मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोवा - भाग १: जुन्या गोव्यातील चर्चेस

प्रचेतस · · भटकंती
गोव्याला तसा मी अगदी लहानपणी गेलो होतो, साधारण १४/१५ वर्षांचा असेन तेव्हा. अगदी पुसटश्या आठवणी आहेत तेव्हाच्या. पणजीला मुक्काम करुन तेव्हा उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा एकेक दिवसाच्या गोवा पर्यटन मंडळाच्या सहली केल्या होत्या. त्यात जुन्या गोव्यातील चर्चेस, मयें तलाव, मंगेशी आणि शांतादुर्गा मंदिरे, कोळवा, कळंगुट, वागातर असे काही किनारे पाहिल्याचं फक्त आठवतंय. त्यानंतर गोवा हा कित्येक वर्षे विशलिस्टवरच राहिला होता. मुळात इतक्या दूर जायचं तर ४/५ दिवसांची सवड हवी, मित्रांच्याही सुट्ट्यांचं जमायला हवं, इतरही काही प्राधान्यक्रमावरची ठिकाणं अशा काही अडचणींमुळे गोव्याला जाणं तसं वरचेवर लांबतच होतं किंवा गोव्याची हवी तशी ओढ निर्माण झाली नाही असं म्हटलं चालेल. सरतेशेवटी ह्याखेपी मात्र गोव्याला नक्की जायचं असं दिवाळीच्या अगोदर तीनेक महिन्यांपूर्वीच ठरवून टाकलं होतं. मित्रांच्याही सुट्ट्यांचं गणित जमलं होतं पण निव्वळ वेळकाढूपणामुळे बुकिंगच्या पातळीवर फारशी हालचाल नव्हती. पणजीच्या गजबजाटात राहायचं नाही, किनार्‍याला लागून असलेल्या बीच हाऊसेस वर राहायचं असं अगोदरच ठरलं होतं, बरीच शोधाशोध करुन शेवटी कोळव्यापासून साधारण दोनेक किमी दूरवर असलेल्या सेर्नाभाटी (sernabatim) किनार्‍यावरचं एक गेस्ट हाउस बुक केलं. हा भाग दक्षिणेत असल्याने बेळगाव खानापूर मार्गे अनमोड घाटातून गोव्यात उतरलो. दाट जंगलातून जाणारा हा रस्ता प्रशस्त, खड्डेविरहित आणि अतिशय सुंदर आहे. पुढे गोव्यात उतरताच मधे ३/४ लहानश्या टप्प्यांमध्ये रस्ता खराब आहे पण अगदी थोडासाच. वाटेत कुडचडे गावी बा. भ. बोरकर ह्यांचं घर दिसलं. अगदी मुख्य रस्त्यावरच आहे ते. मडगाववरुन सेर्नाभाटीला पोहोचलो ते संध्याकाळचे पाच साडेपाच वाजता. लगेच खोली ताब्यात घेउन समुद्रात उतरलो. सेर्नाभाटीचा किनारा अतिशय स्वच्छ, नितळ असा. सेर्नाभाटीचं मूळचं नाव सुवर्णभाटी असावं की काय असं क्षणभर वाटून गेलं. पांढरीशुभ्र वाळू, त्यात समुद्रशिंपले, शंख अशांच्या सोनेरी कवचांचे अगणित भुस्कट विखुरल्यामुळे उतरत्या उन्हांत ती वाळू अगदी सोन्यासारखी चमचमत होती. इथल्या किनार्‍यावर समुद्री जीवांचा सुकाळ. स्टार फिश, कर्ल्या, खेकडे, चालणारे शंख, शिंपले खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. पाण्यात उतरल्यावर अगदी लगेच टोचल्यासारखा स्पर्श जाणवतो. समुद्रात डुंबून, सूर्यास्त पाहून जेवायला मडगावला गेलो. a मडगाव इथून जेमतेम १० किमी अंतरावर. सेर्नाभाटी- कोळवा - मडगाव रस्ता अतिशय सुंदर, शांत, अजिबात गजबजाट नाही, रस्त्यावर भल्यामोठ्या इमारती नाहीत, जवळपास सर्वच बंगलेवजा बैठी घरं, अतिशय टुमदार, विविधरंगी. घरांसमोर क्रॉस, हिंदू घरांसमोर आकाशकंदिल, दिवाळीची रोषणाई. पुढच्या काही दिवसांत मुख्य मडगावातही फिरणं झालं, ते मात्र गजबजलेलं, गर्दी