लॉजिक-जिम-लॉजिक
लॉजिक-जिम-लॉजिक
प्रस्तावना : लेखाचं नाव वाचून फार अपेक्षा ठेवू नका , तुम्हालाही अशी नग मंडळी कुठेना कुठे दिसतील जमल्यास त्यांचं वर्णन इथे करू शकता , बरेच दिवसांनी बोर्डावर पदार्पण करतोय सांभाळून घ्या
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्रविकेत ४ वर्ष जीवाची अमेरिका करताना आरोग्या कडे अर्थात पूर्ण दुर्लक्ष झाले , कार ते कार्पेट प्रवास , चालणं कमीत कमी किंवा नाहिच पार्किंग लॉट सर्वात जवळ पार्किंग साठी कसरत , वीकांताला मजबूत पार्ट्या , बटाटा , चीज आणि अमेरिका जागतिक मेलटिंग पॉट असल्याने सर्व जागतिक पदरात खाण हि आपली नैतिक जबाबदारी आहे असाच वाटून उलट सुलट खाण , बर पिणं म्हणजे एकदम तब्येतीने टकीला शॉट्स , सर्व प्रकारची कॉकटेल्स , बियर चे पिचर वर पिचर , वजन ७० kg वरून ८६ kg वर कस गेलं ते कळलंच नाही
पुढे भारतात परत आलो आणि झक मारत चालणं आल , ऑफिसला पहिलीच दिवशी मेन गेट पासून फक्त डेस्क पर्यन्त चालत गेलो आणि जबरदस्त दम लागला नंतर फार तर अर्धा km असेल , काही अति-उत्साही कार्य-कार्टे ऍम्ब्युलंस बोलवायला निघाले , त्यांना कस बस थांबवलं आणि डोक्याला जबरदस्त शॉट लागला , अनेक तरुण वयात हार्ट अटॅक ने गेलेल्या केसेस समोर यायला लागले , जवळपास बसण्याऱ्या मुलींची एकदम नजर बदलावी आपण एकदम बिचारे दिसावं कस तरीच वाटायला लागलं , ही शेवटीच काडी होती
दुसऱ्याच दिवशी सकाळी जुना मित्र नाक्यावर भेटला गडी तब्येतीने एकदम मजबूत बुलेट थांबून चौकशी गेली एक दमात सांगितलं अरे बाबा कुठली जिम सांगशील का ? त्याने मे अगदीच कसा अडाणी ह्या नजरेने एक मिनिट पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली , शिव -छत्रपती पुरस्कार मिळाला आहे मला आहेस कुठे बॉडी बिल्डिंग नॅशनल चॅम्प आहे , माझी स्वतःची जिम आहे उद्या पासून ये.
आता जिमला जाण आणि व्यायाम शाळेत जाण ह्यात बराच फरक असणार ह्याची जाणीव झाली , लहानपणी फक्त लंगोट आणि त्यावर हाफ पॅण्ट , मळलेला T-शर्ट ह्यावर आणि शेयर केलेला टॉवेल हैवर व्यायाम होऊन जयाचा , प्यायला माठाचं पाणी चालून जायचं , खरं तर अंग गरम झालं की पाणी प्यायलाच मनाई होती.. जोवर २०० जोर आणि ३०० बैठका मारता येत नाहीत तोवर कुठल्याही वजनाला हाथ लावायचा नाही असा सज्जड दम दिलेला असाच , व्यायामशाळेत गेल्या गेल्या बजरंगबलीच्या फोटोला नमस्कार करावा लागायचा आणि मग व्यायामाला सुरुवात मास्तर सांगायचे तसाच व्यायाम करायचा स्वतः डोकं अजिबात लावायचं नाही असा नियम , एकंदरीत खडतर प्रकार होता सगळा !!
