मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती"

भानिम · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गेल्या काही दिवसांत भारतातील राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींच्या निमित्ताने हिंदुत्व, सहिष्णुता, भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृतीचा जगातील प्रभाव इत्यादी विषयांवरती पुन्हा चर्वित चर्वण झाले. प्रागैतिहासिक आणि पौराणिक दाखल्यांची देवाण घेवाण झाली. पण केवळ प्रागैतिहासिक आणि पौराणिक दाखल्यांपलीकडे काही ऐतिहासिक आणि 'refereed' दस्तऐवज आहे का? या दिशेने चिकित्सक आणि नि:पक्षपाती दृष्टीने काही मर्यादित संशोधनाचा उहापोह केला. त्यातून जी माहिती मिळाली ती थोड्या रंजक आणि वाचनीय लेखमालेच्या स्वरुपात इथे मांडत आहे. वापरलेले संदर्भ आणि संदर्भ सूची इथे देत नाहीये याबद्दल अत्यंत क्षमस्व. आपली भारतीय संस्कृती हीच "वसुधैव कुटुंबकम" म्हणजेच "हे विश्वची माझे घर" या संकल्पनेवर आधारलेली आहे. किंबहुना मी तर असं म्हणेन की "भारत साऱ्या विश्वाचे घर" असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. पूर्व युरोप, मध्य आशिया, ग्रीस आणि आफ्रिका अशा विविध प्रांतांतून मानवसमूह भारतात स्थलांतरित झाले आणि त्यांनी भारत हीच आपली भूमी मानली. भारताच्या "सुजलाम सुफलाम" भूमीने सर्वांना प्रेमाने जवळ केलं आणि आपली जगावेगळी भारतीय संस्कृती जन्माला आली. (मुस्लिम धर्माच्या स्थापनेनंतरच्या कालखंडाचा यात समावेश आणि विचार केलेला नाही.) आपल्या भारतीय संस्कृतीचा मध्य आशिया, दक्षिण पूर्व आशिया, चीन, जपान, कोरिया अशा दूरदूरच्या देशांपर्यंत प्रसार झाला. या लेखांमधून हाच रंजक प्रवास पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न आहे. मुख्य म्हणजे अनेक प्रसंगी हा प्रसार कुठलेही राजकीय आक्रमण न करता झाला आणि अनेक वेळा देशोदेशींच्या राज्यकर्त्यांनीच भारतीय विद्वानांना आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी निमंत्रण दिले असेही दिसून येते. एक काळ असा होता की इतर देश आणि प्रदेशांबरोबर व्यापार हे भारतीयांच्या अर्थार्जनाचे व उपजीविकेचे एक मुख्य साधन होते असे दिसून येते. ख्रिस्तपूर्व ३०० ते १०० या काळापासून भारतीय व्यापारी पश्चिमेकडील आशियातील अरबस्तान, युरोपमधील रोम ते पूर्वेकडील चीनपर्यंत व्यापारासाठी ये-जा करीत असत. कंबोडिया (कम्हुज किंवा कम्बोज), जावा (यव द्वीप), सुमात्रा आणि मलाया (मलेशिया) या ठिकाणी असलेल्या सोन्याच्या खाणी आणि त्यातून मिळणारे सोने हे मुख्य आकर्षण होते. त्यामुळेच या बेटांचा उल्लेख "सुवर्ण द्वीप" असा होत असे. हे व्यापारी काशी, मथुरा, उज्जयनी, प्रयाग आणि पाटलीपुत्र अशा त्याकाळच्या संपन्न शहरांतून येत असत आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील मामल्लापुरम (तमिळनाडू), ताम्रलिप्ती (तामलूक - मेदिनीपूर पश्चिम बंगाल), पुरी (ओदिशा) आणि कावेरीपट्टणम (तमिळनाडू) या बंदरावरून जहाजांची वाहतूक होत असे. जिथे जिथे हे व्यापारी गेले तिथे तिथे त्यांनी भारतीय संस्कृतीची बीजे रोवली. प्राचीन काळातील भारतीय विश्वविद्यालये ही सांस्कृतिक देवाण-घेवाणीची महत्त्वाची केंद्रे होती. या विश्वविद्यालयांमध्ये असलेल्या ग्रंथसंपदेमुळे देशोदेशींचे अभ्यासू आणि विद्वान येथे आकर्षित होत