बेडूक, नार्सिसस, भस्मासुर, अतिशयोक्ती आणि चड्डीत राहणे
कॉलेजात असताना आमच्या मित्रमंडळींमध्ये "चड्डीत राहणे" हा एक वाक्प्रचार अत्यंत प्रसिद्ध होता. "अंथरूण पाहून पाय पसरावे" अशा साधारण अर्थाचा हा वाक्प्रयोग असला तरी त्याला अनेक छटा होत्या. कोणी जादा 'माज' करत असला की त्याला सरळ करण्यासाठी "ए भो, चड्डीत राहा ना!" असे आम्ही म्हणत असू. आता हा वाक्प्रयोग येथे आठवण्याचे काय कारण? सांगतो. त्यापूर्वी ह्या अडीच गोष्टी वाचा.
१. मेंढककाण्ड अर्थात बेडकाची प्रेमकहाणी: प्लवंगेंद्र बेडकाचे मंदोदरी बेटकुळीवर फारच प्रेम. अगदी शाहरूख खानचं काजोलवर असतं ना तस्सं. पण अर्थातच मंदोदरीचे तातश्री मेंढकोबांना हा विवाह पसंत नव्हता. अमरीश पुरीच म्हणा ना! त्यांनी तिचा हात वृषभकुमार नावाच्या बैलाच्या हाती देण्याचे ठरवले होते. मंदोदरी दिसायला फारच सुंदर. वार्यालाही तिच्या रेशमी काळेभोर कुंतलाशी खेळावे वाटे. तिच्या भ्रुकोदंडांना पाहून अर्जुनाचे गांडीवदेखील शरमेने खाली पाहू लागले असते. तिचे गाल लालबुंद सफरचंदांची आठवण करून देत असत तर डाळिंबाचे दाणे शाखेमध्ये उभ्या राहणार्या स्वयंसेवकाप्रमाणे रांगेत एकामागे एक "दक्ष" उभे होते. तिचे ओठ... हाय... तिच्या ओठांकडे पाहून प्लवंगेंद्राला मदिरेची आठवण होई तर तिची नाजूक मान पाहून त्याला सुरईची म्हणजे पुन्हा मदिरेचीच आठवण होई. बेवडा कुठला! आता वर्णनासाठी मी जास्त खाली जात नाही. काय ते तुम्ही समजून घ्या!
हा तर आपले अमरीश पुरी ऊर्फ मेंढकोबांनी मंदोदरीचे म्हणणे ऐकून घेण्याचे ठरवले आणि प्लवंगेंद्राला सांगितले की त्याने जर वृषभकुमाराइतके मोठे होऊन दाखवले तर मंदोदरी त्याचीच. प्रेमात शहाणी माणसे देखील 'चड्डीत राहत' नाहीत तर बेडकाचे काय. एखाद्या पंपाने सायकलच्या ट्यूबमध्ये हवा भरावी तद्वत प्लवंगेंद्र फुस्स फुस्स करत स्वत:च्या शरीरामध्ये हवा भरत गेला. प्रेमात दिवाणी झालेली मंदोदरीचे मुखकमलही प्लवंगेंद्राच्या शरीरासोबत फुलत होते. पण शेवटी व्हायचे तेच झाले. नियतीने कपाळावर जे लिहिले आहे त्याला कोणी टाळू शकतो का? फुल्ल हवा भरलेल्या टायरला पंक्चरच्या दुकानदारांनी रस्त्यावर टाकलेला ४३ खिळ्यांपैकी नेमका खिळा लागावा आणि टचकन टायर फुटावा त्याप्रमाणे प्लवंगेंद्र फुटला. वृषभकुमारासारख्या धटिंगणाला नाजूक मंदोदरी मिळाली आणि प्लवंगेंद्राच्या फोटोला हार मिळाले.कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत!
२. नार्सिससची कथा: नार्सिससची कथा ही अभिजात ग्रीक कथा असल्याने सामान्यजनांना माहिती नसावी. नाही तर त्याला अभिजात कसे बरे म्हटले असते? पुराणकाळातील हृतिक रोशन शोभावा असला राजबिंडा हा तरूण. वर्णन बरेचसे मंदोदरीसारखेच. म्हणजे रेशमी कुंतल, चाफेकळी नाक वगैरे. फक्त त्याची शरीरयष्टी बलदंड असावी. त्याला सिक्स प्याक ऍब्जही असावेत. शाहरूखखानपूर्वी अशी शरीरयष्टी लाभलेला केवळ नार्सिससच. स्वत:चे रूप कधीही न पाहिलेल्या या तरूणाचे (म्हणजे नार्सिसचे. शाहरूखचे नव्हे!) सौंदर्य अगदी मंत्रमुग्ध करणारे होते.
