मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बरी नव्हे ही थट्टा!

प्रकाश घाटपांडे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
समर्थानी म्हटल आहे 'टवाळा आवडे विनोद' म्हणुन काही लगेच समर्थांना विनोदाचे वावडे होतं असे म्हणता येणार नाही. थट्टा मस्करी, टिंगल, विनोद विडंबन वात्रटिका प्रहसन, खिल्ली, चेष्टा गंम्मत नसती तर जगण्यातला (जीवन शब्द नको रे बाबा ) आनंद घेता आला नसता. विनोदाला असलेली कारुण्याची झालर, वेदनेला असलेले विनोदाचे कवच, विनोदाच्या अंतरंगात खदखदणारे अपमानाचे निखारे, सुडापोटी जन्मणारे विनोद, असहाय्ये पोटी जन्मणारे विनोद, कोल्ह्याला द्राक्षे आंबट या मानसिकतेतुन जन्मणार प्रहसन, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतरांना कमी लेखण्याची केलेली चेष्टा, इतरांना भानावर आणण्यासाठी उडवलेली खिल्ली. हे सर्व आपण अवती भोवती बघत असतो. मिपावरही घडत असतात. आनंद घारे सरांनी मिपाच्या वैशिष्ट्याचे वर्णन माझे मिसळपावरील पहिले वर्ष या लेखात अगदी यथार्थ केले आहे. मानवी भावनेचा तो अपरिहार्य भाग आहे. पण मग हे सर्व करावे की नाही? कुणी करावे? कशासाठी करावे? कुठल्या हेतुने करावे? कुठल्या ठिकाणि करावे? कुठल्या मनस्थितीत करावे? त्याचा कुणावर काय परिणाम होईल? याची उत्तरे ही (संकेत)स्थल, काल, व्यक्तीसापेक्ष आहेत. ती नक्कीच वेगवेगळी असणार आहेत. अगदी एका व्यक्तीची देखील वेगवेगळी असणार आहेत. कृष्णाने गोपींची केलेली टिंगल ही गोपींना हवीहवीशी वाटायची. त्यांचा कृष्णावरचा रागही लटका असायचा. आपल्या आवडत्या व्यक्तीने केलेली मस्करी हलकेच घेतली जाते. तिथे ह.घ्या चा परिचय असणे ची गरज नसते. पण आपल्या नावडत्या व्यक्तीने केलेले कौतुक देखील त्रासदायक वाटते. एखादी व्यक्ती आवडण वा नावडण हे गणित अतार्किक असते. आजच्या आवडणा-या व्यक्तीचा समावेश उद्या नावडणा-यात होउ शकतो अथवा उलटही होउ शकते. कोणाचे कोणाशी कधी व कसे जमेल व कधी व कसे फिसकटेल याचा नेम नसतो. भावनांची समीकरण / गुंता विचित्र असतो. हवस आणि नकोस वाटण एकाच वेळी घडु शकत. द्वेष आणि आदर एकाच वेळी असु शकत. आनंद आणि वेदना एकाच वेळा असु शकतात. "एकाच वेळी" चा वैज्ञानिक किस न काढता या कडे पहायचे झाल्यास भावनांची स्वरुप व्यामिश्र असते असे म्हणता येईल (गटणे चावला) आमचा बिट्टू भुभु देखील मूड असला कि नाकाने ढुसण्या देउन मला चेष्टा मस्करी,खेळायला करायला भाग पाडायचा. अस करताना त्याच्या डोळ्यातले खट्याळ मिष्किल भाव माझा ताण कुठल्या कुठे घालवुन टाकायचा. मग आम्ही भुंका भुंकी खेळायचो. तो माझ्यावर भुंकणार मी त्याच्यावर भुंकणार अगदी त्याच्या ष्टाईलने.मग माझ्या अंगावर धाउन येउन माझी मानगुट जबड्यात पकडायचा. बघणा-या ति-हाईताचा थरकाप होत असे. मी पळुन जायला लागलो कि माझी लुंगी पकडून ठेवत असे. जाम पकडायचा. जबड्यातुन सोडायाचाच नाही. लुंगी सोडुन पळुन जाणे हाच एकमेव पर्याय.