मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाध्यक्षांची 'मिसळपावसाठी' एक धावती मुलाखत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · · जनातलं, मनातलं

डॊ.गंगाधर पानतावणे          डॊ.गंगाधर पानतावणे आणि प्राचार्य ठाले पाटील डॉ.गंगाधर पानतावणे    सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अमेरिकेत होणार्‍या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि. २३/०८/०८ ला भेट घेतली. अभिनंदनाच्या गराड्यात आणि नेहमीच्या व्यस्त कार्यक्रमात मिसळपाव मराठी संस्थळासाठी त्यांची एक धावती मुलाखत. परिचय : डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे, (जन्म: २८ जून १९३७ ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादला मराठी विभाग प्रमुख म्हणुन ९७ ला सेवानिवृत्त झाले. आंबेडकरी विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी १९६८ साली 'अस्मितादर्श' त्रैमासिक सुरु केले जे आजही चालु आहे. वैचारिक, सामाजिक अधिष्ठान, असलेले ' अस्मितादर्श' महाराष्ट्र आणि देशभरातील लेखक, कवी, समीक्षक,संशोधक, यांचे विचारमंच ठरले. मूल्यवेध, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, दलितांचे प्रबोधन, मूकनायक, वादळाचे वंशज, प्रबोधनाच्या दिशा, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हलगी, चैत्य, लेणी, इत्यादी ग्रंथसंपदा डॉ. पानतावणे यांच्या नावावर आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पहिल्या अखिल विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणुन आपली एकमताने निवड झाली. त्याबद्दल प्रथम अभिनंदन !!! सर, काय भावना आहेत या प्रसंगी. 'खूपच आनंद झाला. गेल्या अनेक वर्षापासून जी साहित्यसेवा चालू आहे, त्याचा हा गौरव आहे. मराठी साहित्य, संशोधन, दलित साहित्य, दलित चळवळ यांचा गौरव आहे. तसेच एकमताने झालेल्या निवडीचा मनस्वी आनंद होत आहे. त्याचबरोबर साहित्य आणि साहित्य व्यवहाराबरोबर, साहित्यातील दिग्गज मंडळी, दलित साहित्य चळवळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जोपासले आणि ते सर्वांसमोर मांडले आ़ज त्यांची आठवण होत आहे. अस्मितादर्श आणि नवोदितांना दिलेली संधी..... जेष्ठ साहित्यिक, विचारवंत म्हणुन आपली निवड आहे, काय वाटते. ? 'अस्मितादर्शचा' प्रवास गेली ३४ वर्ष अव्याहतपणे चालु आहे, त्यातुन अनेक नवे साहित्यिक घडु शकले. या पाठीमागे प्रेरणा आणि उर्जा आहे ती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची. त्यांच्या विचारांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझी निवड ही सर्व लेखन प्रकारातील मराठी साहित्यिकांचा सन्मान समजतो. मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे. जागतिकीकरण, ...उदारीकरण...खाजगीकरण, माहितीतंत्रज्ञान याचा परिणाम मराठी साहित्यावर होत आहे का ? जागतिक प्रभावरेट्यांमुळे जे जे बदल होत जातात त्याचा परिणाम साहित्यावर होतो. मात्र साहित्यातील चिरंतनमुल्य बदलत नसतात. विविध क्षेत्रातील ताण्-तणाव नव्या स्वरुपात येतील. संगणक आलं, संगणकाचा परिणाम जीवनावर होतो. आणि जीवनाचं दर्शन तर साहित्य घडवतं. मग त्याचे जे काय परिणाम असतील ते तर समोर येणारच आहेत. कुसुमाग्रजांनी जवळजवळ ४०-४५ च्या काळामधे एक कादंबरी लिहिली होती. त्याच्यामधे माणसं