसिस माझ्याकडून करवून घ्यायचे असेल त्यांनी आपली इंग्रजी किंवा मराठी सही एका स्वच्छ कागदावर करून स्कॅन करून ते सँपल मला visoba_khechar@yahoo.com या पत्त्यावर पाठवावे. सहीखाली कंसात आपला मिसळपावचा आयडी लिहिण्यास विसरू नये. आपण बँकेतून पैसे काढताना किंवा क्रेडिट कार्डाच्या मागे जी सही करता ती सही मला कृपया पाठवू नये!! :)) एखादी नवी सही करा आणि ती मला पाठवा. जी सही आपल्या स्वभावानुसार आपल्याला सहज करायला जमेल तशी करा आणि ती मला पाठवा. मी आलेल्या सह्या इथे प्रसिद्ध करून त्याचं जाहीर एनालिसिस इथे लिहीन! :) कळू देत तरी एकमेकांना एकमेकांचे स्वभाव! :) तसे इथे साधारणपणे लिखाणावरून स्वभावाने कोण कसं आहे याचा अंदाज आपल्याला आहेच, तरीही काही गोष्टी नव्याने कळतील! :) आणि हो, एका बाबतीत मात्र निश्चिंत रहा, की केवळ एक गंमत म्हणून हा खेळ आपण इथे खेळत आहोत. एखाद्याच्या स्वभावात मला जर काही वेगळेपणा दिसला, जेणेकरून येथील वातावरण गंभीर होऊ शकेल असं काही आढळलं तर ते मी इथे अर्थातच लिहिणार नाही. ती गोष्ट मी संबंधित सभासदाला व्य नि ने कळवीन आणि त्याबाबत कुठेही वाच्यता करणार नाही एवढा विश्वास असू द्या! आणि अहो शेवटी मी तरी देव थोडाच आहे की मला अगदी सगळ्या गोष्टी इन ऍन्ड आऊट कळाव्यात? :) असो, तर मंडळी लागा कमाला. एखाद्या छानश्या कागदावर आपली मराठी किंवा विंग्रजी सही ठोका, त्याखाली आपला आयडी लिहा आणि द्या पाठवून मला! मग सांगतो इथे बरोब्बर कोण कसा आहे नी कोण कसा! :) आपला, (ग्राफालॉजिस्ट) तात्या अभ्यंकर.

वाचन 64826 प्रतिक्रिया 70