थंड घ्या...व्हा गार !!

सस्नेह's picture
सस्नेह in पाककृती
16 Apr 2015 - 3:48 pm

एप्रिल सुरु झाला. सूर्य डोक्यावर जाळ काढू लागला आणि घसा गार करण्याची वारंवार गरज पडू लागली. आईस्क्रीमची दुकाने हेरून पार्सलं आणून घरची मंडळी गार झाली खरी. पण माझं कै त्या दुकानी आईस्क्रीमवर भागेना बॉ. आईस्क्रीम ही चावण्याची चीज नसून तोंडात विरघळत अल्लाद गिळण्याची गोष्ट आहे असे माझे मत आहे. आणि विकतच्या हरेक आईस्क्रीममध्ये ड्रायफ्रुट्स! चावा चावा, रवंथ करा. तोवर ते आईस्क्रीम जिभेला आपली ओळखपण न देता आत सटकलेले असते !

म्हणून मग मी आईस्क्रीमच्या पाकृचा जारीने शोध घेतला. तशी तर मी गेली दहा वर्षे आईस्क्रीमसाठी वेगवेगळ्या रेसिप्या ट्राय करून पाहिल्यात. पण सॉफ्ट आईस्क्रीम आजमितीस माझ्या फ्रीजला पाहायला मिळाले नव्हते. आजवर माझ्या आईस्क्रीमला फ्रीजमधून बाहेर आल्यावर  स्वत:च्या पोटात चमचा खुपसून घ्यायला राजी व्हायला किमान दहा  मिनिटे लागलेली आहेत. पण याखेपी मात्र सॉल्लिड टिप मिळाली अन खल्लास सॉफ्ट आईस्क्रीम जमले. काल केलेल्या आईस्क्रीमइतके समंजस आईस्क्रीम बॉक्समधून आलेले तयार कंपनी शिक्कावालेपण नसेल. इम्मीजिएटली चमचा आत !  

आणि तेही  इतकुशा साहित्यात इतके मायंदाळ झाले की आठ दिवस घरातले सगळे आईस्क्रीमात लोळले. विकतच्या आईस्क्रीमात दोनशे रु. च्या बॉक्सात चार माणसांना एका वेळी एकच इवलुसा गोळा मिळत होता. घरचे आईस्क्रीम दोनशेचेच साहित्य आणून त्यातल्या पन्नास रु. चे वापरून केले तर ते चार बॉक्स भरून झाले !!

म्हणून मग मिपाच्या पाकृ दालनाच्या दरवाजातून एक पाउल हळूच आत टाकले. हो, आजवर फार तर चार वेळा या दालनाला हात लावला असेल ! नायतर आमचे पाकृ आणि फोटो कौशल्य सानिका आणि गणपा आणि दीपक यांच्या कौतुकालाच तेवढे खर्ची पडते, कृतीला नाही.

 तर बघा  जमलाय का हा प्रकार आणि तुम्हीपण करा आईस्क्रीम अन  लोळा !!

साहित्य : अर्धा लिटर कच्चे दूध

८ टेबलस्पून साखर

१ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर

१.५ टेबलस्पून GMS पावडर

१.५ टेबलस्पून मिल्क पावडर

एक अष्टमांश टीस्पून CMC पावडर

पाऊण कप व्हिप क्रीम.

आवडीप्रमाणे इसेन्स, फ्रुट क्रश, सिरप इ.

आता ही GMS आणि CMCपावडर म्हणजे काय ते कृपया विचारू नये. कारण मलाही माहिती नाही. पण आईस्क्रीमचे साहित्य मिळते त्या दुकानात विचारा, मिळेल.

साखर, कॉर्नफ्लोअर, आणि तिन्ही पावडरी एकत्र करून चांगल्या मिक्स करायच्या. मग त्यात कच्चे दूध घालून गॅसवर ठेवायचे आणि  कढी ढवळावी तसे ढवळत एक उकळी काढा. मग गॅस बंद करून हे मिश्रण पसरट भांड्यात घालून थंड करा आणि ठेवा फ्रीजरमध्ये. 

फ्रीजर सेटिंग हाय करून साधारण पंधरा तास  ठेवायचे.

मग बाहेर काढून एक तास ठेवायचे. आता त्यात पाऊण कप फ्रेश व्हिप क्रीम घालून बीटरने सुमारे ७-८ मिनिटे घुमवा. आता याचा व्हॉल्यूम दुपटीपेक्षाही जास्त होईल.

मग पुन्हा ४ तास फ्रीजरला ठेवा. आता अर्धा तास बाहेर काढून ठेवा अन पुन्हा  ४-५ मिनिटे त्यात बीटर चालवा.

