ताईचा सल्ला
लेखनप्रकार
प्रश्न :- ताई, मी मिसळपाव वरील एक स्त्री सभासद आहे, माझे खुप मित्र आणी खुप फॅन्स पण आहेत. मी सगळ्या धाग्यांवर भरभरुन प्रतिसाद देते पण सभासद मला 'उगाच पुढे पुढे करणारी, अतिशहाणी आणी बालिश' म्हणतात. आजकाल तर काही सभासद मला तुझे खाते 'फेक' आहे म्हणतात. काहि स्त्री सभासद तर मला मुद्दामुन "काय रे कसा आहेस?" असे विचारतात. पुरुष सभासद "मला फोन कर म्हणजे तुझ्या आवाजावरुन तु मुलगी आहेस का नाही ते कळेल" म्हणतात. सगळेच माझ्या ज्ञानावर व रुपावर जळतात. ताई मी काय करु ? मला लिहायला, वाचायला सुचत नाही, आजकाल रात्री झोप देखील लागत नाही.
तुझी दुर्दैवी सुंदर लहान बहिण.
उत्तर :- एका स्त्रीचे दु:ख दुसरी स्त्रीच समजुन घेउ शकते असे म्हणतात पण मिसळपाव वरील स्त्री सभासदांनी तुझ्यावर केलेला अन्याय बघुन फारच वाईट वाटले. पुरुष तर काय मेले सगळे एकजात सारखेच.
तु वाईट वाटून घेउ नकोस. फोन नंबर देणार्या पुरुष सभासदांचे फोन नंबर गोळा करुन ते जमतील तेव्हड्या पॉलीसी, अॅंटीव्हायरस विकणार्यांना दे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड वाल्यांना हे नंबर फुकटात कळव. ऑर्कुटावर तुझा फोन नंबर मागणार्यांना हेच नंबर देत जा. चांगली अद्दल घडु दे.
मिसळपाव वरील स्त्री सभासदांकडे दुर्लक्ष कर, त्यांना जमेल तेव्हडे टोमणे मारत जा. शक्य असल्यास सतत सिरियल्स, सा रे ग म प, पाककृती, शाहिद कपुर, रणवीर ह्या विषयी जमेल तेव्हडी बालीश बडबड करत रहा. पुरुष सभासदांशी सतत कारणे काढुन भांडत रहा, त्यांच्या लेखावर उगीच आपल्याला फार अक्कल असल्यासारख्या टिपण्या करत रहा. लवकरच तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणी तु एक भांडकुदळ का होईना पण मुलगी आहेस अशी सगळ्यांची खात्री होउन जाईल.
शक्यतो स्वत:चा पाठमोरा, खुप लांबुन काढलेला, अंधारलेल्या खोलीत थर्डक्लास वेबकॅमने काढलेला असा कोणताही एखादा फोटो काही दिवस खरडवहीत लाव.
खरडवही मध्ये गुलाबी रंगाचे हृदय, गुलाबाची फुले, २ मराठी प्रेम कविता ह्यांचे फोटो हवेतच.
*************************************************
प्रश्न :- ताई, हे राम ! मी मिसळपाव वरील एक सत्यवादी आणी गांधीवादी सभासद आहे. इथे सभासद सतत गांधींचा अपमान करत असतात, त्यांची हेटाळणी करत असतात. मला सतत दुखावतात, 'तिरळ्या डोळ्याचा गांधी' म्हणतात. ह्या नालायक, संस्कारहिन लोकांना शासन करावेसे वाटत आहे, हात नुसते शिवशीवत आहेत. मनात भलते सलते विचार येत असतात, ह्या मनाला कसे शांत करु ?
उत्तर :- बंधो , मनात भलते सलते विचार आणु नकोस. "An eye for eye only ends up making the whole world blind" असे स्वत: बापु सांगुन गेलेत.
एखाद्या गुंडानी रस्त्यात आपल्या बहिणीचा हात धरला, तर धावत जाउन आपण तिचा दुसरा हातही त्याच्या हातात द्यावा. येव्हडे करुन न थांबता त्या गुंडाला सन्मानाने आपल्या आईचा सुद्धा हात धरण्यासाठी घरी बोलवावे. ह्यामुळे त्या गुंडाचे मन परिवर्तन होईल, त्याला स्वत:च्या कृत्यांचीच लाज वाटु लागेल, तो पुर्णपणे बदलुन जाईल, स्वत:च्या बायकोचाही हात धरताना दहा वेळ विचार करेल. अहिंसेनी आणी विनम्रतेने काय साध्य होत नाही ?
