मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालचलाऊ गीता

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
:P आज अचानक श्री. ज. के. उपाध्ये यांची "चालचलाऊ गीता" ही खूप लहानपणी वाचलेली कविता सापडली. मिपाच्या सदस्यांना होळीच्या मेजवानीनिमित्त सादर! होळीच्या रंगीबेरंगी, रंगतदार, रंगीत शुभेच्छा! पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही ! धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग लेकांनो! होऊनिया रोग | मराना का! लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.' कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा? पहिल्याने तर टणाटणा | उडत होतास लढाया मारे रथावरी बैसला | शंखध्वनि काय केला! मग आताच कोठे गेला | जोर तुझा मघाचा? तू बेट्या! मूळचाच ढिला | पूर्वीपासून जाणतो तुला; परि आता तुझ्या बापाला | सोड्णार नाही बच्चमजी! अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही; बांगड्या भरा की रडूबाई | आणि बसा दळत! कशास जमविले आपुले बाप? नसता बिचा-यांसी दिला ताप; घरी डाराडूर झोप | घेत पडले असते! नव्हते पाहिले मैदान | तोंवरी उगाच करी टुणटुण; म्हणे यँव करीन त्यँव करीन | आताच जिरली कशाने? अरे तू क्षत्रिय की धेड? आहे की विकली कुळाची चाड? लेका भीक मागावयाचे वेड | टाळक्यात शिरले कोठुनी?' अर्जुन म्हणे 'गा हरी! आता कटकट पुरे करी; दहादा सांगितले तरी | हेका का तुझा असला? आपण काही लढत नाही | पाप कोण शिरी घेई! ढिला म्हण की भागूबाई | दे नाव वाटेल ते.' ऐसे बोलोनि अर्जुन | दूर फेकूनि धनुष्य-बाण, खेटरावाणी तोंड करून | मटकन खाली बैसला | इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः | :O)

वाचन 55649 प्रतिक्रिया 0