मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(वर्षाव)

राजेश घासकडवी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
छ्या छ्या, आजकाल बायका दारू पिऊ लागल्या. बीयर, वाईन आणि लिकरमधला फरक तरी कळतो का त्यांना? निदान दारू पिऊन मिपावरती धागे तरी टाकू नयेत. धागे कसले, कॉकटेलमध्ये भिजून ओल्यागिच्च झालेल्या कागदी स्ट्रॉ. आजकाल त्याही मिळत नाहीत. माझ्याकडे एक शेवटची स्ट्रॉ आहे ती टाकून देतो. मग बघतोच उंटाची पाठ कशी मोडत नाही ते. ---------------------------------------------------------------------------------------------- लाहोल बिलाकुवत. तौबा तौबा. या काफरांची ही मिजाज! हे अल्ला परवरदिगार, आता तूच माझं रक्षण कर रे बाबा या रावणी पिठल्यापासून. ---------------------------------------------------------------------------------------------- तो गोसावी रोज येतो. अल्लख म्हणतो. आपल्या भोकरी डोळ्यांनी मला निरखून बघतो. नजर हळूच खाली घरंगळते. पण घेत मात्र काहीच नाही. मला वाटत राहातं एकदा तरी त्याच्या झोळीत भाकर घालताना त्याच्या हाताला हात लागावा. मोहरून माझी मान खाली जाईल, तरी मी चोरटा कटाक्ष एखादा टाकेनच. कल्पनेने सुद्धा हुळहुळून जायला होतं. पण रीत आड येते, त्यालाही. मी ही अशी वांझ, मग तो माझ्या हातची भिक्षा कशी घेणार. हं. बघतेच कशी नाही घेत ते. ---------------------------------------------------------------------------------------------- आपून सगळा करून पायला. साला तिला सगळा उलटाच वाटला तर मी पन काय करनार. आयला माज्याकडचं सगलं काडून दिला, तर ती म्हनतीय वासना. तिच्याच पाठी लागलेल्या एका यडच्याप प्वाराला जरा दमात घेऊन कळवळीची विनंती क्येली तर ती म्हंती मीच गुंड म्हणून. तिची एक मैत्रीण होती जरा 'अडचणीत' तर मी मोठ्या मनाने पैशे दिले हॉस्पिटल वगैरे साठी, तर ही म्हंते दीखावा नुसता. आता मला नीट आटवत नांय हां.. त्ये सगला काडून दिला तेवा दीखावा म्हनली असंल आणि मैत्रिणीच्या वेळी वासना म्हणाली असंल. कायका आसंना पन मुद्द्या काय, कसा वागू मी शहाण्यासारखा................ई...ई......ई......ई.........ईईईईई......................ही पाल कुठनं टपकली मधेच? ---------------------------------------------------------------------------------------------- कॉसकोचा प्रवास करून आताशा माझं वजन वाढायला लागलंय. तिकडे काय मस्त मस्त सॅंपलं मिळतात - हाताळायला आणि चापायलासुद्धा. त्यात एचार वाल्यांनी प्रोसेस इंप्रुव्हायला सांगितली - आणि मीसुद्धा ती घरीच इंप्लिमेंट करायला गेले. ती दूतीही नव्हती तिथे, ते बरंच. नव्या प्रोसेसमुळे अर्ध्या वाटेवर जी पाठीत उसण आली, की विचारू नका. तरी बरं नवरा कधी नव्हे तो नेमका कामाला आला. पण त्याची आणि आमच्या मुलीची छद्मी नजर अजून जात नाही डोळ्यासमोरून. ---------------------------------------------------------------------------------------------- तर मंडळी, या वर्षी आपल्याला रस्तेबांधणीचं बजेट जास्त मागून घ्यायचं आहे. काय आहे की थ्री डी एक्स्प्रेस बांधायची आहे ना! आणि तरीही पुरले नाहीत तर करून टाकू झुमरीतलैया ते पटणा आणि होस्पेट ते गुलबर्गा कॅन्सल. काय म्हणता, पुणे तळेगाव कॅन्सल? छे छे, मला या पुणेकरांशी पुन्हा वाद उकरून काढायचा नाही. एकदा त्यांच्या ब्ल्याक बुकात गेलो तेवढं पुरेसं आहे. ---------------------------------------------------------------------------------------------- आमचे बाबा म्हणजे ना, अगदीच हे आहेत. स्वत्ताला ज्यादा शाने समजतात. मला काच फुटण्याविषयी सांगतात. म्हणतात हॉकी स्टिकने फोडायची. मला काय कळत नाही का? आता मोठा आहे मी. आत्तापर्यंत खूप बाटल्या फुटल्या... ---------------------------------------------------------------------------------------------- आपण इंचाइंचाने काश्मीरमध्ये माघार घेत आहोत. फार बिकट परिस्थिती आहे, आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? आजच जोरदार कारवाई करायला हवी. नाहीतर हे जर असंच चालू राहिलं तर दीडेक लाख वर्षात आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आणि दहा पंधरा लाख वर्षात संपूर्ण भारत गमावून बसू, आणि युरोपासारखी परिस्थिती येईल. लवकर पोस्टकार्ड टाका, वेळ फार नाही. ---------------------------------------------------------------------------------------------- कविते, तू भाजी होशिल का... स्फुरलीस तू अवचित मजला, पोळीचा परि तवा तापला, भेंडी होऊनी ताकामधली, वदनी माझिया कवळशिल का ? कविते, तू भाजी होशील का ? ('गे कविते, तू भाजी होशिल का...' नकोच ते. भलेभले चळतात.) ---------------------------------------------------------------------------------------------- आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत. इतकंच नाही, तर त्या चर्चा कशा चालाव्या, किंवा चालू नयेत यासाठी कोणत्या सूचना देणं रास्त आहे, हे शोधून काढण्यासाठी कौल टाकावे का असा कौल टाकण्याची चर्चादेखील चालूच आहे. एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू. पण नुकतंच सरपंचांनी चर्चा टाळाव्यात, वारंवार सूचना टाळाव्यात, मिपा सर्वांचंच आहे अशा अनेक गोष्टी सांगितल्या असतानाही या चर्चा चालवाव्यात का? आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे. की कौलच टाकावा सरळ? ---------------------------------------------------------------------------------------------- ऊलिखांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी काय सांगू लायसॉल्ला आयळीची ही व्यथा ----------------------------------------------------------------------------------------------

वाचन 11110 प्रतिक्रिया 0