आता इसेन्स, फ्रुट पल्प किंवा क्रश घालून हलकेच ढवळा. हलकेच ढवळल्यामुळे आईस्क्रीमला छान मार्बल टच मिळेल. 

मग  फ्रीजरमध्ये ठेवा. आता फ्रीजर सेटिंग लो करून ठेवा म्हणजे आईस्क्रीम सॉफ्ट होईल.

सहा तासांनी फ्रीजर उघडा आणि...

...आता मी सांगायची वाट बघताय काय ? हाणा आईस्क्रीम आणि व्हा गार !!!

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

16 Apr 2015 - 3:53 pm | कविता१९७८

वाह क्या बात है!

नाखु's picture

16 Apr 2015 - 3:54 pm | नाखु

बिलकुल गरमा-गरमी = हमरी तुमरी न होणारा धागा.

सगळ्यांना कसं गप्-गार पाडणारा.


इतके कष्ट घेऊन कुणी बनवतय का शोधावं लागेल आता !
गप्गार नाखु

स्पंदना's picture

16 Apr 2015 - 3:57 pm | स्पंदना

देवा!!

गार पडले ना मी त्ये फोटू पाहून.

ह्या CMC आणि GMS पावडरी ह्याच नावाने आमच्याकडे मिळतील काय?

(फोटो पाहून हावरी झालेली स्पंदना)

तू ये गं इकडे, तुला करूनच खाऊ घालते अन पावडरींचं पार्सल देते बरोबर ! +)

एस's picture

16 Apr 2015 - 4:20 pm | एस

'सिलेक्टिव्ह फेव्हरिटिझम' चा निषेध असो!

आष्ट्रेलियापेक्शा पुनं जवळ हाय नव्हं, मग आमास्नी बी बोलवा की गारेगार खायाला.

सस्नेह's picture

16 Apr 2015 - 6:38 pm | सस्नेह

हो तुमीपण !
पण आमच्याच काय, कोणत्याच आईस्क्रीमने पुणे गार होईल याची ग्यारंटी नाही +D

पियुशा's picture

17 Apr 2015 - 2:47 pm | पियुशा

मस्त मस्त मस्त जियो.......

स्मिता श्रीपाद's picture

16 Apr 2015 - 3:59 pm | स्मिता श्रीपाद

अहाहाहा...
काय मस्त दिसतय.... :-)
सोपं वाटतय ...पण १५ + १ + ४ + ०.५ + ६ = २६.५ तास वाट पहायला जमवावं लागेल....
मी नेहेमी अर्धवट सेट झालेलें आईस्क्रीम खाते... ;-) ( खुप वेळ वाट पहायचे पेशन्स नाहीत म्हणुन )

जेपी's picture

16 Apr 2015 - 4:08 pm | जेपी

_/\_
.

स्पंदना's picture

16 Apr 2015 - 4:08 pm | स्पंदना

दिपक.कुवेत's picture

16 Apr 2015 - 4:11 pm | दिपक.कुवेत

पहिलाच फोटो पाहून गार पडलोय. आता ह्या पावडरींविषयी (संदर्भ: श्रीमती तरला दलाल ह्यांच्या वेबसाईटवरुन)

//
GMS(Glycerol monostearate) is a food additive used as a thickening, emulsifying, anti-caking, and preservative agent; an emulsifying agent for oils, waxes, and solvents .GMS and CMC (Carboxy methyl cellulose) are compounds used for stabilizing ice creams and are available in specialty food stores or bakeries. G.M.S. Is a well known emulsifying agent which is extensively used by the modern food stuffs industries. GMS is largely used in baking preparations to add "body" to the food. It is responsible for giving ice cream and whipped cream its smooth texture.
//

आईसक्रिम स्मुथ होण्यास ह्या पावडरि मुख्य हातभार लावतात. बाकि आईसक्रिमचे गोळे दिसतायेत मात्र फर्मास. आण ते तिनहि बाउल ईकडे....

(कालच घरगुती मँगो आईसक्रिमचा फडशा पाडणारा) दिपक

सस्नेह's picture

16 Apr 2015 - 6:43 pm | सस्नेह

पावडरींचे शोध घेतल्याबद्दल तुला 4 बाऊल आईस्क्रीम भेट !