असाच व्यवहार मिसळपाव वरील त्या 'वाट चुकलेल्या' सभासदांशी ठेव. लवकरच ते बदलतील हा विश्वास बाळग.
*****************************************************
प्रश्न :- ताई हाय हॅलो ग. मला मिसळपाव वर रोज रोज एक नविन फेक आयडी घेउन यायचा छंद आहे. आधी मी ह्या आयडींनी माझ्या विरोधकांना चांगलाच इंगा दाखवला होता, भल्या भल्यांचा वाटेल त्या शब्दात अपमान केला होता. हिंदु, मुस्लीम, गांधीवादी ह्यांच्यात मस्त भांडणे लावुन दिली होती. पण आता अचानक काय घडले आहे समजत नाही, मी कोणत्याही चित्र-विचित्र आयडीनी आलो तरी सभासद मला ओळखतात, लगेच खर्या नावानी हाक मारतात. हे असे कसे झाले?
उत्तर :- माझ्या नालायक भाऊराया, एक छानशी गोष्ट ऐक आणी तुच मतितार्थ काढ.
अबक नावाचा एक स्वत:ला फार अक्कलवान समजणारा माणुस एकदा एका इलेक्ट्रॉनीक्सच्या दुकानात गेला आणी मालकाला म्हणाला "काय हो हा टि व्ही ची किंमत काय ?"
मालक म्हणाला "आम्ही मुर्खांना टि व्ही विकत नाही."
आता अबक संतापला. दुसर्या दिवशी एका मद्राशाचा वेष घालुन त्याच दुकानात गेला. म्हणाला "अय्ययो ये टि व्ही कितनेको दिया जी?"
दुकानदार आपला मख्ख. म्हणाला "अहो आम्ही खरच मुर्खाना टि व्ही विकत नाही हो."
अबक रागारागनी बाहेर पडला. दुसर्या दिवशी एका सरदारजीचा वेष करुन त्या दुकानात गेला आणी म्हणाला "ओय पापे टि व्ही दि किमत बताओ."
दुकानदार म्हणाला "अहो पण आम्ही नाही विकत मुर्खांना टि व्ही सांगतोय तर. कळत नाही का ?"
आता मात्र हद्द झाली अबक पुढच्या दिवशी तोंडाला आणी अंगाला काळे फासुन एका निग्रोचा वेष करुन दुकानात गेला, म्हणाला "हय मान व्हातस द प्राइस ओफ दॅत ति व्हि ??"
दुकानदार आता चिडुन म्हणाला "तुम्हाला एकदा सांगुन कळत नाही का हो ? मुर्खांना आम्ही टि व्ही विकत नाही !!!"
अबक आता मात्र हतबद्ध झाला, अक्षरश: दुकानदाराच्या पाया पडला आणी म्हणाला "मी मान्य करतो मी मुर्ख आहे, पण मला एकच उत्तर द्या की मी रोज येव्हडे वेगवेगळे वेष पालटुन आलो तरी तुम्ही दरवेळी मला अचुक असे कसे काय ओळखलेत ?"
दुकानदार एकदम छदमी हसला आणी म्हणाला "त्याचे काय आहे ना की रोज येउन तुम्ही ज्या टि व्ही ची चौकशी करताना, तो टि व्ही नाहिये ओव्हन आहे."
*******************************************************
प्रश्न :- ताई नमस्ते. मी एक गृहीणी आहे, माझे पतिदेव सतत मिसळपाववर व्यस्त असतात. आधी ते आमच्या बाल्कनीत व्यस्त असायचे आता इंटरनेट वरच्या मिसळपाववर व्यग्र असतात. हल्ली माझ्याकडे लक्ष सुद्धा देत नाहीत.
काल मी त्यांना म्हणाले "तुमचे माझ्यावरचे प्रेम आजकाल कुठे गेले आहे ?"
तर म्हणाले "अग चुकुन संपादीत झाले असेल." ताई ह्या वाक्याचा अर्थ काय ? मला बाई काही कळाले नाही.
आजकाल ते खरडवही का काय असतेना त्यात प्रेमकवीता वगैरे डकवायला लागले आहेत म्हणे, सतत मुलींशी खरडीतुन संवाद साधत असतात असेही कळाले आहे. कोणतीही हिरॉईन पाहिली की "हिच्यावर आमचा फार जीव" असले काय काय बडबडत असतात. ताई मी काय करु ? खुप भिती आणी काळजी सुद्धा वाटत आहे.