ही पृथ्वीला प्रदक्षीणा घालताहेत अशी कल्पना त्यांनी केली होती. हे प्रत्यक्षात आलं वीस-पंचवीस वर्षांनी. तेव्हा असं होतं..... लेखक जो काही लिहित असतो, तो जी काही कल्पना करतो. ते कधी-कधी वास्तवात सुद्धा येतं. तेव्हा त्याचा संबंध हा अपरिहार्यपणे येणारच, तंत्रज्ञानक्षेत्रातील मंडळी असो, त्यांचे अनुभव असो, जागतिकीकरण असो... ज्याचे-ज्याचे परिणाम मानवी जीवनावर होतात, ते ते सर्व साहित्यामधून आलं पाहिजे. साहित्य हे मानवी जीवनाचं दर्शन घडवतं, तेव्हा स्वाभाविकपणे त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटेल. विश्वसाहित्य संमेलनात आपण कोणती भुमिका मांडणार आहात ? गेली चाळीस-पन्नास वर्षात जी परिवर्तने झालीत. विवक्षीत वर्तुळातून साहित्य बाहेर आले. मूक अनुभव व्यक्त होऊ लागले. त्याबरोबर कसदार साहित्याची चर्चा आणि देवाण-घेवाण या निमित्ताने करता येईल. सर, मिसळपाव आणि तत्सम संकेतस्थळांवर लेखन करणारी जी लेखक मंडळी आहेत, उच्च दर्जाचे लेखन करुनही त्यांच्या लेखनाची नोंद साहित्यिक, समीक्षक दखल घेतांना दिसत नाही, असं मला वाटतं ! 'विज्ञान कथा जेव्हा आल्या, तेव्हा प्रारंभी विज्ञान कथांकडे दुर्लक्षच झाले. मग ते लक्ष्मण लोंढे असतील, जयंत नारळीकर असतील, या लोकांनी विज्ञान कथा लिहिल्या. पण कालांतराने आपल्या लक्षात येते की त्यांच्या कथांचा विज्ञान कथा म्हणुन समावेश साहित्यामधे झाला आणि त्याची दखल घेतली गेली. इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल. सर, भावुकतेने अंत:करणात जपून ठेवलेले काही क्षण ? १९४६ साली मी पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पाहिले आणि त्यांचे मराठीतले ओजस्वी भाषण ऐकले त्यानंतर अनेकदा त्यांची भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. १९५४ साली माउंट हॉटेलमधे बाबासाहेबांच्या जयजयकाराने विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून टाकला. त्यावेळी ते आमच्याशी बोलले मी समोर होतो. ते मला म्हणाले ' तू काय करतोस ? मी म्हणालो, 'मी विद्यार्थी आहे, दहावीला आहे मग ते आम्हा सर्वांना उद्देशून म्हणाले, तुम्ही विद्यार्थी आहात. अभ्यासाकडे लक्ष द्या. 'less diet, study hard' असे बाबासाहेब म्हणत त्याचा पुनः एकदा प्रत्यय आला. आणि एकदा त्यांना वंदन करता आले. असे अनेक क्षण अतिशय भावुकतेने अंत:करणात जपून ठेवले आहेत. नवीन लेखन करणा-यांसाठी काही संदेश ? 'संदेश काही नाही. प्रामाणिकपणे लिहिले पाहिजे. सच्चे अनुभव हे कधीही साहित्यापासून दूर राहात नसतात. दूर राहू नये. तेव्हा जे लिहायचे असेल त्यात आंतरिक उमाळा असावा. खोटेपणाने तुम्ही साहित्यनिर्मिती करु लागला तर त्याचा खोटेपणा उघड होतो. पितळ हे तुम्ही कितीही सोनं म्हटलं तर ते सोनं होत नाही. तसं साहित्याचे सुद्धा आहे. धन्यवाद सर....!!! ( अजून खूप विचारायचे होते, गप्पा मारायच्या होत्या, पण अभिनंदनासाठी ताटकळलेली मंडळी पाहता गप्पा आवरत्या घेतल्या. मुलाखत भ्रमनध्वनीत रेकॉर्ड करुन नंतर लिहिलेले आहे,त्यामुळे चुभुदेघे. ) पुस्तके     सन्मान सरांचे, स्वतःचे भव्य ग्रंथालय आहे. संशोधन कार्यासाठी अनेक प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना ती एक मेजवानी असते. विविध सन्मानचिन्ह, मानपत्रांनी सरांचे घर भरुन गेले आहे.


वाचन 13311 प्रतिक्रिया 0