मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शामी कबाब!!!

पिवळा डांबिस · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"ट्रिंग, ट्रींग...", बरोब्बर सव्वापाच वाजता त्याचा फोन वाजला.... त्याने बरोब्बर ओळखलं की हा तिचा फोन! गेल्या वीस वर्षांचा पायंडा!!! ऑफिसमधून घरी परतण्यापूर्वी हा तिचा ठरलेला फोन.... "हॅलो", त्याने फोन उचलला..... "हे बघ, आता मी घरी जायला निघतेय १०-१५ मिनिटांत", तिचा हुकमी आवाज "ओके, मी पण तितक्यातच निघतोय. काय आणायचंय का? आज काय करायचंय?", त्याची नेहमीची चौकशी... इतक्या वर्षांची ठरलेली सवय! तिने थेट घरी जायचं आणि त्याने जे काही आणायचं असेल ते घेऊन मग घरी यायचं!!!! "नाही, काही आणायचं नाही आज! आणि जर तू मला मदत करणार असशील तर शामी कबाब करूयांत आज!!!", तिचा गोड म्हणजे अगदी सुमधूर आवाज...... तो एव्हांना मरून वर स्वर्गात गेलेला!!!! फक्त खात्री करून घेण्यासाठी त्याने विचारलं, "आज काय करूयांत?", तो. "शामी कबाब!!! पण मला मदत केली पाहिजेस तू!!!!" "अगं मदतच काय, तुझ्यासाठी मरायला पण तयार आहे मी!!!!" तो संपूर्ण सत्य वदला.... "चावटपणा नकोय!! मदत केलीस तर तेही पुष्कळ आहे", ती अस्सल मराठी मुलगी. "अस्सं! तर मग तू आता बघच!!! त्याने घाईघाईने कंप्यूटर बंद केला. १०-१५ मिनिटं गेली उडत. तिला तिच्या आधी घरी भेटायचंच या हेतूने तो ९०-९५ मैलांच्या स्पीडने घरी पोहोचला. तिची कार अजून आलेली नव्हती. त्यातच त्याने आपला पहिला विजय मानून भराभर कपडे बदलले आणि मीट थॉ करत ठेवलं. कांदे कापून ठेवले. चण्याची तिने सकाळी अगोदरच भिजत घातलेली डाळ वाटून ठेवली. लसणाची आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली....... तितक्यात तिने ड्राईव्ह-वेमध्ये तिची गाडी पार्क केल्याचा आवाज आला. त्याने घाईघाईने त्याचा कुकींग अ‍ॅप्रन अंगावर चढवला. तिच्यायला, उगाच आल्याआल्या बोलणी खायला नकोत..... :) ती आत आली. त्याला किचनमध्ये एप्रन घालून बघितल्यावर सुखावली. पण ते किंचितही न दाखवता म्हणाली, "मी जरा कपडे बदलून येते! मग करूया कुकिंग!!" तो खुशीत हसला..... "तू कोणतेही कपडे बदल जानेमन!! शेवटी त्यांचं काय करायचं आहे ते माझ्या हातात आहे!!!!", तो मनातल्या मनात खुदखुदला!!!! तिने कपडे बदलून आल्यावर लगेच किचनचा ताबा घेतला. त्याने केलेली तयारी बघून तिचा आनंद दुणावला.... "बोल आता मी आणखी काय मदत करू?", त्याचा उत्साह... "हे सगळं ठीक आहे! आता पुढचं संभाळते मी!!!" "अगं मग मी काय करू?" "तू आता जाऊन तुझं ड्रींक घे! पण जास्त नाही, दोनच पेग!!!" पडत्या फळाची आज्ञा घेऊन तो त्याच्या स्टडीमध्ये धावला..... आज त्याची नेहमीची लाडकी शिवास रीगल सोडून त्याने तात्याच्या गर्लफ्रेंन्डशी सलगी साधायचा चावट विचार केला आणि ग्लेन्फिडिश अनावृत केली.... DSC_0219_311 आणि तीही आतुरतेने त्याला बिलगली!!! च्यामारी ह्या तात्याच्या...... दोन ग्लास घुटके झाले न झाले तोच आतून आवाज आला.... "चल रे, जेवण आहे तयार!!!" आपल्या मित्राची आठवण झाल्याने त्याने ग्लेनफिडीशला निकराने दूर सारलं..... मर्द हुवा तो क्या हुवा? आखिर दोस्ती भी कोई चीज होती है!!!! :) किचनमध्ये येऊन बघतो तो ताट शामी कबाब, मलगटवानी सूप आणि गार्लिक नानने भरलं होतं..... किसलेला कांदा आणि काकडीचं कचुंबरही सोबतीला होतं.... हरहर महादेव म्हणून त्याने भोजनावर ताव मारला..... "वा!! तुझ्या हातचे कबाब म्हणजे हॉटेलं झक मारतात त्यांच्यापुढे!!!", त्याची मनमोकळी प्रतिक्रिया.... ती खुदकन हसली!!! पण तेही त्याच्या नजरेतून सुटलं नाही..... "अगं पण हे काय? रेसेपी दे ना!!! त्याशिवाय मिसळपाववर कसं लिहिणार मी?", तो. "अरे त्यात काही नाही, सोपं आहे!! तेलावर कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्यात लसूण आणि आल्याची पेस्ट घालून ते परतून घ्यायचं. त्यानंतर आपला शामी कबाबचा मसाला आणि मिरचीपूड परतून घ्यायची. त्याच्यानंतर त्यात खिमा आणि डाळ घालून शिजवून घ्यायचा. पाणी उडवून टाकायचं आणि मग तो खिमा थंड झाल्यावर त्याचे गोळे करून खमंग तळायचे! झाले शामी कबाब, आहे काय आणि नाही काय त्यात!!" मिपावरच्या भगिनींनो, ही रेसेपी गोड मानून घ्या.... "हो, पण मला एक फोटोही घ्यायचाय! फोटो दिल्याशिवाय तो शिंचा अवलिया प्रसन्न होत नाही!!", तो. "अरे पण आता फोटो काढायला कबाब शिल्लक राहिलेयत कुठे? जरा आधी तरी सांगायचंस!!!", सचिंत ती... "ते जे काय उरले आहेत ना, त्याचाच काढू फोटो!! नायतरी अवलियाला चार-पाच कबाबांपेक्षा जास्त बघायची सवय नसणार! अग सडाफटींग माणूस तो!! तो कशाला किलोभरचे कबाब करील?" :) "तुझ्या जिभेला ना काही हाडच नाहिये!! उगाच कोणाहीबद्दल काहीही बोलतोस!! बघ बाबा, चालत असेल फोटो उरल्या-सुरल्या कबाबांचा तर घे!!" "चालेल! मेजवानी तर नुकतीच सिद्ध झाली... DSC_0223_315 अन तबकात उरल्या; देठ, लवंगा, साली... तो फोटो घेतोय, फ्लिकरवर चढवतोय आणि हे सगळं लिहितोय तोच...... खोलीतला दिवा बंद होऊन नाईटलॅम्प चालू झाला..... रेशमी वस्त्राची झुळझूळ कानी आली...... आणि त्याच्या आवडीचा मोगर्‍याचा सुगंध दरवळला......... मित्रांनो, आता त्यानं बेडरूममध्ये जाणं त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे...... जगलो वाचलो, तर उद्या भेटूच.... शब्बा खैर!!!!!! :)

वाचन 7769 प्रतिक्रिया 0