उत्तर :- सखे, अशी हातपाय गाळु नकोस. गोष्ट चिंतेची आहे खरी पण माझ्या सल्ल्यानी सगळे काही ठिक होईल. तु खालील प्रमाणे उपाय कर :-
१) सर्वात आधी आपण देखील नवर्या मागोमाग मिसळपाववर खाते उघडुन मिसळपाववर प्रवेश करावा.
२) मिसळपाव वरील सर्व मुली, स्त्रीया ह्यांना मला 'वहिनी' म्हणा असा आग्रह करावा.
३) नवर्याच्या खरडवही वर सतत लक्ष ठेवुन रहावे.
४) अधेमधे 'खास' वेळी हळुच नवर्याकडुन त्याचा पासवर्ड घेउन त्याच्या अनुपस्थीतीत त्याच्या खात्या वरुन लॉगईन होउन परिस्थीतीचा अंदाज घेत रहावे.
५) काही हुषार नवरे आपण जॉइन केल्या केल्या आपल्याला खरड वगैरे लिहुन खुष करण्याचा प्रयत्न करतात. अशा भुलथापांना बळी पडु नये.
६) शक्यतो मिसळपाव वरील सर्वच स्त्रीयांशी ओळख करुन घ्यावी.
७) नवर्याला शक्यतो ज्यात तो सगळ्यात जास्त बावळट दिसतो असा फोटो खरडवहीत लावायला लावावा. ("आमचे हे तर सगळ्याच फोटोत बावळट दिसतात" साधारण सर्वच गृहिणींचे हे मत असतेच)
८) सहसा नवरा मिसळपावावर असताना आपण लॉगईन होउ नये.
९) आपल्या खात्या मधुन नवरा आणी नवर्याच्या खात्या मधुन आपण बर्याचदा लॉग इन होतो अशी अफवा पसरवुन द्यावी.
१०) शक्यतो नवर्याच्या खरडवही मध्ये आपल्या लग्नाचे अथवा एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी केलेल्या ट्रिपचे जोडीने काढलेले फोटो टाकावेत.
११) स्वत:च्या खरडवही मध्ये मुलाच्या लहानपणीचे वडलांबरोबरचे फोटो आवर्जुन टाकावेत.
तुझीच लेडी तेनालीरमन
तायडी
***********************************************************
प्रश्न : ताई नमस्ते. मी मिसळपाव वरील एक 'अधीकारी' सभासद आहे. सतत वाद घालणार्या, लोकांचे वाटेल तसे अपमान करणार्या सभासदांना सुधारण्याची संधी देतच राहिले पाहिजे असे माझे मत आहे. त्यांची हकालपट्टी करणे पुर्णपणे चुक आहे. "हृदयपरिवर्तनावर' माझा विश्वास आहे. पण लोक मला मुर्ख समजतात, गुन्हेगारांचा साथीदार म्हणतात.
उत्तर :- माझ्या भोळ्या भावा, तुझी अडचण वाचुन एक गोष्ट आठवली बघ.
एकदा एक शिकारी पहिल्यांदाच शिकारीसाठी जंगलात जातो. अचानक समोर एक अक्राळ विक्राळ वाघ येउन उभा राहतो. त्या वाघाला बघुन शिकारी साहेबांचे सगळे धैर्य पळुन जाते,बंदुक लांब जाउन पडते. आता हा आपल्याला खाणार हे निश्चीत असल्याचे त्यांना कळुन चुकते.
ताबडतोब डोळे बंद करुन शिकारी देवाचा धावा करायला लागला, वाघाचे 'हृदयपरिवर्तन' व्हावे त्यानी आपल्याला सोडावे असे देवाकडे साकडे घालु लागला. वाघाकडून काहिच हालचाल होईना हे बघुन थोड्यावेळानी त्याने डोळे उघडुन पाहिले तर वाघ पण समोर हात जोडुन डोळे मिटुन उभा....
शिकार्याला परमानंद झाला, वाघाचे हृदयपरिवर्तन बघुन तो वाघाला म्हणाला "मी तर जिव वाचावा म्हणुन प्रार्थना करतोय, तु डोळे मिटुन हात जोडुन काय करत आहेस ?"
"मी वदनी कवल घेता म्हणतोय..." वाघ शांतपणे उदगारला.
***************************************************************
(शक्य झाल्यास क्रमशः)
वाचन
29597
प्रतिक्रिया
0