अशा चेष्टा मस्करीतून एखादे वेळी लुंगी किंवा चादर फाटत असे. अंथरुणात तर आमच्या दंगामस्तीला उत येई. टर्र कन आवाज झाला कि डोळ्यातला मिश्किलपणाचा भाव जाउन चिंतेचा भाव येत असे. हा भावरंग इतक्या झटकन बदले. ए सॊरी हं! असा अर्थ त्यात मला वाचता येई. मग मी त्याला म्हणे ," मुद्दामुन नाही काही केलं की आमच्या बिट्टुनी. हो ना रे बिट्ट्या? " की लगेच परत तो नी मी खोड्या करायला मोकळे. मात्र त्याचा मुड नसताना मी त्याची चेष्टा केली तर तो दात विचकवुन माझ्यावर गुरकत असे. तरीही मी डिवचत राहिलो तर दुस-या खोलीत निघुन जात असे.मी त्या खोलीत गेलो कि किती माग लागाव माणसाने? अशा अर्थाचा कटाक्ष टाकत तो परत तिस-या खोलीत.मग मात्र मी थांबत असे. एखाद्याला नाही सहन होत थट्टा. तुमची थट्टा होते पण एखाद्याचा जीव जातो. मग तुमच्या आनंदा साठी एखाद्याला दु:ख द्यायच? कुठल्या नैतिकतेत हे बसत? कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतात. उगाच आपल गांजा मारल्या गत हॆहॆहॆ करत हासत सुटायचं?(स्वगत) प्रत्येक मनुष्य आनंद ,दु:ख, काम, क्रोध, मद, मत्सर या भावनांच्या मूड व मोड मध्ये कधी ना कधी असतो. त्या त्या मूड मध्ये त्याचे वर्तन तसे तसे असते. तरी देखील त्याची स्वत:ची अशी एक प्रकृती असते. कुठल्याही भावनांचा अतिरेक वाईटच. थट्टा मस्करी जरुर करावी पण बेतानं.स्वतःशी हसणे खिदळणे देखील देखील एखाद्याला थट्टा वाटु शकते. माझ्या एका बॅचमेट चा चेहरा सतत हसल्या सारखा असायचा.(त्याच्या दंताळी जबड्यामुळे) त्यामुळे त्याने साधे बोलले तरी एखाद्याला तो आपली थट्टा करतोय अस वाटायचं. गंभीर प्रसंगात त्याच्या प्रवेशानेच कधी पेच निर्माण व्हायचा. एखाद्याला गंमत केली तरी नाही आवडत. अशा वेळी क्षमस्व म्हणुन मोकळे व्हावे.जे थट्टा मस्करी करतात त्यांच्यात मिसळुन जावं . तरी देखील मनाच्या आत एखादा संवेदनशील कोपरा कळत नकळत दुखावला जाउ शकतो. एखाद्या च्या संवेदनशीलतेला मिपाची प्रकृती सर्व काळ मानवत नाही. म्हणुन म्हणतो थट्टा जरा जपुन. एकनाथांनी आपल्या भारुडात थट्टॆविषयी वर्णन केले आहे. ते म्हणतात. अशी ही थट्टा । भल्या भल्याशी लाविला बट्टा ॥ ध्रु ॥ ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी । थट्टेने हरविली बुद्धी । केली नारदाची नारदी । अशी ही थट्टा ॥१॥ थट्टा दुर्योधनाने केली। पांचळी सभेमाजी आणिली । गदाघाये मांडी फोडीली। अशी ही थट्टा ॥२॥ थट्टा गेली शंभोपाशी । कलंक लाविला चंद्राशी । भगे पाडीले इंद्राशी। बरी नव्हे ही थट्टा॥ ३॥ थट्टेने मेला दुर्योधन । भस्मासुर गेला भस्म होउन । वालीही मुकला आपुला प्राण । अशी ही थट्टा ॥ ४॥ थट्टा रावणाने केली । नगरी सोन्याची बुडविली । थट्टा ज्याची त्यास भोवली । बरी नव्हे ही थट्टा ॥ ५॥ अरण्यात होता भृगु ऋषी । थट्टा गेली त्याचे पाशी । भुलवुनी आणला अयोध्येशी । बरी नव्हे ही थट्टा ॥६॥ विराटराजाचा मेहुणा । नाम तयाचे किचक जाणा । त्याने घेतले बहुतांचे प्राणा । बरी नव्हे ही थट्टा ॥७॥ थट्टे पासुनी सुटले चौघेजण । शुक भीष्म आणि हनुमान । चौथा कार्तिकस्वामी जाण । त्याला नाही बट्टा ॥८॥ एका जनार्दन म्हणे सर्वाला । थट्टेला भिउनी तुम्ही चाला । नाही तर नेईल नरककुंडाला । अशी ही थट्टा ॥९॥ =======================================================================

वाचन 10275 प्रतिक्रिया 0