नेहमी सूर्योदयापूर्वी उठणारा नार्सिसस रात्री जास्त 'झाल्यामुळे' सकाळी उशीरा तळ्यावर गेला. (कशाला ते विचारू नका! घाणेरडे कुठले!) आणि स्वत:चे रूप त्याने प्रतिबिंबरूपात तळ्यामध्ये पाहिले आणि काय हो आश्चर्य. स्वत:च्याच रुपाच्या प्रेमात पडून तो तळ्यात पडला. कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत!
३. भस्मासुराची कथा: ही भारतीय कथा असल्याने अभिजात नसावी. त्यामुळे कथा सर्वांनाच माहिती असावी. मोहिनीवर लाईन मारण्यात दंग झालेल्या भस्मासुराला कसलेही भान राहिले नाही आणि स्वत:च्या डोक्यावर हात ठेवून त्याने स्वत:चे भस्म करून घेतले. कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत.
उपसंहार:
शाळेत असताना आम्हाला व्याकरणामध्ये अतिशयोक्ती हा अलंकार होता. इयत्ता सातवीपर्यंत आमच्या वर्गात फक्त वर्गबंधू असत. सहशिक्षणाचे पुरोगामी वारे व परिणामी वर्गभगिनी वर्गात नसल्याने आम्ही मास्तरांकडेच लक्ष देऊन प्रामाणिकपणे शिक्षण घेत होतो. (आठवीपासून वर्गभगिनी वर्गात आल्या नि शिक्षण बोंबलले! ते असो.) तर अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण देताना आमचे मास्तर खूप मस्त उदाहरण देत असत.
"दिडकीचे तेल आणले, सासुबाईंचे न्हाणे झाले, मामंजींची शेंडी झाली, भावोजींची दाढी झाली, उरले तेल झाकून ठेवले,ते येऊन मांजराने सांडले, वेशीपर्यंत ओहोळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला"
सुंदरच. अगदी +१.
भविष्यकाळात मराठी भाषेचे अलंकार शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आली तर दिडकी, ओहोळ वगैरे शब्दांचे अर्थ सांगताना घाम फुटायचा ह्या विचाराने झोप येत नव्हती. तरी बरे मुले आजकाल कॅमलिन कंपनीचे साहित्य वापरतात त्यामुळे उंट म्हणजे काय हे सांगायला अडचण येणार नाही. पण आमची सर्व काळजी आता मिटली आहे. अतिशयोक्ती अलंकाराचे अतिशय सुरेख उदाहरण आमच्यासमोर आहे.
होय , हा मराठीतला पहिला संपूर्ण ऑनलाइन दिवाळी अंक आहे. आजवर ऑनलाइन दिवाळी अंक अनेक झाले. पण प्रत्येकानं स्वतःच आपली कुंपणं आखून घेतली होती. आता ही कुंपणं उचकून टाकण्याची वेळ आहे. मराठी ऑनलाइन म्हणजे फुटकळपणा , या समजाला मुळापासून गाडून टाकत , दर्जाच्या मैदानात छापील दिवाळी अंकांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचा हा प्रयत्न आहे.अधिक माहितीसाठी हे पहा. स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपावासारखी दर्जेदार संकेतस्थळे चालवणारे संकेतस्थळचालक. त्यांनी राबवलेले दिवाळीअंकांसारखे सुंदर उपक्रम. अतिशय गुणी माणसांशी ऑनलाईन ओळखी, गप्पाटप्पा, काव्यशास्त्रविनोद करण्याची दिलेली संधी. हे सगळे फुटकळ. आणि आपले 'उत्पादन' अधिकाधिक 'ग्राहकांपर्यंत' पोचवण्यासाठी अशुद्धलेखनाने बुजबुजलेले, हिंदाळलेले मराठी. अर्धवस्त्रांकित उठवळ नट्यांची चित्रे पहिल्या पानावर छापणारे हे वृत्तपत्र तेवढे दर्जेदार ही अतिशयोक्तीच नाही का? असो. आम्हाला जास्त काही म्हणायचे नाही. त्या वृत्तपत्राला एकच सांगायचे आहे. तुम्ही ओळखलेच असेल काय ते. बरोब्बर. 'चड्डीत राहा ना भो' आपला, महाराष्ट्रकुमार आजानुकर्ण राऊत
वाचन
18490
प्रतिक्रिया
0