असे असायला हवे होते/बहुधा असेच असावे! :)
राम राम मंडळी,
चि वि जोशी हे मराठीतले एक नावाजलेले लेखक. चि वि जोश्यांचे एक पुस्तक आहे. (त्याचं नांव मला आत्ता आठवत नाही, पण आठवून नक्की सांगेन.) त्या पुस्तकात त्यांनी काही धमाल लेख लिहिले आहेत. त्यांचं (म्हणजे चि विं चं) म्हणणं असं की आपल्या संस्कृतीने 'याचक' हाच नेहमी मोठा ठरवलेला आहे. आणि याचकाला दान दिल्यावर किंवा याचकाने दात्याकडून दान घेतल्यावर जणू काही याचकच दात्यावर फार मोठ्ठे उपकार करतो आहे असं चित्र गेली वर्षानुवर्ष आपल्या संस्कृतीत रंगवलं गेलं आहे. दात्याला इतर कोणतंही क्रेडिट न देता जणू काही दान देणं हे त्याचं कर्तव्यच आहे आणि असं चित्र निर्माण करण्यात आपले बरेचसे ऋषिमुनी वर्षानुवर्ष यशस्वी झाले आहेत असं चि विं चं म्हणणं आहे! :)
चि विं च्या या पुस्तकातील एका लेखाचा साधारण गोषवारा असा -
(नेमके शब्द माहीत नाहीत, हे पुस्तक वाचल्याला आता बरीच वर्ष झाली,)
या लेखात (शीर्षक - 'असे असायला हवे होते' किंवा असंच काहीतरी!) चि विं नी असं म्हटलं आहे की ही सर्व ऋषिमुनींची जमात म्हणजे अत्यंत माजुरडी जमात होती. ही मंडळी स्वतः काहीही कामधंदा करत नसत परंतु उगाच सगळीकडे आपण मोठे विद्वान असल्याचा जोरा करत अत्यंत माजोरीपणाने समाजात वावरत. चि विं नी आपल्या विनोदी शैलीत या गोसावड्यांवर छान कोरडे ओढले आहेत.
आता दुर्वास ऋषिंचीच कथा घ्या! द्रौपदीची थाळी सूर्यास्तानंतर काम करत नसे हे जाणून दुर्वासांनी समस्त पांडवांना फुक्कटचा त्रास द्यायचे एक षडयंत्र रचले आणि एकदा मध्यरात्री ते आपल्या हजार दीड हजार शिष्यवर्गाला घेऊन पांडवांकडे जेवायला गेले. पुढे द्रौपदीला, 'ऐन वेळेस पाहुण्यांना जेवायला काय वाढायचे' या संकटातून बाहेर पडण्यास कृष्णाने मदत वगैरे केली अशी काहीशी 'द्रौपदीची थाळी' ही मूळ कथा सर्वश्रुत आहे. परंतु चि विं ना ही कथा काही रुचेना आणि आपल्या लेखात ही कथा वस्तवात कशी असायला हवी होती, कशी घडायला हवी होती हे चि वि फार छान लिहितात!
ते लिहितात, (नेमके शब्द आठवत नाहीत परंतु माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतो! :) --
हा दुर्वास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी होता. कारण नसताना एक सारखे आकांडतांडव करणे, भडकणे, सतत कुणाच्या तरी नावाने शापवाणी ओकणे एवढंच त्याला येत होतं. द्रौपदीची थाळी सूर्यास्तानंतर काम करत नाही हे त्या फाजील माणसाला चांगलं माहीत होतं, तरीही पांडवांना केवळ त्रास द्यायचा आणि आपलं स्तोम अधिक माजवायचं या हेतूने तो एका मध्यरात्री आपल्या हजार-पाचशे गोसावड्या शिष्यवर्गाला घेऊन पांडवांच्या कुटीपाशी पोहोचला आणि त्यांनी दार ठोठावलंन! :)
द्रौपदीने दार उघडताच दुर्वासाने आपल्याला जेवायला वाढणे हे जणू काही द्रौपदीचं कर्तव्यच आहे अश्या थाटात त्यांनी द्रौपदीला 'आम्ही सगळे जेवायला आलो आहोत' असा हुकूम सोडला!
(म्हणजे पुन्हा याचकच मोठा, आणि दाता कस्पटासमान! :)
आपली थाळी मध्यरात्री आकाशात सूर्य नसल्यामुळे काम करत नाही हे जाणूनच या हलकटाने मध्यरात्री आपल्याकडे जेवायला येण्याचा घाट घातला आहे हे द्रौपदीने ओळखले! :) परंतु तिचे सगळे नवरे, विशेषतः भीम डाराडूर झोपला होता. भीमाच्या केवळ घोरण्यामुळेच आजुबाजूच्या जंगलात असलेली श्वापदे चळाचळा कापत होती.
