बतावणी!
(स्थळ - क्षीरसागर, विष्णूंचा महाल.
एका कोचावर गरुड लॅपटॉपवर 'मिपा मिपा' खेळतोय!
टीपॉयवर काही आध्यात्मिक ग्रंथ पसरुन ठेवलेत.)
(आतल्या खोलीतून) लक्ष्मी : अहो! अहोऽऽ!!
लगबगीनं बाहेर येत : आँ..कुठे कडमडले हे आता?
(गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे?
अं...आँ....कोण कुठे?
अरे अं आँ काय? हे कुठे गेलेत आत्ता सकाळी सकाळी विचारतेय मी?
हां हां ते होय, ते मगाशीच बाहेर पडले! जाताना काही सांगितलं नाही पण 'मानससरोवर' असं काहीतरी पुटपुटत होते!
मानससरोवर?? इतक्या लांब आणि तुला न घेता कसे गेले?
मला काय माहीत? मी नेऊ का विचारलं तर फक्त हातानेच नको अशी खूण केली!
(कानाशी आयफोन लावत) लक्ष्मी : छ्या..मोबाईलही ऑफ करुन ठेवलाय!! मेसेजवर जातोय!!! कसं शोधायचं आता कोण जाणे? काही शिस्तच राहिली नाहीये! जाऊ दे मेलं, मी आता नाष्टा करुन घेते नाहीतर आणखीन कलकलतं मग!! (आत जाते)
नारद (महालात प्रवेश करत) : नारायण! नाऽरायण!!
गरुड : या या मुनिवर! आज सकाळीच येणं?
लक्ष्मी लगबगीनं बाहेर येत (हातात धिरड्याची प्लेट) : यावं मुनिवर. आसन ग्रहण करा आणि मग हे धिरडंही!
नारद (काऊचवर बसत) : वा वा! देवी, आपण भलत्याच सुग्रण आहात, काय खमंग वास सुटलाय धिरड्याचा! वा!!
(धिरडं खात) नारद : कुठे आहेत तुमचे हे?
लक्ष्मी : अहो काय सांगू मुनिवर? सकाळपासूनच गायब झालेत! हा गरुड म्हणतोय की 'मानससरोवर' असं काहीतरी म्हणत गेले म्हणे!
नारद : हंम्म्म्. हे अंमळ भलतंच काहीतरी! आत्ता यावेळी तिकडे?
(नारद अजून एक धिरडं चापतात आणि वरती फक्कड चहाही हाणतात!)
आहा! आता कसं पोट छान भरलं बघा देवी. काल भूलोकावर फारच चालणं झालं होतं, आणि भूकही अंमळ जास्तच लागते आजकाल!
चला आता निघावे म्हणतो. हे घरी आले की कळवा.
लक्ष्मी : हो हो नक्कीच कळवेन. फोनवर भेटला नाहीत तर व्यनि तरी नक्कीच टाकेन!
नारद : हो हो व्यनिच करा. खरडींचा काय भरोसा, त्या 'बिका'ट वाटेने 'परा'गंदा होतात लगेच!
(एवढ्यात विष्णू महालात प्रवेश करतात)
लक्ष्मी (पुढे होत) : अग्गोबाई!! आलात? या, तुमचीच वाट बघत होते हो सगळे!! कुठे नाहीसे झाला होतात?
विष्णू : सांगतो, सांगतो!! आधी मला एक चहा आण आणि थोडं खायला सुद्धा!!
(लक्ष्मी आणते म्हणत आत जाते.)
विष्णू : हुश्य्.....दमलो बुवा! हं .....बोला मुनिवर कसं काय येणं केलंत?
नारद : काही नाही सहजच आलो होतो बरेच दिवसात आपलं दर्शन नव्हतं!
(लक्ष्मी बाहेर येत धिरडं आणि चहा टीपॉयवर ठेवते. विष्णू सगळं झटपट संपवतात आणि उपरण्याला हात, तोंड पुसतात!)
विष्णू (लोडाला टेकत): तर मी सकाळीच कुठे गेलो असा तुमचा प्रश्न आहे! ती एक समस्याच होती.
??
विष्णू : त्याचं काय झालं काल मी भूलोकावर हिंडत असताना अचानक दुर्वास ऋषी सामोरे आले. त्यांच्या चरख्यावर त्यांनी एक दोन इंची मिळमिळीत धागा काढला होता!