असलेलं. मडगावला शाकाहारी, मांसाहारी जेवणासाठी भरपूर हॉटेलं आहेत. कुणाचीही गैरसोय होत नाही. सेर्नाभाटीला मात्र चहाबाजांची गैरसोय होते. चहा सकाळी लवकर मिळत नाही, मिळाला तरी पांचट असाच. अगदी आम्ही जिथे उतरलो होतो त्या गेस्ट हाउसवरही चहाची तशी बोंबच होती. दुसर्‍या दिवशी आमचं लक्ष्य होतं ते जुन्या गोव्यातील चर्चेस. त्या आधी सकाळी लवकर उठून समुद्रावर बरंच अंतर अनवाणी चालून आलो. इथला वाळूचा पांढराशुभ्र पट्टा हा कित्येक किमी लांब आहे. त्यात अरोशी, माजोर्डा, वेताळभाटी, कोळवा, सेर्नाभाटी, बाणावली, वार्का, केळोशी, मोबोर, बेतुळ असे बरेच उत्तमोत्तम किनारे आहेत. समुद्रकिनार्‍यावरच्या मऊशार वाळूत अनवाणी चालण्यात एक भलतीच मौज असते. गोव्यातील जुनी चर्चेस आहेत ती जुन्या गोव्यात, म्हणजे तशी जुनी चर्चेस गोव्यात सर्वत्र आहेतच पण जी प्रमुख म्हणता येतील ती आहेत जुन्या गोव्यात अर्थात वेल्हा गोव्यात (वॅले गोआ velha goa). पोर्तुगीज भाषेत वॅले म्हणजे जुने. गोवा राज्यात दोन वॅले आहेत, एक मांडवी नदीच्या काठावर असलेले वॅले गोवा अर्थात वॅले सीदाद द गोआ (जुने गोवा शहर) आणि गोवा वॅले म्हणजे झुआरी नदीच्या काठावर असलेले दुसरे जुने गोवे. पैकी जी सुप्रसिद्ध चर्चेस आहेत ती मांडवी नदीच्या काठावर वसलेल्या वॅले गोव्यात. पोर्तुगीजांची ही आधीची राजधानी होती. व्हॉइसरॉयचे निवासथानही इथेच होते. इथली 'व्हाईसरॉयची कमान' (Viceroy's Arch) अर्थात विजरईच्या निवासस्थानाकडे जाणार्‍या प्रवेशद्वाराची कमान आजदेखील अस्तित्वात आहे. पण इथला मांडवीचा पाणथळ भाग, दलदल आणि त्यामुळे पसरत असलेल्या रोगराईमुळे गोव्याच्या विजरईने त्याची राजधानी तिथून दहा किलोमीटर अंतर असलेल्या पणजी येथे हलवली व त्याला नवे गोवे असे नाव पडले. हे जुने गोवे म्हणजेच गोवापुरी हे पूर्वाश्रमीच्या कदंब राजवटीतील एक महत्वाचे बंदर होते. आदिलशाही राजवटीत देखील ह्याचे महत्व कायम राहिले होते. ह्या जुन्या गोव्याला जायचा रस्ता फार सुंदर. डावीकडे मांडवीचं विस्तीर्ण पात्र, त्यात असलेली खारफुटीची जंगले, भरती ओहोटीबरोबर मांडवीचं कमी जास्त होणारं पाणी सतत सोबत करत असतं. ते पात्र संपता संपताच अचानक तीन मोठी चर्चेस सामोरी येतात. ती आहेत सेन्ट कॅटरीना कॅथीड्रल (Sé Catedral de Santa Catarina), बॅसिलिका ऑफ बॉम जीझस (Basilica of Bom Jesus), चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी (Church of St. Francis of Assisi), सेन्ट ऑगस्टीन टॉवर (ruins of St. Augustine's Tower), सेन्ट कॅथरीन चॅपेल (The Chapel of St. Catherine). याउप्परही तिथे अजूनही काही जुनी चर्चेस आहेत. मात्र वेळेअभावी फक्त बॅसिलिका ऑफ बॉम जीझस आणि चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी ही दोनच चर्चेस पाहता आली तर सेन्ट ऑगस्टीन टॉवरचे अवशेष गाडीतूनच पाहता आले. