ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे
===================================================================
ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी... ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली... ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
===================================================================
मर्यादीत नैसर्गिक शरीरसाधने वापरून छोटे छोटे प्रवासी पक्षी मोठमोठी अंतरे काटतात. यामागची शास्त्रिय कारणे शोधून काढण्यावर शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रीत केले आहे... आणि मानवाच्या मर्यादांची क्षितीजे विस्तारायला त्या ज्ञानाचा कसा उपयोग होईल, यावरही !
त्यावर आपण पुढच्या भागांत विचार करु.
सद्या ८० वय असलेल्या वॉली जॉन्सनने मिनेसोटा (युएसए) येथिल मूरहेड स्टेट युनिव्हर्सिटीत प्रोफेसर असताना प्लोव्हर्सचा अभ्यास करायला सुरुवात केली. मायक्रोनेशियातील मार्शल बेटावर काम करत असताना त्याने पहिला प्लोव्हर पाहिला आणि तो त्याच्या प्रेमात पडला. जॉन्सनच्या अगोदर या पक्षाबद्दल कोणी फारसे संशोधन केले नव्हते. पेशाने physiologist व histologist असल्याने शरिरसंस्थांच्या आणि त्यातल्या पेशींच्या कार्यप्रणाली हा त्याचा अभ्यासाचा भाग आहे. अर्थातच प्लोव्हरसारख्या सतत प्रवास करणार्या पक्षांमधे हे काम कसे होते याबाबत कुतुहल असणे हे नैसर्गिक होते. मात्र प्लोव्हरमधला त्याचा रस जसजसा वाढू लागला तसतसा त्याचे लक्ष प्लोवरच्या प्रवासांवर व प्रवासी जीवनपद्धतीवर केंद्रित होत गेले. जॉन्सन २० वर्षांपूर्वी विद्यापिठातून निवृत्त झाल्यावरही त्याने प्लोव्हरवरचे संशोधन थांबवले नाही. ते का ? याचे जॉन्सनच्या शब्दांतले कारण आहे, "ते मला शक्य नाही (I can’t) !" असे हे दुर्मिळ वेड !!
प्लोव्हर प्रवासी आहे हे नक्की पण त्याची जीवनपद्धती व त्याचा प्रवासमार्ग याबाबत तशी फारशी माहिती नव्हती. अतीउत्तरेला प्रजनन करणारे हे पक्षी काही काळ दृष्टीआड होऊन हजारो किमी दूरवर परत दिसायला लागतात, इतकीच त्रोटक माहिती होती. इतक्या दूर ते कसे आणि कोणत्या मार्गाने जातात हा प्रश्न जॉन्सनला सतावत होता. म्हणूनच, जॉन्सनचा क्रमांक ९७ च्या सहाय्याने केलेला प्रकल्प याबाबतीत एक मोठे पाऊल समजले जाते.
अनेक मोठे प्राणी, मासे, फुलपाखरे आणि पक्षी अन्नासाठी व प्रजननासाठी ऋतुमानाप्रमाणे करत असलेले अनेक हजार किमीचे वार्षिक प्रवास ही काही फार नवीन गोष्ट नाही. तसे असले तरीही समुद्रकिनारी पक्ष्यांचा आकार पाहता, ते करत असलेले प्रवास त्यांच्या शारिरीक ताकदीच्या सीमा कल्पनातीतपणे ताणणारे असतात.
या पक्षांबद्दल अनेक प्रश्न शात्रज्ञांच्या मनात आहेत, त्यापैकी काही असे :
१. असा शरीराला प्रचंड ताण देणारे प्रवास दरवर्षी का केले जातात ?
२. या प्रवासांची सवय का व कशी विकसित झाली ?
३. लांबच्या प्रवासासाठी आवश्यक ते शारिरीक बदल कसे विकसित झाले ?
४. लांबच्या प्रवासासाठी लागणारे तंत्र कसे विकसित झाले ?
३. अन्नासाठी दरवर्षी हजारो किमी दूर जाण्याऐवजी मुबलक अन्न उपलब्ध असलेल्या जागेच्या जवळपासच्या सोईच्या जागा पाहून तेथेच कायमची वस्ती व प्रजनन का केले जात नाही ?
