भ्रमणगाथा - ७ गरुडघरटं
लेखनप्रकार
याआधी: भ्रमणगाथा - ६
गुंफा उतरुन खाली येईपर्यंत एक वाजून गेला होता. आल्प्सच्या त्या डोंगरात मिळणारे पाणी परडवणारे नाही हे माहित होते त्यामुळे डबाबाटली सोबत होती. गाडीत बसल्याबसल्याच सँडविचांचा फन्ना उडाला. खाली उतरताना वाटेत लागतो अतिसुंदर 'होहन वेर्फन श्लॉस '!
होय तीच ही गढी जी "व्हेअर इगल्स डेअर" चित्रपटात दाखवली आहे. जिला 'श्लॉस ऍडलर ' नावाने चित्रसॄष्टीत ओळखतात. तेथे रेंगाळणे अपरिहार्यच होते पण थोडक्या वेळात सारे काही बसवायचे असल्याने नाइलाजाने तेथे जास्त वेळ न घालवता निघालो.
आता जायचे होते ओबेरसाल्झबुर्गला,इगल्सनेस्ट म्हणजेच ते सुप्रसिध्द टीहाउस,Kehlsteinhaus पहायला. हा सारा परिसर डोंगराळ भागात आहे.ओबेरसाल्झबुर्ग म्हणजे साल्झबुर्गचा वरचा भाग! आल्प्सचा तो सारा परिसरच इतका सुंदर आहे की शब्द आणि प्रतिभाही अपुरे पडतात.
हुकुमशहा हिटलरकडे कलाकाराचे मन होते त्यामुळेच बहुदा येथे सुंदर प्रासाद बांधवून घेतला असावा. तसेच हा सगळा डोंगराळ भाग,रस्ते वळणांचे, कठिण चढणीचे असल्याने शत्रू तेथे सहजपणे पोहोचू शकणार नाही , असाही विचार होता.ते पाहून थोरल्या महाराजांच्या राजकारणात गडकिल्ल्यांचे असलेले वेगळे महत्त्व ह्याने वाचले होते की काय? असा विचार उगाचच मनात आला.
गरुड नेहमी उंचावर ,सहज कोणाला दिसणार नाही आणि कोणाच्या हाती लागणार नाही अशा ठि़काणी आपले घरटे बांधतो. जर्मनीचा राष्ट्रीय पक्षी गरुड! साहजिकच ह्या गरुडाधिराजाचे हे घरटे म्हणजेच हिटलरच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मार्टिन बोहरमानने बांधवून घेतलेले हे केहलस्टाइन हाउस ! शाही पाहुण्यांच्या खास खातिरदारीसाठी ह्याचा उपयोग केला जाई.अतिशय सुंदर ठिकाणी ,उंच जागी बांधलेला हा प्रासाद आणि तेथे जाण्याचा डोंगरातून खोदलेला वळणावळणाचा रस्ता अवघ्या १३ महिन्यात बांधून काढला गेला.अतिशय कठिण चढण आणि टोकावर पार्किंगसाठी केलेली खास जागा हा स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना समजला जातो. ह्या सुंदर प्रासादात हिटलर स्वतः फक्त तीन वेळा राहिला. एक तर अतिशय उंचावर बांधलेला हा प्रासाद आकाशातून सहज लक्ष्य करता येईल अशी त्याला भीती वाटे. त्या काळातही तेथे वर जाण्यासाठी एक पितळी लिफ्ट बांधली होती जी ३० सेकंदात ३० मीटर अंतर जाते. ही लिफ्ट बंद पडली तर.. अशीही भीती त्याच्या मनात असे.त्यामुळे तो तेथे राहणे टाळत असे. इव्हा मात्र त्या सुंदरतेची भुरळ पडून तेथे अनेकदा जात असे व राहत असे.