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस (Basilica of Bom Jesus) बॅसिलिका म्हणजे बायझन्टाईन शैलीत बांधलेली इमारत, अर्थात क्रिस्टियन धर्माच्या प्रसाराआधी असलेल्या पूर्व रोमन शैलीत असलेली इमारत. म्हणाजे रूढार्थाने ह्याची शैली नेहमीच्या चर्चेसप्रमाणे नाही. बॉम्/बोम जीझस म्हणजे चांगला किंवा बाल येशू. बॅसिलिकाची ऑफ बोम जीझसच्या बांधकामाला १५९४ साली सुरुवात झाली आणि ह्याची प्रतिष्ठापना (consecrate) १६०५ साली गोव्याचा आर्चबिशप अ‍ॅलिक्सो मेन्झेस(Archbishop Aleixo de Menezes) ह्याच्या हस्ते झाली. ह्या प्रतिष्ठापनेचा उल्लेख ह्याच चर्चच्या अंतर्भागातील एका शिलालेखात आहे. आणि ह्या चर्चला बॅसिलिका (Basilica minor) असा दर्जा १९४९ साली मिळाला. स्थापनालेख आणि त्याखाली बॅसिलिका दर्जा मिळाल्याचा लेख a ही बॅसिलिका तीनमजली असून एक मुख्य प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूंना उपप्रवेशद्वारे अशी ह्याची रचना आहे. दर्शनी भाग हा बसाल्टचा असून इतर सर्व भाग हा जांभ्याच्या दगडांनी बांधलेला आहे त्यामुळे ही इमारत काळसर आणि बाजूने तांबडीलाल दिसते. सर्वात वरच्या बाजूस IHS अशी अक्षरे दिसतात. ही अक्षरे म्हणजे ग्रीक भाषेतील येशूच्या नावाची सुरुवातीची तीन अक्षरे आहेत. (ΙΗΣΥΣ- ihsous - Jesus) बॅसिलिकेचं प्रथम दर्शन a बॅसिलिकेची बाजूची रचना a मुख्य प्रवेशद्वारावरील रचनेचं जवळून दृश्य a a मुख्य प्रवेशद्वारातून आत डावीकडे सेन्ट फ्रान्सिसची काष्ठमूर्ती दोन धर्मोपदेशकांसह उभी आहे तर उजव्या बाजूस सेन्ट अ‍ॅन्थनीची वेदी आहे तर तिथल्याच एका भिंतीवर ह्या चर्चचा संरक्षक डॉम जेरोनिमो मस्कारेन्हास ह्याचा समाधी लेख आहे. सेन्ट फ्रान्सिसची काष्ठमूर्ती a सेन्ट अ‍ॅन्थनीची वेदी a चर्चच्या आतमध्ये प्रवेश करताच भिंतीच्या दोन्ही बाजूंना म्हणजे फ्रान्सिस झेवियर ह्याची काष्ठमूर्ती आणि सेन्ट अ‍ॅन्थनीच्या वेदीच्या भिंतीना लागूनच येशूच्या जीवनातील काही प्रसंगांची चित्रे फ्रेममध्ये लावलेली आहेत. a--a चर्चच्या मुख्य वेदीच्या दोन्ही बाजूंस अवर लेडी ऑफ होप आणि सेन्ट मायकेल ह्यांच्या उपवेदी आहेत. तर मुख्य वेदीत खालच्या बाजूस बाल येशू असून त्याच्या वरील बाजूस सेन्ट इग्नाटियस लायोला, IHS लिहिलेले सूर्याची किरणे फेकत असलेले सुवर्णमय पदक आहे. तर त्याच्याही वरच्या बाजूस पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचे शिल्पांकन आहे (holy trinity). ह्याच वेदीवर अतिशय देखणी अशी रंगीत भित्तीचित्रे आहेत. हा सुवर्णमय भाग अतिशय झळाळता असून प्रचंड लखलखत असतो. चर्चची वेदी आणि दोन्ही बाजूच्या उपवेदिका a बाल येशू, त्याच्यावर सेन्ट इग्नाटियस लायोला (सर्वात मोठी मूर्ती), IHS पदक आणि त्याच्यावरील पवित्र त्रियक (holy trinity) --खालून वर a IHS पदक आणि पवित्र त्रियक a अवर लेडी ऑफ होप a सेन्ट मायकेल a वेदीच्या बाजूस असलेली भित्तीचित्रे a a ही वेदी पाहून होताच उजव्या बाजूस एक एक दालन आहे आणि त्यात इथले सर्वात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे सेन्ट फ्रान्सिस झेवियरचे शव. फ्रान्सिस झेवियर हा ३ डिसेंबर १५५२ रोजी चीनमध्ये