मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमचे क्रिकेट अंपायरिंग ... भाग १ ... परीक्षा

भडकमकर मास्तर · · जनातलं, मनातलं
परीक्षा आपण रणजी किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यात बघतो ते अंपायर कसे तयार होतात ? प्रथम स्थानिक असोसिएशनची परीक्षा द्यायची, पास झाले की स्थानिक सामन्यांमध्ये अंपायरिंग करायची, काही विशिष्ट पंधरा की वीस सामने झाले की तुम्ही त्या असोसिएशनच्या पॅनलवर येणार. मग पुढची परीक्षा द्यायला पात्र ठरणार.या सगळ्या परीक्षा दर वर्षी होत नाहीत. चार पाच वर्षांतून एकदा होतात. पुढची परीक्षा विभागीय. पण त्यासाठी प्रत्येक असोसिएशनकडून पाचच अंपायरना परवानगी.मग आपल्या असोसिएशनमध्ये पहिल्या पाचात येण्यासाठी परीक्षा द्यायची.त्यानंतर विभागीय परीक्षा पास व्हायचे. प्रथमश्रेणी मॅचेस करायच्या. त्याच्या राष्ट्रीय पॅनलवर यायचे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय परीक्षा द्यायची , पास झाल्यावर प्रथम एकदिवसीय मॅचेस करायच्या आणि मग तुम्ही कुठेही माती खाल्ली नाहीत तर कप्तानांच्या गोपनीय रिपोर्टप्रमाणे तुमची आंतरराष्ट्रीय टेस्ट पॆनलवर निवड होणार... यात तुम्ही ज्या पातळीवरचं क्रिकेट खेळला असाल तिथली परीक्षा देऊन अंपायरिंगला सुरुवात करता येते. प्रथमश्रेणी खेळलेला खेळाडू नंतर थेट झोनल परीक्षेला बसू शकतो आणि रणजी अंपायरिंग करू शकतो.( उदा. वेंकटराघवन टेस्ट खेळले असल्याने थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरची परीक्षा पास होऊन कसोटी करू शकले) सध्याच्या आंतरराष्ट्रीय टेस्ट पॆनलवर भारताचा एकही अंपायर नाही. ( गेली तीन वर्षे बेस्ट अंपायर किताब मिळवणारा सायमन टॊफ़ेल हा आपला फ़ेव्हरिट अंपायर) क्रिकेट खेळणं आणि त्यावर चर्चा करणं ( बाष्कळ गप्पा मारत वेळ वाया घालवणं) हा माझा कायम आवडीचा भाग होताच. पण चला अंपायरिंग करूया, असं कधी वाटलं नव्हतं... अंपायर म्हणजे सामना संपल्यावर घरी जाताजाता शिव्या घालायचा बकरा अशीच समजूत बराच काळ टिकून होती. आमच्या भागात एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात अंपायरिंग केलेले पंच राहत होते, त्यांच्याकडून कळालं की आता पुण्याच्या एमसीयूए (महाराष्ट्र क्रिकेट अंपायरिंग असोसिएशन) तर्फ़े पंचनिवडीसाठी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा तेव्हा चार वर्षांतून एकदा होत असे.माझी बारावी नुकतीच संपली होती. रिझल्ट आणि ऍडमिशनचा गोंधळ, मेडिकल इन्जिनियरिन्गच्या प्रवेशपद्धतीवर कोर्टाचा स्टे चालू होता. काहीच काम नव्हतं. म्हटलं बसून टाकावं परीक्षेला... जमेल तशी पंचगिरी करू. मग पुस्तकं आणली. तेच सर रोज शिकवणार होते. हे ते मुख्य ४२ लॉज असलेलं पुस्तक.... आणि ते खालचं पुस्तक आहे एक्स्पेरिमेन्टल लॉजचं... रोज एखादा दुसरा लॉ शिकत महिनाभर हसतखेळत क्लास चालला. त्यानंतर पुष्कळ प्रश्नपत्रिका सोडवल्या. सरांनी अगदी वेगवेगळ्या असोसिएशनच्यासुद्धा प्रश्नपत्रिका आणल्या होत्या.एकदम भारी चाललं होतं काम. तेव्हा काही कामधंदा नव्हता त्यामुळे भरपूर अभ्यासही केला. महिनाभर रोज सरांकडे माझ्यासारख्या बारा पंधरा जणांचा क्लास भरत असे ( यात वयवर्षे १२ पासून ४८ पर्यंतच्या लोकांचा समावेश होता.)...त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. जुलै १९९३ मध्ये कधीतरी नेहरू स्टेडिअमच्या एमसीएच्या ऒफ़िसमध्ये लेखी परीक्षा झाली. त्यात पहिल्या पाउण तासात ५० (एका वाक्यात उत्तरवाले) फ़टाफ़ट प्रश्न सोडवायचे आणि पुढल्या सव्वादोन तासात दीर्घोत्तरी १०० मार्कांचे प्रश्न. पहिला पार्ट थोडा अवघड होता. पुढचा मोठ्या उत्तरांचा अभ्यास बरा झाला होता त्यामुळे एल्बीडब्ल्यू, नो बॉल वगैरे प्रश्न मजबूत लिहिले... लेखी परीक्षेत ८० % ला पासिंग होतं.