दुसर्या महायुध्दाच्या हालचालींचे केंद्रस्थान ह्याच भागात बेरेष्टेसगार्टन रिजन येथे होते.फ्यूररचे वास्तव्य ह्या भागात जास्त असल्याने या भागाला 'ब्रांचऑफिस ऑफ बर्लिन' असे गमतीने संबोधले जात असे. येथेच माइनकान्फ च्या पैशातून १९३३ साली विकत घेतलेले वाखनफेल्ड हाउस ज्याचेच पुढे बर्गहोफ असे नामांतर झाले तो हिटलरचा प्रासाद आणि हेरमान गॉरिंग,मार्टिन बोरमान,अल्बर्ट स्पिअर आदि बर्याच अधिकार्यांचे बंगले होते परंतु महायुध्दातल्या बाँबवर्षेत तेथील घरे उध्द्वस्थ झालीच आणि बर्गहोफलाही त्याची झळ पोहोचली .तरी बर्गहोफ बर्याच प्रमाणात चांगल्या अवस्थेत होते. मात्र १९५२ मध्ये बव्हेरियन गवर्मेंटने ते निओनाझी मंडळींची पंढरी होऊ नये म्हणून उध्द्वस्थ करुन टाकले आणि तेथे झाडे लावली. त्या खुणा सांगणारी एकही गोष्ट आता तेथे नाही,त्यांची जागा फक्त वृक्षांनी घेतली आहे. युध्दसमाप्तीनंतर हा सगळाच भाग अमेरिकनांच्या ताब्यात अनेक वर्षं होता.
वर टीहाउस कडे जाणारा रस्ताही फार सुंदर आहे ,त्या रस्त्याने प्रवास करणे हाच एक अनुभव आहे असे म्हणतात.तेथे जाण्यासाठी त्यांच्या ठराविक बसनेच जावे लागते. खाजगी वाहनांना मज्जाव आहे.आम्ही हे गरुडघरटे पहायला अतिउत्सुक होतो पण.. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा पावसाचा जोर वाढला होताच पण वाईट बातमी म्हणजे वर जाणार्या बसेस पावसामुळे आणि खराब हवेमुळे बंद केल्या होत्या.आता इगल्सनेस्ट पाहणे शक्य नव्हते. थोडेसे निराश होऊन आणि परत इथे यायचेच असे मनाशी ठरवून आम्ही पायथ्याशी असलेल्या बंकर्सकडे वळलो. हे बंकर्सही असे बांधले गेले की सहजासहजी ते दृष्टीस पडणार नाहीत. आज तेथे दुसर्या महायुध्दाचे माहितीकेंद्र तथा म्युझिअम केले आहे .
आत पोहोचलो ते विस्फारल्या डोळ्यांनीच! एकूण जर्मनीतच हिटलर, दुसरे महायुध्द यावर बोलणे सारेच जर्मन टाळतात.त्या काळच्या खुणाही शक्य तिथे पुसून टाकल्या आहेत. त्यामुळे त्याबाबतची माहिती मिळणं तसं कठिणच,पण येथे मात्र दुसर्या महायुध्दाच्या काळातल्या अनेक खुणा जपल्या आहेत. जुनी वर्तमानपत्रे, फोटो,चित्रफिती ह्या सार्यातून इतिहास सामोरा येतो.
खुद्द बंकर्स पाहताना तर थक्क व्हायला होते. बंकर म्हणजे लपण्यासाठी,आसर्यासाठी केलेली सोय ,त्यामुळे मला उगाचच लहानसे जमिनीखाली केलेले बांधकाम असे काहीतरी चित्रं डोळ्यासमोर होते. पण येथे आपल्याला दिसते डोंगराच्या पोटात वसवलेले छोटेसे गावच जणू! जमिनीखाली जवळजवळ सहा मजले उतरुन गेले की एका वेगळ्याच विश्वात प्रवेश!काय नव्हतं तिथे?
हे तर मोठ्ठे बंकर्सकाँप्लेक्सच दिसते. यात वेगवेगळी आठ युनिट्स असून त्यातील पाच युनिट्स आतून जोडली आहेत.आतमध्ये सुसज्ज दिवाणखाने, शयनगृहे,भटारखाने,भोजनकक्ष, हमामखाने,कचेरीदालने,वैद्यकियसेवाकक्ष तर आहेतच पण एक कारागृह सुध्दा आहे. टेलिफोनचे जाळे असून ८०० एक्स्टेनशन्स आहेत.वीज,पाणी एवढेच नव्हे तर एअरकंडिशनिंगचीही व्यवस्था केलेली दिसून येते. हवा खेळती रहावी म्हणून मोठमोठ्या पाइप्समधून हवा खेळवली होती त्यातील काही पाइपलाइन्सचे अवशेष त्या इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत.बंकर्सच्या तोंडाशी मशिनगन्स बसवून संरक्षक तटबंदी तयार केलेली आढळते.