दोन -तीन मित्रांना फोन करून विचारलं बाबा काय घेवाण जाव लागत , भरपूर लिस्ट मिळाली , चांगले shoes , ड्राय फिट जिम-वेयर , हेड बँड , पाण्याची स्वतंत्र बाटली , wrist बँड , आणि वजन उचलायला लागणारे हात मोजे वैगरे वैगरे एकंदरीत हे प्रकरण चांगलंच महागात पडणार ह्याची खात्री झाली पण शेवटची काडी आठवली आणि सगळे सोपस्कार लिलया पार पडले
सुरुवातीला अनेक कल्चरल शॉक बसले , आपली स्थूल शरीरयष्टी असून सुळसुळीत पोरींच्या बरोबरीने व्यायाम करायचा होता , मास्तरांचे सर झाले होते , स्वतः फक्त स्वतःच्याच बाटलीने पाणी प्यायचे , दुसरा कोणी सेट मारत असेल तर सरांनी सांगितल्या शिवाय मध्ये घुसायचा नाही , आल्या आल्या कार्ड काढायचं , स्वतः ची माप नियमित पणे घ्यायची कार्डावर लिहून घ्यायची सगळं लक्षात ठेवायला लागलो , बजरंगीबली - तसवीर हळू हळू कोपऱ्यात गेलीये , अचानक जिम्स ना कोस्मेपॉलिटिन लूक आलाय
ह्याच सगळ्या प्रवासात काही तऱ्हेवाईक व्यक्ति भेटल्या त्यातलेच खालील काही प्रकार
काडी - पैलवान - कीडकिडीत बांधा असलेले काही पोर दर सेट नंतर आपल्या बेंडकुळ्या आरश्यात बघतात , नसेल दिसतील तरी T-शर्ट चीक बाही वर करून पुन्हा पुन्हा पाहणार केवळ आपण जिम लावलीच आहे तर आपली बॉडी पण होतेच आहे असं समज , बाहेर पण दंड आणि छाती ह्यामध्ये एक काल्पनिक विटी (विटी दांडू वाली) आहे असं समजून नेहमी चालत आहे
मार्गदर्शक :- स्वतःची शरीरयष्टी कशी ही असली तर जन्मजात मार्गदर्शक , उगाच स्वतः हून पुढे होऊन अरे असा नाही असा सेट मारायचा असं तावातावानं सांगणं खूप महत्वाचं असत
गपिष्टखविस - व्यायाम हा जिम मध्ये करण्याचा दुय्यम प्रकार आहे असाच यांना वाटत , जो कोणी ओळखत असेल त्याला सतत गप्पा मध्ये खेचायचा प्रयत्न करतात , उगाच मोठे मोठे बॉडी बिल्डर आपल्याशी बोलतात , त्यांच्या बरोबर आपण पार्ट्या वैगरे करतो ह्याचाच समाधान असं त्यांना
जुनीखोड - आपलं वय झाला असेल तर आपण अजून तरुणच आहोत असं यांना वाटत , ह्याचा समोर एखादा पोरसवदा ज्या वजनाचे सेट मारत असेल त्याच ताकदीचे सेट मारायचा अयशस्वी प्रयत्न करणे , नाही जमलं तर वेगवेगळो कारण सांगायची , एक किस्सा आठवला जिम एक पासष्टी चे काका सेट मारत होते सेट काही केल्या जाईना , त्याच सुमारास आमच्या एरियात पाण्याची समस्या होती , एक टारगट पोराने काय काका पाणी येते का की बंद झालं काय असं जोरात विचारलं , काकांनी पण पण येत रे बाबा पण थोडं कमी दाबाने येत असं मिश्किल उत्तर दिल्या वर आख्खी जिम हास्यकल्लोळात बुडाली
हुचभ्रु - सर्व गोष्टी ब्रँडेड असल्याचं पाहिजे अगदी डोक्याच्या टोपी किंवा पायातले शूज सर्वच्या सर्व अगदी ब्रँडेड असलच पाहिजे , गुमान कानात नॉईस रद्द करणारे इअर फोन टाकून आपण बरे आणि आपला व्यायाम असं एकंदरीत धोरण , मैत्री पण अगदी ठराविक हुचभ्रु लोकांशी , क्रिकेट वर कोणी काय बोललं तर दुर्लक्ष पण युरो / कोप्पा अमेरिका म्हंटल की लगेच पुढं येऊन मत मांडणार , साधारण नेहमी फॉरेन ट्रीपच्या गप्पा , एकेक सेट मध्ये फूकेत , बाली , रिओ , वेगास वैगरे हाय-फाय गप्पा , बर हा वर्ग आता वाढत चालला आहे.
टवाळ कार्टी :- साधारण चांगलीशी मुलगी ज्या वेळेला येणार त्याच वेळा मॅच करून शक्य तितक्या वेळेस नेत्र पल्लवी करणं , काहीतरी कारण काढून बोलण्याचा प्रयत्न करणं वैगरे नेहमीचे उद्योग . ह्यांना ही जिम ही सुपर मार्केट असल्यासारखं वाटत , आमच्या इथे अशी पोर सहज टार्गेट होत असत , जिमचे सर पण जरा जास्तीच वजन द्यायचे मारायला , न मारलं तर इज्जत जाणार मग काय झक्कत मारतात आणि पुढले दोन दिवस गायब
कर्कश्यसेन :- कितीही वजन उचललं तरी आपण एकदम भारी उचलतोय , प्रत्येक सेटला शेवटी जोरात ओरडणार , मग वजन फेकून द्यायचं आणि एकदम विजयी नजर इतरांवर तुच्छतेने टाकायची हा ह्यांचा स्वभावधर्म
असे एक ना अनेक प्रकार पण हल्ली एकंदरीतच लोक व्यायामाबद्दल जास्त सजग आहेत , नविन नवीं काय-अप्पा ग्रुप्स तयार होतात आहेत (तिथे इतर ही विषय जास्त होतात) पण आज काल सकाळी लहान मुलांना शाळेत सोडून नोकरीला निघण्या आधी जो काही वेळ मिळेल तो जिम मध्ये घालवून वेळेचं सार्थक करणाऱ्या आया पण पाहतोय ..
अजूनही बराच काही लिहिता येईल पण ते नंतर कधी तरी ... तुम्ही पण तुमचे अनुभव टाकले तर बहार येईल
तोपर्यंत __/\__ बजरंगीबलीकी जय
वाचन
16624
प्रतिक्रिया
0