विकासाची भारतीय संकल्पना..२
विकासाची भारतीय संकल्पना
...पण इच्छा पूर्ण कमी करता येणारच नाहीत ! शरीर आहे म्हणजे शरीर धर्म आहे आणि म्हनून त्याच्या किमान गरजा आहेत , वासना - कामना आहेत ! त्याचे " दमन " करता उपयोगी नाही तर त्याला निर्धारित आणि सुनियंत्रित वाट करुन द्यावी लागेल. त्याचे योग्य दमन करता आले नाही तर त्या " केला जरी पोत बळेचि खाली , ज्वाला तरी ती वरती उफाळे या न्यायाने वासना - कामना अधिकच चेतविल्या जातील !
आणि म्ह्णूनच त्यांचे निर्धारित आणि सुनियंत्रित व्यवस्थापन म्हणजे विवास संस्था आणि चार आश्रम !
यापूर्वी आपण पाहिले की पाश्चिमात्य संकल्पनेमध्ये सुखाचा अथवा वैभवाचा विचार करताना उपभोगाची अधिकाधिक साधने आणि ती मिळावावीत म्हणून त्यासाठी लागणारा अधिकाधिक पैसा म्हणजे सुख अथवा वैभव !
मात्र भारतीय पूर्वसूरीनी जीवनाचा सर्वांगीण विचार केला होता आणि म्हणूनच त्यांनी सर्वंकष समाधान देणारी अशी परिपूर्ण जीवनपद्धती विकसित केली.
योगी अरविन्दानी यांवर मोठी मार्मिक टिप्पणी केली आहे, ते म्हणतात ..
१. प्रत्येकाला त्याच्या मगदूराप्रमाणे काम असावे , त्याचा त्याला सुयोग्य मोबदला मिळावा.
२. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा अशी सामाजिक परिस्थिती असावी. ( सामाजिक सुरक्षा)
३. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा इतका पुरसा वेळ त्याच्याकडे असावा.
४. अशी स्थिती असेल तर ताण विरहित सुखी जीवन तो जगू शकेल.
यापैकी प्रत्येक मुद्द्यावर आजची भारतीयांची स्थिती {जे पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करतात} पाहता काय दिसते ?
१. आपण सारे जण आपले जन्मजात कौशल्य विसरून गेलो आहोत. "कारागिर" लयाला जाऊन "कामगार" निर्माण झाले आहेत. आमचा मगदूर विसरुन गेला असून आमची सृजनशक्ती नष्ट झाली आहे. मोबदला सुयोग्य असला तरी कमीच आहे असेच आम्हांला वाटते, कमी कामाचा अधिक मोबदला ही आमची वृत्ती होत चालली आहे.
२. मिळालेल्या सुखाचा उपभोग आम्ही घ्यावा अशी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आज नाही.कष्टाने मिळवलेले सोने -नाणे आपण अंगावर घालून सुखाने फिरु शकत नाही.
३.वेळ ? तेवढे सोडून बोला. पैसे मिळवण्याच्या नादात आमच्याकडे वेळच नाही.आम्ही विकांत सुद्धा टाकणं टाकल्यासारखा टाकतो..(मला त्या परिस शोधणार्या तरुणाची गोष्ट आठवते. परिस शोधायचा म्हणून तो समुद्र किनार्यावरचा प्रत्येक दगड गळ्यातील लोखंडाच्या साखळीला लावून पहात असे व सोने झाले नाही म्हणून फेकून देत असे. या कंटाळवण्या प्रक्रीयेत सारा दिवस संपून जातो आणि आता थकून परतावे म्हणून तो साखळी काढून हातात घेतो , तो ती केव्हाच सोन्याची झालेली असते !] असे कितीतरी परिस आपण न कळत फेकून देत असतो.
४. आणि या सार्या धावाधावीत आम्ही शारिरिक आणि मानसिक ताणाचे शिकार झालो आहोत.
कचकड्याच्या अशा खोट्या सुखाचाच आपण पाठलाग करत आहोत हे आपल्या सहज ल़क्षात येते..