सुबोध खरे's picture

16 Apr 2015 - 7:53 pm | सुबोध खरे

GMS हे ग्लिसेरोल( ग्लिसरीन) या अल्कोहोल बरोबर स्टीएरिक आम्लाच्या एका रेणूचा संयोग केल्यावर होतो. त्याचे उरलेले दोन OH गट हे दुधातील मलईचे कण एकत्र येऊ देत नाहीत. ( जर फ्रीझर बंद पडला आणी आईस क्रीम वितळले आणी ते परत घट्ट केले तर त्यातील मलईचे कण एकत्र येऊन आईस क्रीमची नितळ मुलायम कांती बिघडते आणी ते रवाळ होते). असे होऊ नये म्हणून ते (GMS) वापरले जाते.
CMC (Carboxy methyl cellulose) हे सब्जाच्या किंवा अळीवच्या बी च्या बाहेर असलेला जेली सारखा पदार्थ आहे.हा पाणी शोषून फुगून येतो आणी बुळबुळीत अस पदार्थ तयार करतो. याचा उपयोग म्हणजे आईस क्रीमच्या दुधात असलेल्या पाण्याचे स्फटिक तयार होऊ न देणे. त्या पाण्याला शोषून घेऊन हे CMC आईस क्रीम ला मुलायम अशी कांती देते.
आता आईस क्रीम खावे कि त्याच्या घटकांचे चर्वित चर्वण करण्याचा आगाऊ पणा कशाला?
तर हे दोन्ही पदार्थ संपूर्णपणे नैसर्गिक आहेत आणी त्याचा मानवी शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही याचे विश्लेषण आहे.बरयाच वेळेस अशा पावडरी घातल्या आहेत तर ते मुलांना द्यावे कि नाही याबद्दल आयांना संभ्रम होतो. आणी त्यांना न देता खाता येत नाही त्यापेक्षा न करणे हेच बरे.हा विचार डोक्यात येणार्यांसाठी हा आगाउपणा.
तेंव्हा असे आईस क्रीम जरूर तयार करा खा आणी खिलवा.

एका छळणार्‍या प्रश्नाचे उत्तर दिले आहेत. आता या पावडरी वापरताना येणार्‍या अपराधी भावातून सुटका होईल.

गार गार वाटल्.मस्त करून पहाते.आधी पावडरी शोधण आल.

शोध शोध आणि हे असं काहीतरी कर मी आले की. बघावं तेंव्हा फ्लॉवर दुधी आणि आता पडवळ शोधत फिरत असतेस.

स्नेहाताई अप्रतिम दिसतायेत गोळे, मी पण शोधते इथे पावडरी आता.

आदूबाळ's picture

16 Apr 2015 - 4:23 pm | आदूबाळ

क्या बात! __/\__

सविता००१'s picture

16 Apr 2015 - 4:25 pm | सविता००१

काय मस्त गं.
परत कधी करणारेस तू?
येइन म्हणते.
इतका वेळ वाट पहायची ताकदच नाही गं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2015 - 4:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

_/\_ एवढा वेळ वाट पहायला लागली तर अर्धवट फ्रीझ झालेलं मिश्रण कंडेन्स मिल्क म्हणुन प्यायलं जातं :P

सूड's picture

16 Apr 2015 - 4:47 pm | सूड

वाह!!

रेवती's picture

16 Apr 2015 - 5:19 pm | रेवती

वाह! क्या बात है!
सुरेख फोटू व पाकृ.
पहिल्या फोटोत केलेली सजावट अगदी एखाद्या झायरातीत असते तशी झालीये.

कवितानागेश's picture

16 Apr 2015 - 5:38 pm | कवितानागेश

मी येतेय.... :)

सानिकास्वप्निल's picture

16 Apr 2015 - 5:54 pm | सानिकास्वप्निल

वाह! क्या बात आहे.
थंडा थंडा कूल कूल, मस्तं पाकृ आणि सजवलेला फोटो भारी :)

स्वाती दिनेश's picture

16 Apr 2015 - 6:13 pm | स्वाती दिनेश

मस्तच ग.. बघूनच मस्त वाटले, चवही फर्मास असणार..
स्वाती

स्नेहा,एकटीने खाल्लंस?माझी आठवण नाही आली तुला दुष्ट.असे फोटो काढणं आणि ते दाखवुन दाखवुन खाणं पापं!!

स्वाती२'s picture

16 Apr 2015 - 6:39 pm | स्वाती२

मस्तच!

प्रचेतस's picture

16 Apr 2015 - 6:53 pm | प्रचेतस

जीव गेला गारेगार आइसक्रीम पाहून ह्या उन्हाळ्यात.

