मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गायी दूध देत नाहीत

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गायी दूध देत नाहीत एक शेतकरी लहान असताना त्याच्या मुलाला सांगायचा: - जेव्हा तू वयाच्या 12 व्या वर्षी पोचशील तेंव्हा मी तुला आयुष्याचे रहस्य सांगेन. एके दिवशी जेव्हा सर्वात मोठा मुलगा 12 वर्षांचा झाला, त्याने चिंताग्रस्तपणे आपल्या वडिलांना विचारले की जीवनाचे तुम्ही रहस्य सांगणार होतात ते काय आहे. वडील म्हणाले गाय दूध देत नाही. "तुम्ही हे काय बोलताय?" मुलाला अविश्वासाने विचारले. “बाळा, गाय दूध देत नाही, आपल्याला ते (दूध) काढावे लागते. आपल्याला पहाटे 4 वाजता उठणे आवश्यक आहे, शेणाने भरलेल्या गोठ्या मधून चालणे आवश्यक आहे, गायीचे पाय, शेपटी बांधावी लागते, स्टूलवर बसावे लागते, बादली ठेवून दूध काढावे लागते. तेच आयुष्याचे रहस्य आहे, गाय दूध देत नाही तुम्हाला ते काढावे लागते. असेच बाजाराचे आहे. आपल्याला समभाग कोणते चांगले आहेत याचा अभ्यास करावा लागतो अचूक वेळेवर ते विकत घ्यावे लागतात आणि अचूक वेळेवर विकावे लागतात. यापैकी हा शेवटचा भाग सर्वात महत्त्वाचा आहे आणि तोच दुर्दैवाने कोणताही पंडित हे तुम्हाला कधीही शिकवत नाही. यामुळे काय होते. जसे एखादे फळ तुम्ही काढता तेंव्हा ते एकतर कच्चे निघते किंवा अतिपक्व झालेले असते. तद्वत एखादा समभाग तुम्ही घेता आणि तो चढला म्हणून खुशीने तुम्ही विकून टाकता आणि तो पुढे जाऊन मल्टी बॅगर होतो आणि तुमच्या दसपटीने नफा ( दुसऱ्याला) देतो. याउलट तुम्ही एखादा समभाग अजून चढेल म्हणून ठेवता आणि तो पडत जातो आणि सतत सर्किट लागत राहते आणि तुम्ही विकेपर्यंत त्यांची किंमत तुमच्या खरेदी किमतीच्या अंशमात्र होते. अशी स्थिती आपल्यासारख्या १०० % नाही तरी ९९ % सामान्य निवेशकांची कधीतरी किंवा बर्याच वेळेस होते. उरलेले १ % ज्यांचे समभाग कधीच पडत नाहीत आणि त्यांना कायम नफाच मिळत जातो आणि कोट्याधीश होतात असे विद्वान हे अपवादात्मकच आहेत त्यांच्या बद्दल मी बोलत नाहीये. मी यातून अनेक वेळेस गेलो आहे. उदा. मी टायटन या कंपनीचे समभाग २६० -२८० ला घेतले आणि ते वाढत वाढत जाऊ लागले. तेंव्हा ५०० आणि ६०० च्या मध्ये विकून टाकले. कारण सोने एवढे चढेल असे मला वाटलेच नाही आणि हे समभाग चढतच गेले आणि १५०० च्या वर गेले. याच्या उलट पिपावाव शिपयार्ड नावाचे समभाग मी ५०- ५५ रुपयाला घेतलेले होते ते ९० -१०० च्या पुढे गेले म्हणून मी अजून थांबू या असा विचार करून थांबलो. हि कंपनी श्री अनिल अंबानी यांनी विकत घेतली आणि मी विकायचा विचार करेपर्यंत त्याला लोअर सर्किट लागले आणि ती किंमत एक आकड्यात येऊन थांबली. आता ते समभाग विकून काय मिळणार