सुखाची भारतीय संकल्पना ही नव्हे ! एकात्म सुख हीच सुखाची भारतीय संकल्पना होय !
एकात्म सुख
"मी" म्हणजे कोण याचा शोध घेत गेल्यावर प्राचीन भारतीय तत्ववेत्त्याना असे लक्षात आले की, हे फक्त "शरीर अथवा इंद्रिये " म्हणजे मी नव्हे , त्याचबरोबर " मन " आहे, त्या मनाच्या पलिकडे " बुद्धी" आहे आणि बुद्धीच्याही पलिकडे "आत्मा" आहे ! या सार्याला मिळून "मी" म्हणतात.
माझा आनंद, माझे सुख म्हणजे माझ्या शरिराचा+ मनाचा+ बुद्धीचा+आत्म्याचा आनंद ! आणि हे सारे कप्पेबंद नसून एकमेकांत विलक्षण मिसळलेले आहेत, शरिराचा अथवा मनाचा असा स्वतंत्र आनंद अथवा सुख उपभोगता येत नाही !
सुग्रास भोजनाचा आनंद घेत असताना, आप्त अत्यवस्थ असल्याची बातमी समजली तर सुग्रास भोजनाचे सुख लाभेल काय ?
लता मंगेशकरांचा आवाज ऐकल्यावर, एखादी सुंदर कविता वाचल्यावर होणारा आनंद , वाट्णारे सुख आपले डोके दुखत असताना अथवा पोटात तीव्र दुखत असेल तर घेता येईल का ?
बुद्धीचा आनंद म्हणजे सृजनाचा आनंद ! मन अस्वस्थ असेल तर आपण लतादिदीसारखे गाण्याचा प्रयत्न करु काय ? ल्रेख लिहिण्याचा प्रयत्न करु काय ?
आत्म्याचा आनंद म्हणजे आनंद वाट्णे.. आपल्या एखाद्या कृतीने एखाद्याच्या जीवनात आनंद निर्माण करणे !
आत्मनो मोक्षार्थ जगदहितायच !
सुखाची चढती भाजणी
आपल्या असे लक्षात येईल की , शरिराच्या सुखापेक्षा मनाचे सुख आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिचे आणि आत्म्याचे सुख हे अधिक सुख देणारे ( सुखाची मात्रा ) आहे.
आपल्या असेही लक्षात येईल की,शरिराच्या सुखापेक्षा मनाचे सुख आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिचे आणि आत्म्याचे सुख हे अधिक काळ टिकणारे ( सुखाचा कालावधी) आहे.
पुढे जाऊन असेही म्हणता येईल की, शरिराच्या सुखापेक्षा मनाचे सुख आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिचे आणि आत्म्याचे सुख हे कमी कष्टात अधिक मात्रेत सुख ( सुखाचे फल ) देणारे आहे.
मात्र, शरिराच्या सुखापेक्षा मनाचे सुख आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिचे आणि आत्म्याचे सुख हे कमी साधनसामुग्री लागणारे( सुखासाठी लागणारी साधन सामुग्री ) आहे.
तसेच, सुखाची गरज मात्र उतरत्या भाजणी प्रमाणे आहे.भूक लागल्यावर आपोआप जाणीव होते, वयात आल्यावर योग्य ती प्रेरणा होऊन मनुष्य सुखाच्या शोधार्थ निघतो आणि तसा प्रयत्न करतो. मनाच्या आणि त्याही पेक्षा बुद्धीच्या आणि आत्म्याच्या सुखासाठी तशी गरज सामान्यपणे होत नाही , त्यासाठी तश्या प्रकारे सुसंस्कारित झालेला मनुष्य असावा लागतो !तरच ती प्रेरणा निर्माण होईल.
थोड्क्यात अशा प्रकारचे "एकात्म सुख" ही सुखाची भारतीय संकल्पना आहे !
(क्रमशः)
वाचन
9312
प्रतिक्रिया
0