तेथल्याच एका दालनात ( पूर्वीच्या बंकरमध्ये ) हिटलरच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा माहितीपट जर्मन आणि इंग्रजीत तेथे दाखवतात. तो पाहून संमिश्र भावना मनात घेऊन आम्ही साल्झबुर्गकडे निघालो.
साल्झबुर्ग आणि सांऊड ऑफ म्युझिक! हे दोन शब्द अगदी हातात हात घालून जातात ना? पण आज आम्हाला साउंड ऑफ म्युझिक मधले साल्झबुर्ग पाहण्याइतका वेळ नव्हता. त्यामुळे या सुंदर शहरात एक फेरफटका मारावा असं ठरवून मुख्य चौकात उतरलो.
दर शनिवारी येथे असतो आजूबाजूच्या डोंगरातल्या खेड्यातून आलेल्या शेतकर्यांचा आठवडी बाजार! आम्ही तेथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ होत आली होती ,सारे शेतकरीही आपापली पालं आवरायच्या तयारीत होते.चौकात जिकडेतिकडे मोझार्टचे पुतळे आणि कटआउट्स आहेत. त्याचे हे जन्मगाव.
त्याचे जन्मस्थान पाहून मग गेलो ते तेथल्या प्राचीन चर्चमध्ये. चर्चसभोवतालचा परिसरही तितकाच सुंदर आहे. चर्चच्या प्रांगणात एक मोठ्ठा बुध्दिबळपट आहे.(असाच मोठ्ठा पट आमच्या फ्राफुच्या बोलांगरोपलास्ट मध्येही आहे.)तेथे दोन म्हातार्यांचा डाव अगदी रंगात आला होता आणि आजूबाजूला बघ्यांचीही भरपूर गर्दी होऊ लागली होती पण ते दोघे मात्र खेळात अगदी रंगून गेले होते,त्यांचे इतरांकडे लक्षच नव्हते.
तो खेळ थोडावेळ पाहून आम्ही आत गेलो. चर्चमधील कोरीव काम,काचकाम पाहण्यात वेळ तसा बराच गेला. साल्झबुर्गच्या फॅशनस्ट्रीटवर विंडो शॉपिंग करत असताना अचानक लक्षात आलं केसु कुठे दिसत नाहीत.. मग पुढे गेला असेल, तू जाऊन पहा रे.. असे करत करत तेथला सारा परिसर शोधले. एव्हाना पावसाचा जोर वाढला होता. ते थंडगार,बोचरे पाण्याचे थेंब चुकवत केसुंना शोधणे चालूच होते. शेवटी म्याकदादाकडे आसरा घेतला आणि केसुना फोन लावला तर हे महाशय आम्हीच सगळे रस्ता चुकल्याबद्दल आम्हालाच बोल लावत गाडी जिथे पार्क केली होती तेथे उभे होते.साल्झाक नदीच्या किनार्यावरुन दिसणारे दृश्य पाहण्यात जास्त वेळ न घालवता मग आम्ही गाडीकडे निघालो. गाडीपाशी पोहोचल्यावर 'प्रेमळ ' शब्दांची देवाणघेवाण झाली आणि योहानाच्या घरी जायला निघालो.
आज रात्रीचा बेत होता चटकदार भेळ! डॉन्या (आदेशाप्रमाणे) भारतातून चुरमुरे घेऊन आला होता. गोड,तिखट चटण्या, फरसाण ,कांदे ,टोमॅटो इ.कच्ची तयारी सगळी बरोबर घेतली होतीच.तरी कोथिंबिर आयत्यावेळी पिशवीत टाकायची म्हणून फ्रिजमध्ये ठेवली होती ती आठवणीने विसरले होते त्यामुळे प्रेमळ शब्दांची बरसात फारच वाढली. घरी पोहोचल्यावर किचनचा ताबा केसुंनी घेतला आणि फर्मास भेळ बनवली. भेळ व मोझार्ट बीअरचा आस्वाद घेत उद्याच्या सॉल्टमाईन्सचे बेत आखू लागलो.










वाचन
11464
प्रतिक्रिया
0