मेला. त्याचे शरीर तीन वेगवेगळ्या देशांत तीन वेगवेगळ्या वेळी पुरले गेले, शेवटी त्याचे शव त्यानेच पूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार गोव्यात आणण्यात आले. गोव्यात ते पूर्वी दुसर्‍या चर्चमध्ये ठेवण्यात आले होते आणि अल्पकाळातच ते बॉम जीझस चर्चमध्ये आणण्यात आले. हे शव एका चांदी आणि लाकडापासून बनवलेल्या आणि काचेचे आवरण असलेल्या एका पेटीत ठेवण्यात आलेले आहे. ज्या दालनात ही शवपेटी आहे ते दालन (mausoleum) आणि ही शवपेटी टस्कनीचा ग्रॅण्ड ड्युक कॉसिमो (तिसरा) ह्याने भेट दिलेय. हा कॉसिमा तिसरा मेडीसी राजघराण्यातला. फ्लोरेन्सचा पिट्टी राजवाडा हे त्याचे निवासस्थान. ह्या मेडीसी राजघराण्याच्या काळात फ्लोरेन्समध्ये कलेची प्रचंड भरभराट झाली. बॉटीसेल्ली, व्हेसारी हे प्रसिद्ध रचनाकार्/चित्रकार ह्याच काळातले. मेडीसी राजघराण्याने ४ पोप व्हेटीकनला दिले. मेडीसी स्थपात्यशैलीचे, चित्रकलेचे, पिट्टी राजवाडा, व्हेसारी कॉरीडॉर ह्यांचे तपशीलवार उल्लेख डॅन ब्राऊनच्य 'इन्फर्नो' ह्या कादंबरीत आहेत. सेन्ट फ्रान्सिस झेवियरची शवपेटी असलेले दालन a दालनावरील नक्षीदार भाग a फ्रान्सिस झेवियरचे शवपेटीतले शव a ह्या दालनाच्या आतील बाजूतील एका दालनात फ्रान्सिस झेवियरच्या शवाची काही छायाचित्रे आणि येशूंच्या जीवनातले काही प्रसंगांची अप्रतिम अशी भित्तीचित्रे आहेत. फ्रान्सिस झेवियरच्या शवाचे छायाचित्र a तिथे असलेली काही भित्तीचित्रे a a a a a a ही भित्तीचित्रे बघत बघतच बाहेर आलो. विश्वाला प्रेमाचा आणि करुणेचा संदेश देणार्‍या येशूच्या ह्या सुंदर चर्चचा इतिहास मात्र काळाकुट्ट आहे. फ्रान्सिस झेवियर हा स्वतःच क्रूर धर्मप्रसारक होता हे बहुतेकांना माहिती आहेच. इथली भव्य आणि सुंदर वास्तू पाहतांना इथल्या लोकांवर केलेल्या अनन्वित अत्याचारांचा, त्यांचा धर्मन्यायालयांचा (inquisitions) इतिहास सतत नजरेसमोर तरळत होताच. ही वास्तू बघून बाहेर आलो. ह्याच्या समोरच आहेत ती सेन्ट कॅथरीन चॅपेल, सेन्ट कॅटरीना कॅथीड्रल, चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी आणि त्याला लागून असलेले गोवा पुरातत्व खात्याचे संग्रहालय. चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी (डावीकडे), सेन्ट कॅटरीना कॅथीड्रल (उजवीकडे) a चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी येथील आवारातुन दिसणारी बॅसिलिका ऑफ बॉम जीझस. a चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी हा सेन्ट फ्रान्सिस हा १३ व्या शतकात होऊन गेलेला इटालियन धर्मप्रसारक. ह्याच्या स्मरणार्थ हे चर्च येथे बांधले गेलेले आहे. ह्या चर्चचे प्रवेशद्वार कमानदार असून अंतर्भागात काही भित्तीचित्रे आणि जमिनीवर काही शिलालेख आहेत. चर्चच्या मुख्य वेदीवर सेन्ट फ्रान्सिस आणि येशूच्या मूर्ती असून बाजूंना सेन्ट पीटर आणि सेन्ट पॉल ह्यांच्या मूर्ती आहेत. क्रिस्टियन सेन्ट्स आणि त्यांची स्थापत्यशैली ह्यांचे वर्णन करणे मात्र माझ्या कुवतीबाहेरचेच