यापैकी एक किंवा अनेक गोष्टींसाठी आवश्यक ते शारिरीक बदल क्रमाने न होता वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांमधे वेगवेगळ्या वेळी आणि/किंवा वेगवेगळ्या क्रमाने झालेले दिसतात. अर्थातच, हे प्रकरण वरवर वाटते तितके सरळ सोपे नाही.
ज्या ज्या जागांवर प्लोव्हर दिसतो त्यांच्या भौगोलिक स्थानांवरून तो खूप मोठे अंतर न थांबता उडत जात असावा असा प्राथमिक अंदाज होता. खुद्द जॉन्सनच्या आकडेमोडीप्रमाणे हे अंतर ९,२०० किमी इतके मोठे असू शकते. असे अनेक परिस्थितीजन्य पुरावे असले तरी त्या अंदाजांना सिद्ध करणारे शास्त्राला मान्य होणारे सबळ पुरावे मिळत नव्हते.
काही काळापूर्वीपर्यंत प्रवासी पक्षांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी त्यांचे जागोजागी निरिक्षण करणे हेच महत्वाचे तंत्र होते आणि ते बर्यापैकी बेभरवशाचे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानात झालेल्या विकासामुळे, 'जिओलोकेटर' व 'सॅटेलाईत ट्रान्समिटर' यासारखी "अत्यंत लहान आकाराची आणि अत्यंत कमी वजनाची" साधने निर्माण केली गेली आहेत. ही उपकरणे कोणतीही समस्या न येता छोटे पक्षीही आपल्या अंगावर बाळगू शकतात. उपग्रहांची मदत घेण्याच्या तंत्रामुळे पक्षी दर जागेवर प्रत्यक्ष नजरेस पडण्याची गरज नसते; पक्षांच्या समुद्रावरच्या प्रवासात तर हे शक्यही नसते. पण तरीही, या नवीन तंत्रांमुळे, पक्षाच्या प्रवासातील प्रत्येक स्थल-काल खात्रीलायकरित्या नक्की करणे शक्य होते.
अशी आधुनिक उपकरणे हाती आल्यापासून शास्त्रज्ञांनी काही आश्चर्यकारक निरिक्षणे नोंदवलेली आहेत. त्यातली काही अशी...
* २००७ साली 'बार टेल्ड गॉडविट्' नावाच्या कावळ्यापेक्षा जरा लहान आकाराच्या पक्ष्याच्या शरिरात शल्यक्रिया करून एक सॅटेलाईट ट्रान्समिटर बसवला गेला. या प़क्षाने अलास्का ते न्युझिलँड हे जवळ जवळ १२,००० किमीचे अंतर ९ दिवसांत विनाथांबा पार केले. हा कोणत्याही पक्षाने केलेल्या विनाथांबा प्रवासाचा नोंदला गेलेला विक्रम आहे.
* जॉन्सनच्या निरिक्षणांप्रमाणे अलास्का (युएसए) ते क्विन्सलँड (ऑस्ट्रेलिया) हा ११,००० किमी चा प्रवास अनेक प्लोव्हर पक्षांनी केला आहे.
* प्लोव्हर पक्षांपेक्षा आकाराने खूप लहान असलेला 'शार्प टेल्ड सँडपायपर' पक्षी अल्पवयीन असतानाही अश्याच विनाथांबा महाभरार्या घेताना आढळतो.
* 'रुडी टर्नस्टोन' नावाचा पक्षी उत्तर धृवीय प्रदेश ते ऑस्ट्रेलिया अश्या चकरा नियमितपणे मारतो.
एके काळी अविश्वनिय वाटणार्या या विनाथांबा महाभरार्या अनेक पक्षीजमातींची दरवर्षीची नियमित कृती असल्याचे पुढे येत आहे !
या महाभरार्यांची कल्पना करण्यास खालील नकाशा उपयोगी पडू शकेल...
लेखमालेतील सर्व फोटो लेखाखाली दिलेल्या यादीत उर्धृत केलेल्या जालावरील संदर्भलेखांतून किंवा इतर जालस्त्रोतांवरून घेतलेले आहेत.
===================================================================
वाचन
8982
प्रतिक्रिया
0