थिअरी पास होणार्याला प्रॆक्टिकलसाठी बोलावणं येणार होतं. प्रॆक्टिकल : थिअरी पास झालो... प्रॆक्टिकल परीक्षा काय असणार आहे अंदाज येत नव्हता. सरांनी सांगितलं होतं की यात खेळाच्या नियमांच्या ज्ञानाबरोबरच मुख्यत: तुमचं लक्ष, तुमची खेळावरील पकड आणि स्थितीवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता हे तपासणार. त्यासाठी अभिरूप सामना खेळला जातो . मॉक मॅच. सगळे सीनियर अंपायरच खेळतात, परीक्षार्थी अंपायर म्हणून उभा राहतो. त्याच्यामागे दोन परीक्षक... आजूबाजूला क्षेत्ररक्षकांची फ़ौज. मग विचित्र अपील करणे, बोलरने बॆट्समनला शिव्या देणे,धमक्या देणे, टोपीत कॆच पकडणे,हेल्मेट फ़ेकणे, पिचवर फ़ील्डर्स येणे, बॆट्समनने गार्ड घेताना पिच खराब करणे, हाताने स्टंप पाडून अपील करणे, क्रीजच्या मागून बोलिंग टाकली म्हणून हा नो बॊल द्या असे बॆट्समनने अंपायरला आग्रह करणे असले वाट्टेल ते प्रकार करतात. मग आपल्या ऎक्शनबद्दल परीक्षक मागून लगेच प्रश्न विचारणार आणि त्यावर नियम सांगून उत्तर द्यायचं. अशी पंधरा वीस मिनिटं प्रॆक्टिकल परीक्षा चालते. माझी परीक्षा सुरू होताना एक बोलर तिथेच शूज बदलायला बसला, त्याच्याशी बोलून त्याला या गोष्टीची परवानगी नसल्याचे सांगितले. नाहीतर मैदानाबाहेर होऊन शूज बदला असे सांगून मी येतोय तोपर्यंत बॅट्समन म्हणाला, तेवढं माझं हेल्मेट धरा." मी नाही म्हणालो.. मग म्हणाला, "त्याला काय होतंय ? धरा की थोडा वेळ"... मी शक्य तितक्या ठामपणे नाही म्हणालो. मग म्हणाला, " इथेच ठेवतो कडेला." मला वैताग आला, मी ओरडलो, " ते बाहेर ठेवा मैदानाच्या." तो भारी होता, म्हणाला," न्या की तुम्हीच"... मला हसायलाच आलं.. मग परीक्षक मागून म्हणाले, " आता काय करणार?" मी म्हणालो, " त्यांच्या बाराव्या खेळाडूला बोलवून ते बाहेर न्यायला लावणार, किंवा बॆट्समनच्या डोक्यावरच ठेवणार... पण ते हेल्मेट मैदानावर ठेवणार नाही किंवा मी धरणार नाही" ... .मग मी बोलरला विचारले, " कशी बोलिंग टाकणार?" तो म्हणाला," कशीही टाकेन ... मला दोन्ही हाताने टाकता येते." असले विनोदी प्रकार चालले असले तरी न हसता तिथे उत्तर द्यावंच लागतं...मग तिथे नियम शिकवून आलो..... माझी जागा घेतली, बॆट्समनला साईड आणि आर्म सांगितला.... परीक्षक म्हणाले, " करायचं का सुरू?" ... तेवढयात माझे लक्ष समोरच्या स्टंपवरच्या बेल्सकडे गेले... मी परीक्षकांना म्हणालो, " अहो इथल्या बेल्स कुठे गेल्या?" मला लक्षात आलं की मी बोलरकडे गेलो असताना कोणीतरी बेल्स मुद्दाम ढापल्या होत्या. मग तिथेच फ़िरून आवाज दिला की ज्याने कोणी बेल्स घेतल्या असतील तर परत द्याव्यात. मग पलिकडेच आमचे एक वृद्ध आणि अनुभवी अंपायर मिस्किल चेहर्‍याने उभे होते, त्यांनी बेल्स परत दिल्या. मी म्हणालो, " तुम्ही खेळाडू आहात ना? मग पुन्हा अशा बेल्स उचलू नका" त्यांनी हसून मान डोलावली.... नंतर नॊनस्ट्रायकर बॆट क्रीजमध्ये ठेवून पण पार्श्वभागाला बॅट टेकवून हाताची घडी घालून नुसताच क्रीजबाहेर उभा होता. त्याला मी रन आउट दिल्यावर ( कारण बॅट नुसती शरीराला स्पर्श करून चालत नाही तर हातात धरावी लागते. )त्याने ठणाणा केला, मला "तू बाहेर ये तुला बघतो" अशी धमकी दिली.... मग मी तुला रिपोर्ट करेन असे म्हणालो... वगैरे वगैरे गोंधळ नुसता.... अशी परीक्षा झाली. मला वाटले बरी झाली असावी ... पण एकाच वेळी तिथे इतक्या गोष्टी चालू होत्या... या सगळ्या गोंधळात काही गोष्टींकडे दुर्लक्षही झाले असेल... मग दुपारच्या सत्रात तोंडी परीक्षा झाली. प्रत्येकाला सेम २५ प्रश्न विचारले गेले... . हे प्रश्न म्हणजे थिअरीमधल्या एका वाक्यात उत्तरे लिहा सारखे प्रश्न होते. त्यातले बरेचसे मला आले....एकूण परीक्षा बरी गेली होती.पास होण्याची बरीच आशा होती. पण तीन चार महिने परीक्षेच्या निकालाबद्दल काहीच कळेना.... मधल्या काळात डेन्टिस्ट्रीला प्रवेश मिळाला. कॉलेज सुरू झालं. थोडंफ़ार इन्टरकॉलेज क्रिकेट खेळलो. तेव्हाच अंपायरिंग परीक्षा पास झाल्याचं पत्र आलं. माझा आनंद गगनात वगैरे मावेनासा झाला.... त्या पत्रावर मी कॉलेजात पुष्कळ शायनिंग मारल्याचे स्मरते. असो... पुढे पुष्कळ मॅचेस करायच्या होत्या.... मग कळणार होती खरी गंमत. क्रमश:

वाचन 6948 प्रतिक्रिया 0