आहे. चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसीचे बाह्यदर्शन a चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसीचा अंतर्भाग a मुख्य वेदीचा भाग a बाजूंच्या भिंतीत असलेल्या मूर्ती a ह्या चर्चला अगदी लागूनच गोवा पुरातत्व खात्याचे संग्रहालय आहे. ते अगदी आवर्जून बघावे असेच. गोवा पुरातत्व खात्याचे संग्रहालय ह्या संग्रहालयात काही अफलातून वस्तू आहेत. दुर्दैवाने आतील वस्तूंचे फोटो काढण्यास मनाई असल्याने येथे छायाचित्रे घेता आली नाहीत. हे संग्रहालय दुमजली असून वरील मजला हा नूतनीकरणाच्या कामामुळे बंद आहे. ह्या संग्रहालयात गोव्याच्या पूर्वपोर्तुगीजकालीन इतिहासाची झलक बघायला मिळते. तिसवाडी, बारदेश आणि साळशेत ह्या तीन तालुक्यांतील एकूण एक मंदिरे पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केली. ह्या कदंबकालीन मंदिरांचे, इथल्या अत्यंत देखण्या मूर्तींचे अवशेष येथे पाहायला मिळतात. येथे काही देखण्या विष्णूमूर्ती आहेत. काही अप्रतिम वीरगळ, सतीशिळा आहेत. ह्या वीरगळांवर नाविक युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. सतीशिळांवर स्त्री चितेवर चढलेला प्रसंग, तिला ज्वालांनी वेढून घेतल्याचे प्रसंग चित्रित करण्यात आलेले आहेत. देवनागरी, कन्नड लिपीत लिहिलेले गधेगाळ देखील येथे आहेत. वेताळाच्या काही भग्न मूर्ती तर काही अखंड मूर्ती आहेत. कदंबांची पहिली राजधानी मडगावपासून जवळ असलेल्या चांदोर येथे होती. तिथे अलीकडेच उत्खनन होऊन एक मंदिर सापडले आहे. चांदोरला जायला आम्हाला वेळ झाला नाही पण त्या उत्खननित झालेल्या मंदिराची सचित्र माहिती येथे पाहायला मिळाली. अजून एका मंदिरांची पुनर्बांधणी केल्याची छायाचित्रे देखील येथे आहेत. गोव्यात कधी आलात तर हे संग्रहालय पाहाण्याचे अजिबात चुकवू नका. ह्या संग्रहालयाला लागूनच आहे ते सेन्ट कॅथरीनाचे चॅपेल आणि त्याच्या बाहेरील बाजूस आहेत ते पोर्तुगीज राजचिन्हांच्या शिळा अर्थात कोट ऑफ आर्म्स. सेन्ट कॅथरीनाचे चॅपेल आणि कोट ऑफ आर्म्स. चॅपेल म्हणजे लहानसे चर्च. हे अतिशय टुमदार आहे. ह्या चॅपेलच्या दर्शनी भागाची छायाचित्रे काढायची राहून गेली. सेन्ट कॅथरीना चॅपेल a कोट ऑफ आर्म्स म्हणजे पोर्तुगीजांचे राजचिन्ह. पोर्तुगीजकालीन वास्तूंवर ही चिन्हे अगदी सर्रास आढळतात. मी वसई आणि कोर्लईच्या किल्ल्यांत ह्या चिन्हशिळा पाहिलेल्या आहेत. गोवा पुरातत्व खात्याच्या संग्रहालयाच्या आवारात ह्या शिळा हारीने मांडून ठेवलेल्या आहेत. कोट ऑफ आर्म्स शिळा a a-a सेन्ट कॅथरीन चॅपेल आणि कोट ऑफ आर्म्स a हे बघेस्तोवर संध्याकाळ होत आली होती. येथून निघालो ते मंगेशी मंदिर पाहून रात्री ८ च्या सुमारास दोना पावला येथे आलो. रात्रीचा समुद्र पाहून परत फिरलो. a a आता दुसर्‍या दिवशी मात्र जरा लांबचा पल्ला होता. गोव्याच्या अगदी दक्षिण भागात असलेल्या पैंगिण गावातले वेताळ मंदिर आणि लोलयेतील वेताळाची रानात उघड्यावर असलेली भव्य मूर्ती. त्याविषयी पुढील भागात. क्रमशः

वाचन 38285 प्रतिक्रिया 0