विशाखा पाटील's picture

16 Apr 2015 - 8:46 pm | विशाखा पाटील

मी सध्या पुण्यात आहे, एवढे फक्त सांगते.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Apr 2015 - 8:48 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/smiley-eating-icecream.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/smiley-eating-icecream.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/smiley-eating-icecream.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/smiley-eating-icecream.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/smiley-eating-icecream.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/smiley-eating-icecream.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/smiley-eating-icecream.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/smiley-eating-icecream.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/smiley-eating-icecream.gif

सुनिल सुराना's picture

16 Apr 2015 - 10:38 pm | सुनिल सुराना

वा !
वाचुनच गारेगार झालो बुआ आपण !!
आता मे महिन्याचि भितिच नाहि बुवा !!!

श्रीरंग_जोशी's picture

16 Apr 2015 - 10:50 pm | श्रीरंग_जोशी

खूपच खास दिसत आहे आईसक्रीम.

तपशीलवार वर्णन आवडले.

शेवटच्या चित्रात रिकामा कोपरा बरा दिसत नाहीये. तिथे एखादी स्मायली डकवता आली तर उत्तम.

रुपी's picture

16 Apr 2015 - 11:32 pm | रुपी

पहिला फोटो फारच भारी आणि लिहिण्याची शैली पण आवडली!

जुइ's picture

17 Apr 2015 - 1:40 am | जुइ

पावडरी इथे मिळाल्या तर करुन बघण्यात येईल.

चैत्रबन's picture

17 Apr 2015 - 1:51 am | चैत्रबन

झकास झक्कासच :)

मस्त !!! या वातावरणात अगदी योग्य. फोटो पाहूनच गारेगार वाटले.

कपिलमुनी's picture

17 Apr 2015 - 3:07 pm | कपिलमुनी

CMC आणि GMS पावडर ऑनलाईन http://bigbasket.com/ वर मिळत आहेत
हे घ्या दुवे
http://bigbasket.com/pd/40003757/eagle-cmc-sodium-carboxymethyl-cellulos...

http://bigbasket.com/pd/40003751/eagle-gms-glyceryl-mono-stearate-50-gm-...

मनिमौ's picture

17 Apr 2015 - 9:12 pm | मनिमौ

नक्की करून बघेन.फोटो छानच आहेत.गारेगार आईस्क्रीम बघुन जीव थंड झाला

उमा @ मिपा's picture

17 Apr 2015 - 10:16 pm | उमा @ मिपा

आवळा पेठा आणि आवळा सरबत गाजतंय घरात आणि आता हे आईस्क्रीम आलं. आमच्या घरातल्या तुमच्या लोकप्रियतेत दणकून वाढ. जियो स्नेहाताई जियो!
सदासर्वकाळ आईस्क्रीमप्रेमी

विवेकपटाईत's picture

19 Apr 2015 - 3:50 pm | विवेकपटाईत

आम्हाला बी आईस्क्रीम लय आवडल. तूर्त सध्या तरी दिल्लीची कुल्फी वरच तहान भागवावी लागेल, असे वाटते.

मुक्त विहारि's picture

19 Apr 2015 - 7:22 pm | मुक्त विहारि

१. आयस्क्रीमच्या मुलायमपणाचे रहस्य सांगीतल्याबद्दल.

२. लेख पण मस्त झाला आहे.

३. आमच्या मिपासंन्यासाचा बेत अज्जुन थोडा पुढे ढकलल्याबद्दल.

आणि

४. अप्रतिम फोटोग्राफीबद्दल.

आमच्या मिपासंन्यासाचा बेत अज्जुन थोडा पुढे ढकलल्याबद्दल.

कुठे निघाला मुवि ? बर्‍याच पाकृ अन कट्टे बाकी आहेत !

प्रीत-मोहर's picture

19 Apr 2015 - 8:25 pm | प्रीत-मोहर

आह!!! सुरेख .. पण इतना इंतेजार किससे होगा?

सस्नेह's picture

19 Apr 2015 - 9:22 pm | सस्नेह

इंतजारका फल मीठा होता है +)

Maharani's picture

21 Apr 2015 - 2:29 pm | Maharani

जबराट

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 May 2015 - 3:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

काल हे आईस्क्रीम घरी बनवले होते, ताज्या आंब्यांचा रस घालुन. लै म्हणजे लैच भारी झाले होते.

एकदम सॉफ्ट, रवाळ आणि स्वादिष्ट. शिवाय घरी बनवल्या मुळे भरपुर मिळाले.

असेच नवनवे प्रयोग करत रहा आणि इकडे टाकत रहा.

पैजारबुवा,

मदनबाण's picture

9 May 2015 - 5:35 pm | मदनबाण

आहाहा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आई शपऽऽथ्थ साडी मधे दिसते झकाऽऽऽस्स्स तू ;)