मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तिरामिसु: A Piece of Cake

सुबक ठेंगणी · · पाककृती
'आपण खातो ते पदार्थ जर बोलू शकत असते तर त्यांनी काय बरं सांगितलं असतं?'असा मी ब-याचदा विचार करते. असाच एक मला विलक्षण गूढ वाटणारा पदार्थ म्हणजे तिरामिसु. नुसतं नाव घेतलं तरी तिरामिसुच्या घासाघासात भरलेल्या रुमानीपणाचा प्रत्यय येतो. कारण इटालियनमधे तिरामिसुचा अर्थ होतो “pick-me-up” एखाद्या रंगेल, बेफ़िकीर कलाकाराशी अनेक अफवा जोडल्या जाव्यात तसाच तिरामिसुही अनेक गुलजार कथांचा धनी आहे... काही सांगण्यासारख्या काही न सांगण्यासारख्या! असं म्हणतात की तिरामिसुचा जन्म पहिल्या महायुद्धाच्यावेळी झाला. त्यामुळे तिरामिसु म्हटलं की माझ्या डोळ्यापुढे येतं ते पहिल्या महायुद्धाच्या वेळचं इटली. चारी दिशांत भरलेली युद्धाची धुमश्चक्री. युद्धावर जायला निघालेल्या एखाद्या अनाम सैनिकाचं घर. कितीही निरोप घेतला तरी कमीच अशी वेळ. एका डोळ्यात विरह आणि दुस-या डोळ्यात त्याच्याविषयीचा प्रचंड अभिमान बाळगून चेह-यावर मंद हास्याचा मुलामा देणारी त्याची ती. इतरांकडून मिळालेले निरोप, आशीर्वाद, प्रार्थनांच्या बरोबरीनेच त्याने जपून ठेवलेली आणखी एक वस्तू. तिने स्वत: केलेलं तिरामिसु! त्यात घातलेल्या चीज, केक, अंडं, लिकर ह्या सा-याच गोष्टी त्याला लढायला ताकद देतील आणि सुखरूप परत आणतील अशी तिची वेडी अपेक्षा! आणि मग नीरव एकांतात तो ते तिरामिसु खात असताना त्या निर्जीव केकच्या थराथरातून उलगडत जाणारा क्रीमचा नितळपणा...अगदी तिच्या नितळ त्वचेशी स्पर्धा करणारा, किंवा तोंडाभर पसरत जाणारा कॉफीचा किंवा लिकरचा हवाहवासा मादक कडवटपणा...अगदी थेट तिच्यासारखा, त्यातच विरघळलेली चीजची लुसलुशीत आंबट चव...ती सतत त्याच्या जवळ असल्याची आठवण करून देणारी! नेहमीच तिरामिसु खाताना हे सगळं प्रेम मला जाणवतं...आणि मग कॅलरी वगैरेचा विचार करायला वेळच मिळत नाही. पारंपरिक इटालियन तिरामिसु करताना लिकर, केक, मास्कारपोनी (?) चीज आणि सॅवॉर्डी (?) बिस्किटं असं वापरतात. पण एका जपानी खाना खजानामधे मला मिळालेली तिरामिसु स्टाईलच्या केकची ही फूल-प्रूफ़ रेसिपी...अर्थात ह्या रेसिपीतही मिपावरच्या संजीव कपूर/ तरला दलालांच्या चिमूटभर कल्पकतेची भर पडली तर खरं तिरामिसु होऊ शकेलही! :)
साहित्य
  1. २ चहाचे चमचे भरून कॉफी पावडर
  2. १०० मि.ली. दूध
  3. १२ मारी बिस्किटे
  4. २०० मि.ली. क्रीम
  5. ५० ग्रॅम बारीक साखर
  6. २ चहाचे चमचे व्हिनेगर (पुस्तकात तांदळाचं व्हिनेगर वापरा असं लिहिलेलं आहे. पण मी फ्रुट- व्हिनेगर वापरूनही करते)
  7. एका अंडयाचा बलक
  8. सजावटीसाठी थोडी कोको पावडर (साखर नसलेली)
  9. मारीची ६ बिस्किटं (३ x २) झोपतील असा एक डबा
हे लागणारं सामान!
कृती
  1. कॉफी पावडर दुधात विरघळवा.
  2. मारी बिस्किटं त्या दुधात बुडवून ठेवा. बिस्किटं अखंडच रहातील (त्यांचा लगदा होणार नाही) याची काळजी घ्या. बिस्किटं पुरेशी भिजली की बाजूला काढून ठेवा.
  3. एका बाऊलमधे क्रीम घेऊन त्यात साखर फेटून विरघळवून घ्या.
  4. मग व्हिनेगर घालून पुन्हा थोडेसे फेटा. व्हिनेगर घातल्याघातल्याच क्रीम घट्ट होत जाईल. जवळजवळ भज्यांच्या पिठापेक्षा किंचित जास्त घट्ट होईल.
  5. आता त्यात अंडयाचा बलक घालून पुन्हा नीट फेटून घ्या.
  6. आता डब्यात ती कॉफीत भिजवलेली सहा बिस्किटं ३ x २ अशी ठेवा. त्यावर त्या फेटलेल्या क्रीममधलं अर्धं ओता आणि सारखं पसरा. त्यावर पुन्हा उरलेली सहा बिस्किटं लावून उरलेलं क्रीम पसरून घ्या.
  7. वरती गाळण्यातून कोको पावडर भुरभुरवा आणि ८-१२ तास फ्रीजमधे थंड करत ठेवा.
  8. चांगलं घट्ट झालं की त्याचे तुकडे करून आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर किंवा तिची आठवण काढत खा.
कॉफीत भिजलेली बिस्किटं
साखर, व्हिनेगर आणि अंडं मिसळलेलं क्रीम
फ्रीजमधून काढलेला केक
सुगरणीचा :P सल्ला
  • व्हिनेगरचं प्रमाण पुस्तकात जरी २ चमचे लिहिलं असलं तरी मी पहिल्यांदा केलेला केक मला जरा आंबट वाटला. म्हणून मी आता दीडच चमचा व्हिनेगर घालते. व्हिनेगरप्रमाणेच कॉफी पावडरचं प्रमाणही आवडीनिवडीप्रमाणे कमी-जास्त झालं तरी चालतं.
  • पण क्रीममधे साखर, व्हिनेगर आणि अंडं घालायचा क्रम बदलला तर मात्र पुढे जे काही होईल त्याला केक म्हणता येणार नाही. :)
"Pick-Me-Up!!!" आका तिरामिसु

वाचन 11896 प्रतिक्रिया 27