मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तीन किस्से

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तीन किस्से शनिवारी माझ्या दवाखान्यात जरा गर्दीच होती. त्यातीलच हे तीन किस्से. नावे काल्पनिक आहेत पण घटना सत्य आहेत. १)- एक ३६ वयाचा तरुण (रुपेश भोईर) आला होता. पोटदुखी साठी. सोनोग्राफी केल्यावर लक्षात आले कि बाहेर खाल्ल्यामुळे त्याचे पोट बिघडले होते आतड्याला सूज अली होती अन्न विषबाधा सारखा प्रकार. मी त्याला म्हणालो कि साहेब तुमचे बहुधा बाहेरच्या खाण्यामुळे किंवा बाहेरच्या पाण्यामुळे पोट बिघडले आहे. त्यावर रुपेश म्हणाला डॉक्टर आमच्या कंपनीचे कॅन्टीन चांगले नाही म्हणून मग रोज बाहेर खावे लागते. मी त्या विचारले कि मग तुम्ही घरचा डबा का घेऊन जात नाही. त्यावर तो आढेवेढे घेऊन कडू तोंड करून म्हणाला डॉक्टर माझी बायको सकाळी लवकर उठत नाही. मी विचारले त्या नोकरी करतात का? रुपेश :- नाही. मी:- तुम्ही घरातून किती वाजता निघता ? रुपेश :- आठ वाजता. पण ती उठतच नाही. आणि रात्री झोपायला अकरा वाजतात.काय करणार? मी ;- तुम्ही चांगले पोळीभाजी केंद्र पाहून तेथून साधा पोळी भाजीचा डबा नेत जा. हॉटेलचे मसालेदार आणि तेलकट जेवण रोज खाणे दूरवरचा विचार केला तर फायद्याचे नाही. यानंतर आम्ही दोघेही गप्प बसलो २)- पोटात कसंतरी होतंय म्हणून सायली मांजरेकर वय वर्षे ४४ आल्या होत्या. पूर्ण तपासणी केल्यावर पाहिले तर कुठेच काही नव्हते. मेनोपॉज पण जवळ आलेला नव्हता. पाळी पण व्यवस्थित येत होती. आतडी फक्त जोरात हालचाल करत असताना आढळली. परत पूर्ण तपासणी करून मी त्याना म्हणालो कि हा कदाचित तुमच्या मानसिक तणावाचा परिणाम शरीरावर होत असावा. मी त्यांना म्हणालो तुम्ही इथे झोपला आहेत तर तुमच्या डोक्याखाली उशी आहे त्याचा स्पर्श तुम्हाला जाणवतो आहे. हाच जर अजगर आहे असे तुम्हाला समजले तर काय होईल? तुमचे तोंड कोरडे पडेल, छातीत धडधडायला लागेल, हातापायाला कापरे सुटेल. स्पर्श तोच आहे मग असे का होते? तर तुमच्या मानसिक ताणाचा शरीरावर होणार परिणाम आहे. (somatisation) त्यावर त्या एकदम बांध फुटल्यासारख्या बोलायला लागल्या. आमचे "हे" एका प्रथितयश कंपनीत "सी इ ओ" आहेत. पण त्याना माझ्यासाठी वेळच नाही. मला काय आजार आहे कुठे दुखतंय ते सांगितले तर म्हणतात माझा डोकं खाऊ नको आपल्या फॅमिली डॉक्टरना दाखव. आता प्रत्येक बारीक बारीक गोष्ट मी डॉक्टरना कशी सांगणार? तुम्हीच आमच्या "ह्यांना" काहीतरी समजवा. आता मी त्यांच्या "ह्याना" काय समजावणार? मुळात ते आलेलं नव्हतेच, त्यातून मी त्यांना ओळखत नाही आणि माझा काय अधिकार आहे त्यांना काही सांगायचा? मी केवळ मान डोलावत होतो. त्या चार पाच मिनिटे बोलून शांत झाल्या. मी त्यांना समजावत म्हणालो कि तुम्ही जेंव्हा मिस्टरांना वेळ असेल तर त्यांच्याशी शांतपणे "तक्रार न करता" बोला. हा प्रश्न तुम्हाला चर्चेद्वारेच सोडवायचा आहे. मानसिक ताण कुणाला नाही पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मानसिक तणावाचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ न देणे तुमच्या हातात आहे. मग त्यासाठी तुम्ही सद्गुरूंचा आधार घेऊ शकता, ब्रम्हविद्या, ध्यानधारणा, योगिक क्रिया, प्राणायाम किंवा मनोविकार तज्ञ यांच्यापैकी जे तुम्हाला पटेल रुचेल त्याकडे तुम्ही जाऊ शकता. त्यांनी मग रिपोर्ट घेतला पैसे दिले आणि म्हणाल्या डॉक्टर सॉरी हं तुमच्या "बिझी" वेळेत मी जास्त वेळ घेतला. मी हसून त्यांना समजावले कि काही वैयक्तिक प्रश्न असतात ते डॉक्टर सोडवू शकेलच असे नाही पण कुठे जायचे त्याचा मार्ग कदाचित दाखवू शकेल. त्यांनी परत दिलगिरी व्यक्त केली आणि त्या गेल्या. ३) एक एकोणीस वर्षांची लग्न न झालेली मुलगी पाळी चुकली म्हणून आली होती. तिला चार पाच महिने झाले होते आणि तीचा गर्भपात करायचा होता. तिची आई आणि आत्या तिच्या बरोबर आलेल्या होत्या. मी तिला पाहिले तर तिचे १९ आठवडे आणि २ दिवस झाले होते. मी बाहेर आलो तिच्या आईला आणि आत्याला समजावत होतो कि तुमच्या हातात फक्त ५ दिवस आहेत कारण २० आठवड्यानंतर तुम्हाला कायद्या प्रमाणे गर्भपात करता येणार नाही. तिची आई ओक्सबोक्शी रडत म्हणाली डॉक्टर काय सांगणार? हिने नोव्हेंबर मध्ये पण सोनोग्राफी केली होती तेंव्हा पण कळले होते कि ती गर्भार आहे. पण तिने आम्हाला सांगितलेच नाही. पाळी आली /येते आहे असे खोटे सांगत होती.आता पोट दिसायला लागले तेंव्हा विचारल्यावर म्हणाली कि मी गरोदर आहे. तिचा "मित्र" ३५ वयाचा लग्न झालेला आहे आणि दोन पोरांचा बाप आहे. त्याने तिला सांगितले कि मी या मुलाला पण पोसेन. तू काळजी करू नको आणि गर्भपात करायची गरज नाही. आणि हि पण अक्कलशून्य आहे ती पण म्हणते कि तो मला फसवणार नाही.कशी फशी पडली ते समजत नाही. आणि अजूनही समजून घ्यायला तयार नाही. तिला विचारले कि तो लग्न करायला तयार आहे का? त्यावर ती म्हणाली की आम्ही मनाने लग्न केलेच आहे मग काय फरक पडतो. तिला पुढच्या आयुष्याबद्दल सांगून कसे तरी तयार केले आहे. एकदा "मोकळी" केली कि आम्ही सुटलो. मी हतबुद्ध झालो. काय बोलणार? त्यांचे कसे तरी सांत्वन केले.

वाचन 17331 प्रतिक्रिया 0