अशा विचाराने मी ठेवलेले आहेत. तेंव्हा समभाग विकत घ्या आणि विसरून जा असे सांगणारे पंडित सुद्धा आपल्याला गाळात घालतात. १९८४ साली सेन्सेक्स १०० होता आणि आता जातो ५० हजार झाला आहे हे सांगणारे महापंडित एक विसरतात कि त्या वेळेस सेन्सेक्स मध्ये असलेलय ३० शेअर्स पैकी आता फक्त काही शेअर्स सेन्सेक्स मध्ये आहेत. आणि तेंव्हा तुम्ही ते समभाग घेऊन विसरून गेलात तर तुमचे पैसे बुडाले असते. मी स्वतः जेवढे समभाग लोकांच्या टिप्स वर विकत घेतले आहेत किंवा विकले आहेत त्यात ९० % पेक्षा जास्त वेळेस नुकसानच झाले आहे. आणि हि माणसे मला बुडवण्यासाठी असे करत होती असे मुळीच नाही तर काही माझे चांगले मित्र आहेत किंवा नातेवाईक सुद्धा. एवढंच झालं कि त्यांचा स्वतःचा अंदाज सुद्धा चुकला. उदा टाटा एलेक्सी हा समभाग मी २०० रुपयाला विकत घेतला होता तो चांगला २३०० पर्यंत गेला तेंव्हा माझ्या एका नातेवाईकाने जे स्वतः एका MNC मध्ये आय टी चे हेड आहेत त्यांनी या कंपनीचे व्यवस्थापन "भिकार" आहे असे सांगितले आणि त्यामुळे मी तो समभाग २३०० च्या आसपास विकून मोकळा झालो. यानंतर त्या कंपनीने एकास एक बोनस दिला आणि आता त्याचा समभाग २७०० च्या आसपास आहे. म्हणजे माझ्या साठी ५४०० पर्यंत गेला असता. हा मागच्या मार्च मध्ये मला घ्यायचा होता जेंव्हा तो ५००-५५० च्या आसपास होता पण इतर अनेक ब्लु चिप शेअर्स घातल्यामुळे माझ्याकडे पैसे नव्हते. या अनुभवानंतर मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मी स्वतः विकत घेतलेले बरेचसे समभाग चांगले होते आणि टिप्स वर घेतलेले बहुतेक सगळे समभाग भिकार निघाले. तेंव्हा आता "ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे" माझ्या एका मित्राने मला आमची जमीन विकताना एक साधी गोष्ट सांगितली.

तू जेंव्हा एखादा समभाग विकतोस तो कुणीतरी का घेतो? कारण तो अजून वर जाईल असे त्याला वाटत असते किंवा खात्री असते. अन्यथा त्याने तो घेतलाच नसता.

हि साधी गोष्ट ऐकून माझे डोळे खाडकन उघडले. तेंव्हा तुम्ही समभाग विकत घ्या आणि विसरून जा हा सल्ला सुद्धा पूर्णपणे उपयोगी नाही. मी एक निश्चय केला कि गायीचे दूध काढत राहिले पाहिजे अन्यथा गाय केंव्हा भाकड होईल हे सांगता येत नाही. प्रत्येक समभाग हा एका विशिष्ट पातळीच्या वर गेल्यावर आपले भांडवल त्यातून काढून घ्यायचे मग तो कितीही वर खाली गेला तरी तुम्ही नुकसानीत जात नाही. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे बाजार दर चार पाच वर्षातून एकदा जबरदस्त आपटी खातो त्यावेळेस उत्तमातले उत्तम समभाग विकत घायचे आणि ते पुढच्या पाच वर्षात उच्च पातळीला गेल्यावर विकायचे आणि आपले पैसे मोकळे करायचे. बाजारात हि वृत्ती मला गेल्या १३-१४ वर्षात तीन वेळेस सर्वात जास्त पैसे देऊन गेली आहे. उदा. आता मार्च अखेर २०२० मध्ये करोनामुळे बाजार जबरदस्त पडला होता तेंव्हा मी टी सी एस, लार्सन, स्टेट बँक सारखे अनेक समभाग घेतले जे आज एक वर्षात १०० % च्या आसपास परतावा देतील. बाजारातील पंडित तुम्हाला एस आय पी करत राहा हे उच्चरवाने सांगत राहतात. परंतु हे घेतलेले समभाग कधी विकायचे हे कोणीही सांगत नाही. यासाठी एक तर आपल्याला याचा चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे किंवा एक चांगला वित्त सल्लागार ठेवणे आवश्यक ठरते यासाठी दुर्दैवाने कोणताही ठोकताळा किंवा यशस्वी फॉर्मुला मला तरी माहिती नाही. कोणाकडे समभाग केंव्हा विकायचा याचे काही गणित असेल तर ते मी घेण्यास उत्सुक आहे. सध्या तरी एखादा भरपूर चढलेला समभाग मी विकायचा असेल तर बाजारातील पंडितांनी सांगितलेली किंमत असेल तर त्याच्या ८५ ते ९० टक्के भाव आला कि विकून टाकतो आणि हा एक फॉर्म्युला मला बऱ्यापैकी किमत देतो आहे असे जाणवले. कारण शेअर खान प्रभुदास लीलाधर सारखे ब्रोकर आपल्या ग्राहकाला रुपयाला १५०० चा समभाग घ्यायला सांगतात आणि १९०० ला विकायला सांगतात. पण बाहेर मुलाखत देतात तेंव्हा हा समभाग आता २१०० -२२०० पर्यंत जाणार आहे अशी मुलाखत देतात( आवई उठवतात). हा समभाग २००० कधीच पार करत नाही आणि १८०० ला हा समभाग चढतो आहे हे पाहून बाजारात शिरलेले अनेक हवशे नवशे आत येतात आणि आतच अडकतात. तेंव्हा मी माझ्या विकत घेतलेल्या समभागापैकी काही टक्के समभाग १८०० पासून विकायला काढतो आणि १९५० पर्यंत त्याचा मोठा भाग विकून मोकळा होतो. उदा फायझर या कंपनीचा समभाग मी ८०० रुपयाला घेतला होता तो चढत चढत ३५०० च्या वर गेला तेंव्हा पंडित लोकांनी हा ६००० पर्यंत जाईल अशी २०१९ मध्ये बातमी दिली होती. तेंव्हा हा समभाग मी तुकड्यातुकड्यात ३८०० ते ४४०० मध्ये विकून टाकले आणि यानंतर हा समभाग साधारण दोन वर्षात ५००० च्या आसपास फिरत आहे. यात एक दुसरा आडाखा असा आहे कि प्रत्येक अर्थवस्तू (asset) उदा फ्लॅट किंवा समभाग हि सिग्मोईड कर्व्हने वर चढते. आपण या चढत्या आलेखाच्या सुरुवातीस (toe) ती घेतली आणि वरच्या टोकावर( shoulder) वर विकली पाहीजे म्हणजेच या दोन बिंदूंमध्ये सर्वात जास्त नफा मिळवता येतो. उदा फायझरचे समभाग विकून मी ग्रॅन्युल्स इंडिया चे समभाग घेतले जे २०१९-२० मध्ये ८०-९०-च्या आसपास होते ते आता ३०० च्या वर आहेत म्हणजेच ते समभाग तिप्पट झाले आहेत पण फायझर मात्र २५ % च वाढला आहे. फायझर ४००० चा १२,००० (तिप्पट) होण्याची शक्यता पुढच्या ५ वर्षात तरी नगण्य आहे. माझ्या कडे कोणताही यशस्वी फॉर्मुला नाही कि माझा तसा दावा हि नाही. गेल्या १४-१५ वर्षात मी अनेक समभागात नुकसान