मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी नवी मैत्रेण

सर्वसाक्षी · · जनातलं, मनातलं
गजर झाला आणि झोपमोड झाली. मस्त गुबगुबित बिछान्यात रज‌ईत गुरफटलेला देह बाहेर पडायला राजी नव्हता. पाठोपाठ दूरध्वनी किणकीणू लागला आणि उठणे भाग पडले. दहाचे उड्डाण म्हणजे न‌ऊला हजेरी, म्हणजे साधारण आठला बाहेर पडणे आले. म्हणजे सातला उठलेले बरे. जरा आळसावायचे, एक चहा, जरा टंगळमंगळ, पुन्हा चहा, मग दाढी, तुषारस्नान, मग सामानाचा ताळेबंद एवढे सगळे जमवयला तास तरी हवाच. आठ दिवसाच्या दौर्‍यात पाच गावे पालथी घालायची तर ’विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर’ अशी स्थिती. रोज नवे गाव, नवे हॉटेल, रोज सामान उघडा आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा बांधा. चालायचेच! हँगज्झौ सारखे देखणे गाव वेस्ट लेक वर न जाता सोडणे अगदी जीवावर आले होते, पण ना‌ईलाज होता. मारे आवरून आटोपून नाश्ता करून हॉटेल मधून सामानसह बाहेर पडलो आणि विमानतळाच्या दिशेने निघालो मात्र... सकाळी उठल्यावर ज्याचे कौतुक केले ते धुके आता प्रश्नचिन्ह हो‌उन उभे ठाकलेले दिसत होते. रस्त्यात पन्नास फुटांपलिकडचे दिसत नव्हते तर उड्डाण रखडणार हे न दिसणार्‍या सूर्या‌इतके स्पष्ट होते. मात्र तिथे जा‌ऊन ठाकलेले बरे, उशीर असला तर काढु वेळ असे म्हणत असतानाच हस्तसंच वाजला. हुंगयान होती, धुक्यामुळे तिला वनज्झौ ला पोचायला उशीर होणार होता, कदाचित संपूर्ण दिवस रखडून ती संध्याकाळी उशीराने मला भेटणार होती. मात्र काम अडणार नाही असा दिलासा देत तिने वनज्झौ विमानतळावर मला आणायला अमिशी येत असून तिला इंग्रजी येते असा दिलासा दिला. अंदाजा प्रमाणे तीन तासाच्या विलंबाने अखेर एकच्या सुमारास उड्डाण भरले आणि दोन वाजता वनज्झौला दाखल झालो. विमानत़ळावर अमिशी माझ्या नावाची पताका घे‌ऊन हजर होती, त्यामुळे तिला ओळखायला अडचण पडली नाही. बरोबर हु महाशय होते, ज्या आस्थापनेला भेट द्यायची होती तिचे संचालक. आधीच उशीर झाला आहे, आता जेवण-खाणात वेळ न घालवता थेट कार्यालय गाठू असे मी सांगत असाताना देखिल मंडळी एका भोजनगृहात घे‌उन गेली. म्हणजे आता दिड तास गेला. मला कामची चिंता होती कारण तो एकच दिवस हातात होता. अमिशी फारच मोकळी आणि गप्पिष्ट निघाली. एकमेकाची, कामाची माहिती देता घेता जेवण संपले आणि आम्ही कचेरीकडे निघालो. चीनी मुलींच्या मानाने मोठे डोळे असलेली, सोनेरी बटा कपाळावर भुरभुरणारी आणि बोलता बोलता मधेच मान वेळावायची लकब असलेली अमिशी खूप दिवसांच्या ओळखीची असल्यागत बोलत होती. कचेरीत छा घे‌उन कामाल सुरूवात झाली. अमिशी उत्साहाने त्यांच्या आस्थापनेची, उत्पादनांची माहिती देत होती. हु महाशयाना चीनी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा येत नसल्याने आमच्या दरम्यान दुभाषाचे कामही तीच बजावत होती. बराच वेळ चर्चा व कमकाज झाल्यावर जरा विरंगुळा म्हणुन अंग ताणत बाहेर दाराशी आलो आणि मस्तपैकी हुंगमे‌ई वांग शिलगावली. दाराबाहेर ये‌ऊन धूर सोडतोय तोच दारात काळी मोटार ये‌उन थांबली आणि दरवाजा उघडला व ती बाहेर आली. तिचे लक्ष माझ्याकडे गेले. हा कामानिमित्त आलेला कुणी परदेशी असावा असा अंदाज बांधत तिने