असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?
आमच्या तमिऴभाषेत लहान मुलांसाठी काही विशिष्ट काव्यप्रकारातील बालगीते रचली जातात. लहान मुले ही गीते अत्यानंदाने गाताना दिसतात. ही गीते साधारणत: शब्दभांडार समृद्ध व्हावे ह्या उद्देशाने केली गेली असली तरी विशेषतः नीतिशास्त्राची तोंडोळख करवून देणे हाही एक उद्देश त्यांत असावा. त्यापैकी आठवणींतले एक बालगीत इथे देतो आहे. असे पाहतां ह्या बालगीतात फार विशेष असा काही अर्थ नाही. तरीही एक लक्षात घेण्यायोग्य वस्तु अशी की ह्या बालगीताचा काव्यप्रकार हा खास 'तमिऴ' आहे.
| मूळ तमिऴ लिपीमध्ये |
देवनागरीमध्ये लिप्यंतरीत |
मराठीभाषेमध्ये भावार्थ (शब्दार्थ नाही) |
| அம்மா இங்கு வா வா |
अम्मा इङ्गु वाऽ वा |
आई इकडे ये ये |
| ஆசை முத்தம் தா தா |
आसै मुत्तम् ताऽ ता |
एक मुका घे घे |
| இலையில் சோறு போட்டு |
इलैयिल् सोऱु पोऽट्टु |
केळीच्या पानावर कालवलेला भात वाढ |
| ஈயைத்தூர ஓட்டு |
ईयैत्तूरऽ ओऽट्टु |
माशीस दूर पळव |
| உன்னைப்போல நல்லார் |
उऩ्ऩैप्पोलऽ नल्लार् |
तुझ्यासारखी छान छान |
| ஊரில் யாருமில்லை |
ऊरिल् यारुमिल्लै |
सार्या गावी कोणी नाही |
| என்னால் உனக்குத்தொல்லை |
ऎऩ्ऩाल् उऩक्कुत्तॊल्लै |
तुला कमीपणा येईल असे माझ्याकडून |
| ஏதுமிங்கு இல்லை |
एदुमिङ्गु इल्लै |
कधीही काहीही होणार नाही |
| ஐயம் இன்றிச்சொல்வேன் |
ऐयम् इऩ्ऱिच्चॊल्वेऩ् |
खात्रीपूर्वक सांगतो |
| ஒற்றுமை என்றும் உயர்வாம் |
ऒऱ्ऱुमै ऎऩ्ऱुम् उयर्वाम् |
एकी हेच बळ असे म्हणतांत |
| ஓதும் செயலே நலமாம் |
ओतुम् चॆयले नलमाम् |
सत्कार्य करणे चांगले असते असे म्हणतांत |
| ஔவை சொன்ன மொழியாம் |
औवै चॊऩ्ऩ मॊऴियाम् |
जुनेजाणते लोकही तेच सांगतात |
| அஃதே எனக்கு வழியாம் |
अक्दे ऎऩक्कु वऴियाम् |
त्यांचे वचन मला नेहमी शिरोधार्य आहे |
बारकाईने निरीक्षण केल्यास असे लक्षांत येईल, की ह्या काव्यातील प्रत्येक ओळीचा आरंभ हा स्वरांनी झालेला आहे. काव्यातील प्रत्येक पंक्ती ही दोन किंवा अधिकाधिक तीन शब्दांनी सिद्ध आहे. हे शब्दही अधिकाधिक चार ते पाच अक्षरांनी सिद्ध आहेत. ह्या काव्यलेखनप्रकारामुळे अशा काव्यपंक्तींस एक विशिष्ट नादानुसरणी प्राप्त होवून मुलांस स्वरे मनःपाठ होतात. त्यामुळे तमिऴभाषेवरील प्रीति अधिकच वृद्धिंगत होते, हाही एक अतिमहत्त्वाचा उद्देश आहे. खाली तमिऴ स्वरे दिली आहेत.
| அ अ |
ஆ आ |
இ इ |
ஈ ई |
உ उ |
ஊ ऊ |
எ ऎ |
ஏ ए |
ஐ ऐ |
ஒ ऒ |
ஓ ओ |
ஔ औ |
அஃ अक् |
हे काव्य हे ह्या तमिऴ काव्यप्रकाराचे केवळ एक उदाहरण म्हणून दिले आहे. ह्याप्रकारची वर्णमालेची क्रमवारिता पाळली गेलेली काव्यरचना तमिऴभाषेमध्ये 'क का कि की' ते 'इन इना इनि इनी' इत्यादी सार्या व्यंजनांपासूनदेखील होते. निरनिराळ्या काव्यप्रकाराचे विषयवस्तु निरनिराळे असू शकतांत. मराठीभाषेमध्ये ह्याप्रकारचे काव्य आहे काय ते जाणून घेण्याची इच्छा आहे. पूर्वी एकदा एका मित्राने श्री. शिवाजीमहाराजांचे आध्यात्मिक गुरु श्री. रामदासन ह्यांनी रचलेले एक मराठीभाषेतील काव्य पाठविले होते. (ते काव्य पूर्णपणे स्मरत नाही, तथापि त्यात विजापूराचा सरदार निघाला असल्याने काळजी घ्यावी असा संदेश असल्याचे मात्र स्मरते.) परंतु ते एक राजकीय काव्य होते, आणि त्यात वर्णमालेची क्रमवारी पाळली गेली नव्हती.
तरी मराठीभाषेमध्ये ह्या प्रकारचे काव्यप्रकार असतील तर ते कळवावेत.
धन्यवाद.
हैयो! हैयैयो!
- येथे तक्ते बनविण्यास श्री. टारझन ह्यांचे सहकार्य मिळाले, त्यांस धन्यवाद नोंदवितो.
- मिपामालक श्री.विसोबा खेचर ह्यांनी तमिऴभाषेतील काव्यप्रकाराची चर्चा करण्यास परवानगी दिल्यामुळे लिहिण्याचे धाडस करतो आहे. त्यांसही अनेकानेक धन्यवाद नोंदवितो.
-