परंतु द्रौपदीही तशी हुशार! :) भीमाला झोपेतून जागं करायला थोडाशी सवड मिळावी म्हणून द्रौपदीने 'आम्ही पारोश्या ब्राह्मणांना जेवायला वाढत नाही. तुम्ही सगळे नदीवर जाऊन अंघोळी करून या, तो पर्यंत मी स्वयंपाक तयार ठेवते' असे दुर्वासाला सुनावले! :)
दुर्वास आणि मंडळींवर पारोसे ब्राह्मण हा आरोप ठेवून द्रौपदीने तात्पुरती का होईना, दुर्वासाची जरा पंचाईतच केली! काहीही अधिक न बोलता मनातल्या मनात रागाने चडफडत दुर्वास आपल्या शिष्यवर्गाला घेऊन नदीवर अंघोळी करता चालता झाला. पण थंडी तर जामच पडली होती त्यामुळे 'तिच्यायला एवढ्या थंडीत नदीच्या गार पाण्यात कोण फुक्कटची अंघोळ करतो?' असा विचार करून दुर्वास आणि मंडळी नुसतीच एक चक्कर मारून पांडवांच्या कुटीत परतली! :)
एव्हाना द्रौपदीने भीमाला झोपेतून उठवला होता. भर मध्यरात्री झोपमोड झाल्याने भीम चांगलाच भडकला होता. तेवढ्यात दुर्वास आणि त्याचा कंपू तिथे पोहोचले. दुर्वासाला पाहताच भीमाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने दुर्वासाला चांगलेच सुनावले! तो म्हणाला,
"हा दाढीदिक्षितांचा मेळावा आत्ता इथे कुठे? काय रे दुर्वासा, तुला काही रीतभात आहे की नाही? :) मध्यरात्री दारं ठोठावून, लोकांची झोपमोड करून खुशाल जेवायला मागतोस? देऊ का चांगला धम्मक लाडू?" :)
"तुझे सर्व शिष्य तर आधीच पळाले आहेत. आता काही जेवायला बिवायला मिळणार नाही. तुझ्यावर दया करतो आणि तुला आमच्या कुटीत झोपायला जागा देतो आहे हे नशीब समज! बाहेर गेलास तर जंगली श्वापदं तुला फाडून खातील! चल झोप आता मुकाट्याने.."
भीमाने असा हाग्या दम दिला आणि दुर्वास चुपचाप झोपला! :))
तर मंडळी, अशी ही द्रौपदीची कथा! अर्थात, चि विं च्या कल्पनेतली! आता चि वि हे मराठीतले थोर विनोदी लेखक. खुद्द त्यांनीच असं लिहून माझ्यासारख्या होतकरू लेखकांना जणू काही लायसनच दिले आहे. माकडाच्या हातात कोलीतच म्हणा ना! :))
चि विं ची वरील कथा वाचून मलाही एक लहानशी कथा सुचली ती इथे लिहून समारोप करतो -
असे असावे -
व्यास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी! सगळ्यांनी फुक्कटचा लाडावून ठेवलेला. स्वतःला मारे गुरूबिरू म्हणवून घ्यायची याला दांडगी हौस! :)
पण मंडळी झालं असं, की बुद्धीची देवता, १४ विद्या ६४ कलांचा अधिपती वगैरे गुणांनी संपन्न असा गणपती तेव्हा बराच फेमस होता! व्यासाचं सगळं मार्केट खात होता. समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता. च्यामारी व्यासाला कुणीच विचारेना. नाही, तसा व्यासही तपस्वी वगैरे होता आणि त्याने तपस्या वगैरे करून थोडेफार नालीजही प्राप्त केले होते! :)
तर मंडळी, या व्यासाचा एक हुशार शिष्य होता. त्या शिष्याने गीता नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. व्यासाने आपल्या गुरुपदाचा फायदा घेतला आणि त्या अज्ञात शिष्याची मुस्कटदाबी केली आणि आपणच हा ग्रंथ लिहिला असं सगळीकडे सागत सुटला! :)
तरीही गणपतीची पॉप्युलॅरिटी काही केल्या कमी होईना! गणपती, त्याचं व्यक्तिमत्व, त्याच्याकडचं असलेलं एकमेवाद्वितीय असं बुद्धीचातुर्य, हे सगळं व्यासाला हळूहळू असह्य होऊ लागलं, आणि हा गणपती जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी व्यासाच्या डोळ्यात खुपू लागला. व्यास गणपतीचा मनोमन तिरस्कार करू लागला! :)
आणि या तिरस्कारातूनच, अहंकारातूनच, मूळात ढापलेल्या गीता या ग्रंथाबद्दल 'मी सांगितले आणि गणपतीने लिहिले' अशी एक जबरदस्त अफवा हा व्यास जिथे तिथे पसरवू लागला आणि मार्केट मध्ये 'बघा, मी किती हुशार! हा गणपती माझा साधा कारकून आहे!' अश्या बाता मारत फिरू लागला! :)
लोकांनी अर्थातच खरंखोटं काय हे गणपतीला विचारलं! गणपती मिश्किलपणे मनाशीच हसला आणि त्याने 'जाऊ दे, उगाच चारचौघात बिचार्या या व्यासाच्या इज्जतीचा कशाला फालुदा करा?!' असा उदारमतवादी विचार करून होकार भरला आणि 'गणपती व्यासांचा लेखनिक होता' ही व्यासांनी पिकवलेली कंडी जनमानसात अगदी आजपर्यंत खरी मानली गेली! :)
पुढे केव्हातरी गणपतीने व्यासाला खाजगीत भेटायला बोलावून व त्याच्या कानाखाली दोन सणसणीत आवाज काढून, 'यावेळेस सांभाळून घेतलं आहे, पण पुन्हा माझ्याबद्दल अश्या कुठल्याही थापा मारल्यास तर सोंडेनी उचलून फेकून देईन. चल, चालता हो आता!' असा सज्जड दम भरला! :)
असो!!
आपलाच,
(गणेशभक्त!) तात्या.
वाचन
41904
प्रतिक्रिया
0