मी विचारता झालो की "तुम्ही इतके सुंदर धागे ह्यापूर्वी कातलेले असताना असला धागा कातण्याचे प्रयोजन काय?"
तर माझ्यावर कोपिष्ट होत गरजले "देवा, तुमच्यासारख्यानंही पक्षपाती व्हावं ना? इकडे स्पष्टवक्तेपणाचा आव आणताय तिकडे लोक प्रक्षोभक धाग्यामागून धागे उसवताहेत, तुमचं लक्ष नाही आणि माझ्या निरुपद्रवी धाग्यावर तुमचा आक्षेप??"
मी म्हणालो "समजलं नाही मुनिवर! काही उदाहरण देऊ शकाल का? चूक झाली असेल तर अवश्य दुरुस्त करेन!"
तेव्हा छद्मी हसत गरजले "आत्मपरीक्षण करा देवा! तुमचं तुम्हालाच सापडेल!"
तेव्हापासून जो भंजाळलोय मी तो आत्तापर्यंत!
अहो तुम्हाला सांगतो देवर्षी, रात्रभर तळमळतोय, डोळ्याला डोळा नाही!
ही, ही बघा, ही सगळी पुस्तकं दिसताहेत ना? सगळी चाळली हो, पण शिंचं कोणी आत्मपरीक्षण कसं करावं त्याबद्दल बोलतंच नाही.
गूगलवर 'आत्मपरीक्षण' असा सर्च दिला तर भलभलत्याच साईट्स उघडल्या! :(
शेवटी वैतागून सक्काळी मानससरोवराच्या काठी जाण्यासाठी निघालो, म्हटलं त्या शांततेत तरी काही सुचेल पण नाही जातानाच एवढा ट्रॅफिक जाम की काही विचारु नका!
आणि तिथे सरोवराकाठी सुद्धा एक चमत्कारिक दृश्य दिसलं हो माझ्यासारखेच साताठजण विमनस्क चेहेर्याने तिथे हिंडत होते एकाला विचारलं तर म्हणाला "दुर्वास भेटले होते आणि आत्मपरीक्षणाबद्दलच सांगितलं!" तिथे झाडावरही काही मंडळी दबा धरुन बसली होती मज्जा बघायला बसल्यासारखी (त्यातला एकजण जाम उचकवत होता बाकीच्यांना, स्वर्गाच्या पश्चिम भागातला असावा असा संशय आहे.)
तिथे बराच वेळ डोळे बंद करुन बसलो तळ्याकाठी पण मग काही अप्सरा जलक्रीडेसाठी उतरल्या पाण्यात मग लक्ष लागेना, सारखे डोळे किलकिले व्हायला लागले!!
मग आलो परत बापडा.
(लक्ष्मी डोळे मोठे करुन) : हंम्म्म्म्म (एवढंच करते)
नारद (मोठ्यानेहसत) : हा हा हा हा!! अहो इतकंच ना मला एक एसेमेस केला असतात तर चुटकीसरशी सोडवला असता प्रॉब्लेम तुमचा!!!
विष्णू : आँ काय सांगताय काय?
नारद : मग! चला आत्ता लगेच निघूया.
विष्णू : कुठे?
नारद : आत्मपरीक्षणाला! दुसरीकडे कुठे?
(चला दोघेही निघतात)
लक्ष्मी : अहो पण मुनिवर येणार कधी तुम्ही?
नारद : आमची वाट नका बघू देवी अंमळ वेळ लागेल!
(महालातून बाहेर पडतात)
विष्णू : अहो पण मुनिवर निघालोय कुठे आपण!
नारद : देवा, अहो कसलं डोंबलाचं आत्मपरीक्षण हो! बशीभर काजू, एक तळलेल्या पापलेटने भरलेली डिश आणि फक्कडसा सोमरसाचा प्याला, बास सुरु आत्मपरीक्षण!!
विष्णू : आँ!!!!! मुनिवर ??!!...
नारद (डोळे मिचकावत) : चला, चला, लवकर चला! 'पूनम' झिंदाबाद!! आत्मपरीक्षण झिंदाबाद!!!
-चतुरंग
वाचन
8209
प्रतिक्रिया
0