एक झकास स्मित दिले आणि मी नि हाव म्हणायच्या आत ती दारातुन आत शिरली. पाठोपाठ मीही धुम्रपान आवरते घेत बडिशेपेची चिमुट तोंडात टाकली व आत बैठकिच्या खोलीत आलो. माझ्या अंदाजा प्रमाणेच ती तिथेच होती. मला पाहुन काहीशी लाजत ती पटकन मागे वळली आणि उगाच कपाटातल्या वस्तू काढु लागली. अमिशीने आतापर्यंतची टिपणे वाचुन दाखवायला सुरुवात केली. मी ही सगळे मुद्दे ऐकत होतो, म्हणजे तसे दाखवत होतो पण माझे लक्ष अमिशीच्या बोलण्यापेक्षा तिच्याकडे अधिक होते. थोडा वेळ आडुन आडुन बघत आणि नजरा नजर झाल्यावर गोड हसत ती अजिबात न बोलता वावरत होती. गोरीपान नितळ कांती, विलक्षण बोलके डोळे, धनुष्याकृती भिवया, आखूड केसांच्या चीनी पद्धतिच्या बटवेण्या मागे बांधलेल्या, खालचा ओठ मधेच दाताखाली दाबत भिरभिरत्या नजरेने बघणारी ती मुलगी मला एकदम मंत्रमुग्ध करुन गेली. ते ओळखुन अमिशीने तिला हाक मारली आणि आमची ओळख करुन दिली. ती हु महाशयांची मुलगी होती, तिलाही फक्त चीनीच येत असावी. न पेक्षा ती माझ्याशी बोलली असती. मग मी हात पुढे करून तिच्याची हस्तांदोलन करीत विचारले नि शम्मा मिंग ज्ज? प्रथमच थेट माझ्या डोळ्यात बघत ती लाजत म्हणाली ’चा‌ई येन’. मग तिच्या लक्षात आले की अजुनही तिचा हात माझ्याच हातात होता. लगबगीने तो मागे घेत शेजारच्या खुर्चीत बसली. मैत्रीला भाषा नसते म्हणतात त्याचा प्रत्यय आला. आमचा संवाद भाषेची अडचण न येता साधत होता. काम संपले. एव्हाना सात वाजायला आले होते. काळोख पडला होता. अमिशीने जेवायला जा‌उया असा आग्रह धरला. तुम्हाला उशीर होतोय, ही तुमची जेवायचीच वेळ आहे, तुम्ही मला हॉटेल वर सोडा. तशीही हुंगयान अजुनही पोचलेली नाही, तिला वेळ आहे असा निरोप आहे तर मग ती आल्यावर आम्ही जेवु असे मी सुचवले. चाई येन् हळूच् अमिशीच्या कानाशी लागत् काहीतरी बोलली आणि मग माझ्याकडे पाहत तीने अमिशीला हलकेच धपाटा घातला. हसत हसत अमिशी म्हणाली, बघ तुझी मैत्रिण् इतका आग्रह करत्ये तर चल की जेवायला. आपण निघुन जेवायला जाणार, उपाहार गृहात पदार्थ मागवणारे मग ते येणार तो पर्यत हुंगयानही पोचेलच. अमिशीचे बोलणे संपताच चाई येन् पुढे आली आणि मला घेउन बाहेर निघाली. हा आग्रह मोडणे शक्यच नव्हते. बाहेर आम्ही सगळे जण येण्याची वाट पाहत उभे असताना चाई येन् हलक्या आवाजात गुणगुणत असल्याचे जाणवले. माझ्या ते लक्षात आले आहे आणि मी ऐकत आहे हे समजताच चाइ य़ेन् लाजली आणि मान् खाली घालुन उभी राहीली. अरे वा, सुरेख् गातेस् की तू! थांबलीस का? आमच्या भावनांना शब्दाचे बंधन नव्हते. भाषा भिन्न असुनही जणु तिला ते समजले. तिने खुणेने तुही म्हण असे सुचवले. काहीही बोलले तरी चाई येन् गोड हसायची आणि मग् स्वत्:शीच् लाजायची. अमिशी व हु कागदपत्रे आवरून व कचेरी बंद करायला सांगुन् बाहेर आली. गाडी कडे जाताच् पटकन पुढे होत चाई येन् ने मागचा दरवाजा उघडला व हाताने मला आत बसण्याची खूण केली अर्थातच एक गोड स्मित चेहऱ्यावर खेळवतच. मी आत शिरताच तीही शेजारी बसली. आम्ही लवकरच एका भल्या मोठ्या प्रशस्त अशा उपहारगृहात पोचलो. दालनात शिरताच चाई येन् ने माझ्या शेजारची खुर्ची धरली आणि माझ्या खांद्यावरचा संगणक थैला त्या खुर्चीवर ठेवत मला हाताला धरुन