असत. नालंदा विश्वविद्यालयाचे ग्रंथालय ही सात मजल्यांची इमारत होती असे म्हंटले जाते. अर्थात याबद्दल अतिगर्व करण्याची आपल्याला संधी नाही, कारण अशी विश्वविद्यालये इतर ठिकाणीही उपलब्ध होती. ती म्हणजे प्लेटोनिक अकॅडमी (अथेन्स, ग्रीस) - स्थापना ख्रिस्तपूर्व ३४७ – लय ख्रिस्त पश्चात ५२९ (९१६ वर्षे), प्लेटोचा शिष्य अरीस्टोटल याने स्थापन केलेले पेरीपॅटेटिक स्कूल (अथेन्स) -ख्रिस्तपूर्व ३३५, आलेक्झांड्रिया विश्वविद्यालय ही याची उदाहरणे आहेत. आलेक्झांड्रियाचे ग्रंथालय देखील असेच प्रचंड होते असे म्हणतात. हान राज्यकर्त्यांनी चीनमध्ये ख्रिस्तपश्चात ३०० मध्ये असेच राजविद्यालय चीनी शहर "ताई स्च (Tai xue)" येथे स्थापन केले होते. त्यापाठोपाठ कोरियामध्ये देखील ताएहाक (ख्रिस्त पश्चात ३७२) आणि गुकहाक (ख्रिस्त पश्चात ६८२) येथे देखील अशी विश्वविद्यालये स्थापन झाली होती. असेच विद्यापीठ इराणमधील गुंदिशापूर येथेही स्थापन झाले होते. या सर्व विश्वविद्यालयांमधून तर्कशास्त्र, खगोलशास्त्र, राज्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, विज्ञान, रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्र अशा गहन विषयांवर अभ्यास आणि संशोधन चालत असे आणि अशा माहितीची देवाण-घेवाणही चालत असे. परंतु अशी ज्ञानकेंद्रे भारतात सर्वात जास्त प्रमाणात होती ती म्हणजे - नालंदा (बिहार), तक्षशीला (सध्या पाकिस्तानात), विक्रमशीला (बिहार), वल्लभी (सौराष्ट्र), पुष्पगिरी (ओदिशा), ओदन्तपुरी (ओदिशा). बिहार आणि ओदिशा - जी भारताची सन्माननीय ज्ञानकेंद्रे होती - ती आज भारतातील सर्वात मागास राज्ये म्हणून गणली जातात हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल नाही का? प्रख्यात चीनी विद्वान ह्यु एन स्चंग याने आपल्या ज्ञानार्जनासाठी दोन ठिकाणी वास्तव्य केल्याचे नमूद केले आहे - नालंदा आणि वल्लभी. विक्रमशीला हे असेच प्रसिद्ध विश्वविद्यालय. त्याचे विस्तृत वर्णन तत्कालीन तिबेटी अभ्यासू आणि विद्वान "तारानाथ" याने केले आहे. या विश्वविद्यालयातील शिक्षक आणि विद्वान इतके प्रसिद्ध होते की तिबेटच्या राजाने आपले अभ्यासू प्रतिनिधी विक्रमाशीलेला पाठवून भारतीय संस्कृती आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंना आग्रहाचे निमंत्रण दिले. परंतु त्यांनी तसे केले नाही. अखेरीस तिबेटच्या राजाने नालंदा विद्यापीठाचे आचार्य कमलशील यांना निमंत्रण दिले आणि ते त्यांनी मान्य केले. ओदन्तपुरीचे विद्वान ज्ञानभद्र आणि त्यांचे दोन पुत्रदेखील तिबेटला स्थलांतरित झाले आणि त्यांनी ओदन्तपुरीच्या धर्तीवर ल्हासा येथील मठाची स्थापना केली. नंतर अकराव्या शतकात बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली विक्रमशीला विद्यापीठाचे तत्कालीन प्राचार्य, आचार्य अतिश (किंवा दीपंकर श्रीज्ञान) तिबेटला गेले आणि त्यांनी तिबेटमध्ये बौद्ध धर्माची स्थापना केली. तिबेटचा मंत्री "थोन्मी संभुत" याने नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण घेतले आणि तिबेटमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रसार केला. तिबेटच्या राजाने देखील बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्म राजधर्म म्हणून घोषित केला. चीन आणि इतर देशांची कहाणी पुढच्या भागांमधून …..

वाचन 18528 प्रतिक्रिया 0