मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुरमई एनपॅपिलो

मोदक · · पाककृती
बरेच दिवस स्वयंपाकघरात हात साफ केला नव्हता म्हणून आणि शेफ केडी व जॅक ऑफ ऑल यांनी फोटो टाकून टाकून जळवले म्हणून एकदाची किचनमध्ये एंट्री मारलीच.. स्वतः मासे फ्राय करण्याची लज्जत मागच्या वर्षी अनुभवली होती म्हणून मासे हाच प्रकार निवडला आणि आमचे द्रोणाचार्य शेफ केडींना शरण जाऊन "माशांचा एखादा वेगळा प्रकार करायचा आहे. काय करू..?" असे विचारले. शेफ केडी यांनी "अरे बेटा.. दॅट्स व्हाय यू शूड कॉल मी..!!" असे बोलून चांगली व ताजी भाजी कुठे मिळेल, मासे कुठे मिळतील याची इत्यंभूत माहिती दिली.एनपॅपिलो या प्रकाराची ओळखही करून दिली. पूर्वी मी एकदा व्हेज बार्बेक्यू केले होते त्याच्या जवळपास जाणारी पाकृ होती. मासे घेताना हा एक प्रकार बघितला.. (हा वजनात मारण्याचा प्रकार आहे का..??) . तिथे जवळच एका भिंतीवर कुणाची तरी प्रतिभा ओसंडून वाहत होती. . तर.. सुरमई एनपॅपिलो साठी साहित्य - १) सुरमईचे जाड तुकडे २) आले, लसूण, मिरची, पुदीना, कोथींबीर वाटून त्याची पेस्ट ३) बडीशेप ४) हळद ५) मीठ ६) दालचिनीचे लहान तुकडे ७) २ पिवळेधमक आणि एकही डाग नसलेले लिंबू - हे शोधावे लागतात. ८) चमचाभर तूप ९) तेल १०) अ‍ॅल्युमिनीयम फॉईल सर्वप्रथम सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या. त्याला आले, लसूण, पुदीना, मिरची ही पेस्ट लाऊन आणि हळद व बडीशेप भुरभूरून मुरवत ठेवा. मुरवताना थोडेसे तेलही लावा. लिंबाचे गोल काप करून घ्या. (यासाठी एकदम धारधार सुरी लागते) . गॅसवर तवा / कढई गरम झाल्यानंतर त्यात तूप घालून त्यावर लिंबाचे काप पसरा आणि थोडे शेकून घ्या. अ‍ॅल्युमिनीयम फॉईल घेऊन त्यावर मुरवलेली सुरमई आणि लिंबाचे काप ठेवा, (लिंबाचे काप शक्यतो स्किन साईडला) दालचिनीचे तुकडे वर ठेवा. त्यावर एका बारीक किसणीने लिंबाची साल किसून घाला - याला लेमन झेस्ट असेही म्हणतात. . अ‍ॅल्युमिनीयम फॉईलचे दोन भाग घेऊन पहिल्यांदा एका भागाची घट्ट पुरचुंडी बांधा आणि नंतर त्यावर दुसर्‍या भागाची पुरचुंडी बांधा म्हणजे आत तयार होणारी वाफ निसटून जाणार नाही व त्या वाफेत मासा अलगद शिजेल. शक्यतो बाजूला घडी येईल अशी पुरचुंडी बांधा म्हणजे तव्याची धग माशापर्यंत नीट आणि समान पोहोचेल. . यानंतर प्रत्येक पुरचुंडी एका बाजूने १० मिनीटे व दुसर्‍या बाजूने ५ मिनीटे थोड्या गरम तव्यावर शेकून घ्या.यानंतर तव्यावरून पुरचुंडी उतरवून ५ मिनीटे तशीच ठेवा. लगेच उघडू नका. पुरचुंडी उघडल्यानंतर मासे + मसाला + बडीशेप यांचा फर्मास दरवळ पसरेल - तो चुकवू नका . सुरमई एनपॅपिलो थंडगार सोलकढी सोबत लगेचच संपतील. ****************************** ही पाकृ तयार होण्यास २० / २५ मिनीटे लागतील.. तोपर्यंत बांगडा तवा फ्राय बनवू शकता. . ******************************

वाचन 20463 प्रतिक्रिया 0