Skip to main content

दोन मी

लेखक शरद यांनी शनिवार, 30/04/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. धनंजय यांची कविता वाचल्यानंतर कै. आरती प्रभू यांच्या एका जुन्या कवितेची आठवण झाली. दोन मी तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो तरिही मी कां चालतो ? तो बोलतो ना थांबतो. वाकल्याला अन् मला पाहुनीयां मोडतो, झाकितो तो गच्च डोळे, श्वास वक्षी रोखितो. अग्निजाळेच्यापरी तो नग्न आहे केशरी कल्पना होती अशी अन् अजुन आहे ती खरी. कोणते पोषाख त्याचे चोरिले मी भर्जरी, विकित बसलो येथ हाटीं, आणि खातो भाकरी. तो उपाशी तरिहि पोटीं लाज माझी राखतो, राख होतांनाहि ओठीं गीतगाणी ठेवितो. मैफ़लीला तो नि मी दोघेही जातो धावुनी; ऐकितो मी सूर, तो अन् दूरचे घंटाध्वनी. तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो. आरती प्रभू... "नक्षत्रांचें देणे " १९७५. प्रत्येक मनुष्याची एक split persomality असते. कलाकाराच्या बाबतीत त्यातला एक असतो कलाकार व दुसरा असतो नेहमीचे जीवन जगणारा सामान्य माणुस. इतरांच्या बाबतीत एक सामान्य माणुस असतो व दुसरा थोडा निराळा पण सामान्य माणुसच. त्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या बाबतीत फारश्या अडचणी येत नाहीत. पण मनस्वी कलाकाराच्या बाबतीत या दोघांचे एकत्र रहाणे हे एक त्रांगडेच होऊन बसते. तीन पायांच्या शर्यतीसारखे. कलाकार कसा आहे ? तो अग्निजाळेप्रमाणे तेजस्वी आहे व त्याला कोणताही आडपडदाही नाही. आपला साथी "वाकतो", तडजोड करतो, ही कल्पनाच त्याला असह्य आहे. तो डोळे गच्च मिटून घेऊन श्वास रोखून धरत आहे. मैफलीची बाजारी, उच्चभ्रु कला त्याला अजिबात पसंत नाही. त्या ऐवजी तो दूरचे घंटाध्वनी ऐकणे स्विकारतो. येथे घंटाध्वनी म्हणजे भक्ताची सच्ची आराधना आहे; समाजातील सर्वसामान्यांची सच्चाई आहे. पण साधारणत: श्रेष्ट कलाकाराला मान्यता मिळावयास दीर्घ कालावधी लागतो. तो मानसिक दृष्ट्या उपाशीच असतो. पण आपले "भर्जरी पोषाख", कलागुण, बाजारात विकायला आले तरी त्याला त्याची फिकीर नाही. आपण उपाशी राहूनही आपल्या साथीदाराला भाकरी मिळावी, त्याची लाज राखली जावी, याचे भान तो ठेवतो. सामान्याची झेप काय आहे ? कला ठेचाळली तरी तो मदतीला थांबत नाही; तिकडे दुर्लक्ष करून तो जीवन कंठतच असतो. पोटाला चार घांस मिळावेत म्हणून चोरी करावयाला त्याची ना नाही. कुठल्याही तडजोडीला त्याचा विरोध नाही. त्याला प्रखर तेजाची धार पार गडबडवून टाकते. बिचारा डोळे भिडवून पहावया ऐवजी डोळ्यावर पट्टी बांधून एकाकी कणाहीन जीवन पत्करतो. असेही " दोन मार्ग " असू शकतात! शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2598
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

!

रसग्रहण आवडले... अवांतर : कलाकार जनरली स्वतःच्या कौतुकात मग्न असतात, स्वतःला खूप शहाणे समजतात असा एक आगाऊ निष्कर्ष काढायला वाव आहे

कविता छान आहे. इथे लिहिल्याबद्दल आभार. संदिप खरे यांची 'मी हजार चिंतांनी या डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, हसतो शीळ वाजवतो' ही कविता याच तर्‍हेच्या कल्पनेची सध्याची 'ललित' आवृत्ती वाटते आहे. माझ्यातला वेगळा मी वगैरे कल्पना मला थोड्या अजबच वाटतात.