पलिकडच्या दालनात घेउन गेली. माझ्या चेहर्‍यावरचे ’कुठे नेते आहेस’ हे भाव अचूक् ओळखत आपली नाजूक निमुळती बोटे ओठाकडे नेत ’पदार्थ दाखविण्यासाठी नेत आहे’ असे तिने सुचविले. बरोबरच होते ते; चीन मध्ये प्रत्येक मोठ्या उपहारगृहात सामिष-निरामिष सर्व पदार्थ व भाज्या, फळे तसेच मासे, खेकडे, झिंगे वगैरे जलचर जीव् काचेच्या पेट्यांमध्ये तर भाज्या व फळे वर रक्षक पापुद्रा लावुन हारीने मांडून ठेवलेली असतात; आपल्याला जे हवे ते निवडाचे व सेवक वर्ग ते शिजवुन आणतो. मी पटकन् मत्स्यपर्व ओलांडुन तिला घेउन भाज्या ठेवलेल्या भागात् घेउन आलो व सांगितले - ’वो शुथ्साय्’ मेइयो रो, मेइयो ची, मेइयो चितान्..(मी शाकाहारी आहे, मला मांस, मासे, अंडी नकोत्). ओठाचा चंबू करीत ती ओ असे म्हणाली व माझ्या साठी फळे, मिठाया वगैरे निवडु लागली. आता अमिशी आमच्या पठोपाठ येउन मागे उभी राहीली व लटक्या रागाने मला म्हणाली, ’नवी मैत्रीण् फारच आवडलेली दिसते, तिच्या सहवासात् मला देखिल विसरलास’. मग ती काय् म्हणते आहे ते चाई येन् ने तिला विचारले. आम्ही मेजावर स्थानापन्न झालो. जेवण् येताच् अमिशीने माझ्या साठी ’ताओ-च्छा’म्हणजे काटा चमचा मागवला, मात्र चाइ येन् ला ते आवडले नाही. तिने मला बांबूच्या काड्या घेउन खायची खूण केली. मी खुणेने ’जमत नाही’ असे सांगताच ती लटक्या रागाने पाहत खुर्चीतुन उठली आणि माझ्या शेजारी येउन उभी राहीली व तीने आपल्या हाताने मला काड्या धरयला शिकवल्या. मी एक शेंगदाणा टिपताच तिने उजवा अंगठा उंचावून दाखवला. पदार्थ येत होते. अमिशी, हु मला पदार्थ सांगत् होते. एका बशीत आक्रोडसारखी पण कमी कठीण अशी कवचीफळे आली. त्याला इंग्रजीत काय् म्हणतात ते कुणालाच माहित नव्हते. त्याला चीनी मध्ये ’ह्ख् त्थाव’ असे म्हणतात. मग् चाई येन् ने मला उच्चार शिकवला. आता मला येत नसलेले शब्द उच्चारुन् घेणे तिला फारच् आवड्ले, माझे चुकिचे उच्चार ऐकताना खळाळुन हसत ती माझ्या कडुन योग्य उच्चार करुन घेत होती. काकडीला जेव्हा मी ’क्वांगव्हा’ असे लयीत म्हणुन दाखवले तेव्हा ती खुष झाली. दिवसभर धुक्यामुळे वाहतुकीत अडकलेली हुंगयान आता तिथे दाखल् झाली. तिचे जेवण् मागवे पर्यत मग् मी आणि चाई येन आपापल्या भाषेत गाण्यांच्या ओळी गुणगुणत होतो. मी कॅमेरा काढला व तिची छबी अनेक प्रकारे टिपली. जेवण संपले. निघायची वेळ झाली. खरे तर पाय निघत नव्हता पण जायला तर हवे होते. दुसर्‍या दिवशी सकाळी तीन तास प्रवास करुन तायज्झौ गाठाचे होते. निरोपाची वेळ् आली. मी चाई येन् चे हात् हातात घेत झाय चियेन (पुन्हा भेटुया) म्हणालो खरा पण नक्की कधी भेटणार् असा प्रश्न दोघांच्याही चेह्ऱ्यावर होता. काय गंमत् आहे! काही तासांच्या ओळखीत आमची गाढ मैत्री झाली होती, अगदी अनेक वर्षे एकमेकाला ओळखत असल्यासारखी. मी कॅमेरा अमिशीच्या हातात दिला व तिला आमचे दोघांचे चित्र टिपण्यास सांगितले. मी आणि चाई येन् शेजारी शेजरी उभे राहिलो. ’जरा हसरे चेहरे करा’ असे सांगत अमिशीने किरण साधला व ती कळ दाबणार इतक्यात मी तिला थांबवले. चाई येन् ने प्रश्नार्थक चेहर्‍याने माझ्याकडे बघीतले. मी तिला पटकन उचलुन घेतली व त्याच क्षणी अमिशीने आम्हाले टिपले.

वाचन 12451 प्रतिक्रिया 0