काही कविता.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
टरकावलेला चतकोर
तुकडा कागदाचा.
हवातसा वारा आल्यावर
मिजासखोर पतंग झाला.
हक्काचे आकाश
मागायला मोकळा.
---------------
अल्लाद टिक्करबिला खेळणारा अंगठा.
उंबर्यात ठेचकाळून पुन्हा पुन्हा
रक्ताळला काळानिळा.
आता,
घरभर लंगडी लंगडी.
-------------------------
बारीक दाताच्या फणीनी
आयुष्याची एकेक बट विंचरून
मी विचारलंच ,
ठकूबाई,ठकूबाई,
जाणार कुठे गं
होमसीक झाल्यावर.
--------------------------------
एकेक वर्षं उसवत गेलं
अंगणापासून चौकापर्यंत
चिंध्यांच्या चेंडूंसारखं.
कृष्णा,पुरे झाल्या का
भरजरी शालूच्या धांदोट्या.?
--------------------------------------
(पतंग,टिक्करबिल्ला, ठकू बाहुली,चिंध्यांचा चेंडू या प्रतिमा वापरून मुक्तक लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. सुधारणेचे स्वागत आहे.)
वाचन
8100
प्रतिक्रिया
0