केले आहे आणि अनेक समभागात भरपूर नफा सुद्धा केलेला आहे. गेल्या वर्षी विकत घेतलेल्या समभागामुळे सध्या मला बाजारात गेल्या १३ वर्षात सरासरीने १३-१४ टक्के नक्त नफा आणि त्यावर मिळणारा लाभांश धरल्यास १५-१६ % दरवर्षी मिळतो आहे. जेंव्हा जेंव्हा बाजार चढतो तेंव्हा मी त्यातून पैसे काढून घेतो आणि घेतलेलं कर्ज फेडून टाकतो. यात दोन वेळेस घेतलेलं सोनोग्राफी यंत्राचे कर्ज येते, दोन गृहकर्जे येतात आणि एक कारचे कर्ज येते. हि कर्जे नेहमी स्थिर टक्केवारीनेच असतात. याउलट बाजार बराच चढउतार करतो. त्यामुळे आपल्याला हवे तेंव्हा भरपूर परतावा मिळेल याची खरी नसते. म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन सुद्धा असतो असे मी ऐकले आहे. त्याचा कितपत फायदा मिळतो याची मला कल्पना नाही. सध्या माझ्या कडे १ रुपयाचे सुद्धा म्युच्युअल फंड नाहीत. मी डे ट्रेडिंग मुळीच करत नाही किंवा फ्युचर & ऑप्शन मध्ये सुद्धा अजिबात नाही. डे ट्रेडिंग साठी तुम्ही नऊ ते साडे तीन पूर्ण वेळ आपल्य संगणकासमोर असणे आवश्यक आहे. हे मला शक्य नाही. माझा सब ब्रोकर माझ्याच इमारतीत आहे तेंव्हा बरेच निवृत्त लोक तेथे रमणा करायला येत असत. एकदा माझ्या दवाखान्यात रुग्ण नसताना मी तेथे थांबलो होतो. तेथे चढणाऱ्या बाजाराचा जल्लोष चालला होता. तेवढ्या मला रुग्ण आल्याची वर्दी फोनवर मिळाली म्हणून मी उठलो तर तेथील एक निवृत्त सद्गृहस्थ म्हणाले "डॉक्टर कुठे चाललात? आता तर बाजार चढतो आहे". मी त्यांना एक इसापनीतीतील गोष्ट सांगितली. एकदा एका लांडग्याने एक गाढव धरले. त्याला तो खाणार एवढ्यात गाढव म्हणाले, हे बघ, माझ्या मागच्या पायात काटा घुसलेला आहे तो काढ म्हणजे मला खाताना तुला काटा टोचणार नाही. लांडगा काटा कुठे आहे बघत होता तोच गाढवाने त्याला जोरदार लाथ मारली आणि त्याचे सगळे दात पडले. लांडगा म्हणाला "बरं झालं, मला अद्दल घडली." माझ्या बापाने मला खाटकाचा व्यवसाय शिकवला होता हा वैद्यकाचा व्यवसाय करायची मला काय गरज होती?. मी त्या सद्गृहस्थाना सांगितले कि माझ्याकडे येणारा रुग्ण मला १०० % पैसे देऊन जाणार आहे. बाजार चढेल तसा पडेलसुद्धा. मी १२ वी नंतर साडे आठ वर्षे अभ्यास करून वैद्यकशास्त्र शिकलो आहे त्यानंतर ३० वर्षे अनुभव गाठीस आहे तेंव्हा त्यातून मिळणाऱ्या पैशाकडे मला पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. त्यावर माझा चरितार्थ चालतो. तेथे दुर्लक्ष करणे मला परवडणारे नाही. तेंव्हा बाजाराकडे लक्ष देण्यासाठी स्वतःच्या मूळ व्यवसायाकडे दुर्लक्ष करणे कुणालाच परवडणारे नाही हा लेख विस्कळीत आणि तुकड्या तुकड्यात आहे. याला मिपावरील वित्त तज्ज्ञ सुधारून देतील तर बरे होईल.

वाचन 15260 प्रतिक्रिया 37